वसई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरातील महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. २०२२ या वर्षांत बलात्काराचे तब्बल ३५७  तर विनयभंगाचे ५४६ गुन्हे दाखल झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असले तरी  गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ९६ टक्के  आहे.

 बहुतांश प्रकरणात आरोपी हे पीडित महिलांच्या परिचयाचे आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाणदेखील मोठे आहे. यामध्ये समाजमाध्यमावरून ओळख करून मैत्री करून झालेले बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून झालेले बलात्कार आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळय़ात ओढून त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले जातात. अशा प्रकरणात पीडितांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.  २०२२ या वर्षांत विनयभंगाचे ५४६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ५२४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. गुन्हयांचे उकल करण्याचे प्रमाण हे ९६ टक्के आहे. छेडछाड करणे, पाठलाग करणे, अश्लील शिवीगाळ करणे, अश्लील संदेश पाठवणे अशा प्रकरणातही इतर कलमांप्रमाणे विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे गुन्हयांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक प्रकरणात महिलांना अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आम्ही नियमानुसार विनयभंगाचे कलम ३५४ तसेच ३५४ डी अंतर्गत गुन्हे दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. २०२१ मध्येदेखील विनयभंगाचे ४१४ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४०२ गुन्हे उघडकीस आणले होते. त्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे होते.

बलात्कार

वर्ष       एकूण गुन्हे           उघडकीस

२०२१      २९७            २९७

२०२२       ३५७            ३५६

विनयभंग

वर्ष          एकूण गुन्हे    उघडकीस

२०२१         ४१४            ४०२

२०२२         ५४६            ५२४

Story img Loader