अरबी समुद्रात वसईच्या परिसरात शनिवारी रात्री खोल समुद्रात अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परंतु या आगीबाबत आता ओएनजीसी कडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून, सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास वसईच्या सागरी किनाऱ्यावरून अरबी समुद्रात खोलवर अचानक मोठे आगीचे लोट आणि स्फोटांचे आवाज येऊ लागल्याने हे भयंकर दृश्य बघून किनाऱ्यावरील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तर नागरिकांनी पळापळ देखील सुरु केली होती.
किनाऱ्यावर नागरिकांची मोठी गर्दी –
अशीच दृश्य वसई, विरार तसेच पालघर मधील सर्वच समुद्र किनाऱ्यावरून दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आगीचे लोट प्रचंड असल्याने समुद्रात आग लागली असा समाज करून किनाऱ्यावर मोठी गर्दी उसळू लागली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना समजावून स्थिती आटोक्यात आणली. यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याने या आगीची माहिती काढली असता, ओएनजीसी कंपनीचे काम सूरू असल्याने हे लोट दिसत असल्याचे समजले यामुळे नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
याचा कोणताही सागरी किनाऱ्याला धोका नाही –
विरार अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले की, समुद्रात १५ नोटिकल आत मध्ये ओएनजीसी ऑइल रीघचे काम चालू आहे. यामुळे हे आगीचे लोळ दिसून येत आहेत. याचा कोणताही सागरी किनाऱ्याला धोका नाही. असे असले तरी अर्धा ते पाऊणतास चाललेल्या या आगीमुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही –
“ या आगीच्या संदर्भात कोस्टगार्ड वरळी येथे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वसुंधरा कंट्रोल रूम ओएनजीसी यांच्याकडून माहिती आली की, ओएनजीसीचे ऑइल फिल्डमध्ये काम चालू असून त्या आगीचा प्रकाश तिथे दिसत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कोणताही धोका नाही ” असे अर्नाळाचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.