वसई : मानसिक त्रास आणि पोटदुखीचा आजार बरा करतो असे सांगून एका महिलेवर बलात्कार करणार्या भोंदू मांत्रिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. उपचाराच्या नावाखालीं मंत्र आणि विधी करून त्या महिलेवर बलात्कार करून पैसे उकळले होते.
पीडित महिला ४५ वर्षांची असून पतीसह विरार पूर्वेच्या कारगिल नगर मध्ये राहते. या परिसरात रामपलट राजभर नावाच इसम मांत्रिकाचे काम करतो. पैशाचा पाऊस पाडणे, गुप्त घन शोधून देणे, भूत बाधा उतरवणे आदी दावे तो करत असतो. पीडित महिलेला पोटदुखीचा तसेच मानसिक त्रास होता. त्यामुळे ती या मांत्रिकाकडे उपचारासाठी जात होती. तिच्यावर तो मंत्रोच्चार आणि विधी करून उपचार करत होता. मे महिन्यात त्याने या महिलेला पाण्यात कोळसा टाकून पाणी पिण्यास दिले आणि त्यानंतर तिला गुंगी आली. यानंतर राजभर याने तिच्यावर बलात्कार केला.
हेही वाचा…शिधापत्रिकांची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ आठ दिवसांपासून बंद; कामकाज ठप्प
‘माझी पत्नी गेल्या काही दिवसांपासून अबोल झाली होती. काही दिवसांनी तिने माझ्या मित्रांना हा प्रकार सांगितला आणि आम्ही विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली’ असे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.
हेही वाचा…विरार नालासोपारा दरम्यान रेल्वे मार्गिकेत बिघाड; प्रसंगावधान राखत लोकल थांबवली ; प्रवाशांचा खोळंबा
याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी रामपलट राजभर याच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिते्या कलम ३७६ (२) (एन) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याच्या कलम ३(१)(२) अन्वये अटक केली आहे.आम्ही याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने अन्य कुणा महिलेसोबत असा प्रकार केला आहे का त्याचाही आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी दिली.