वसई: बोरिवली रेल्वे स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल गाड्या या १५ ते २० मिनिटे उशिराने येत आहेत. लोकल उशिरा येत असल्याने सोमवारी सकाळी ९च्या सुमारास विरारच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
विरारच्या रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सोमवारी सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. आणि या तांत्रिक बिघाडाचा परिणाम हा लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर झाला आहे. विरार वसई रेल्वे स्थानकातून नियमित दाखल होणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने येत आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा : नाल्यात पडून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू; उमेळा फाटा येथील घटना
गाड्या आल्या तरी त्यात चढण्यास मिळत नसल्याने प्रवासी तासंतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. हळूहळू गर्दी वाढतच असल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामदार वर्गाचे हाल झाले आहेत. यापूर्वी मेगा ब्लॉकमुळे हाल झाले होते आता तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.
हेही वाचा : वसई : माणिकपूर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात ५ तास धरणे आंदोलन
गाडीत चढणे कठीण
विरार रेल्वे स्थानकात गेल्या तासाभरापासून अनेक प्रवासी लोकल गाडी मध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु गर्दी इतकी प्रचंड प्रमाणात आहे की त्यात चढणे सुद्धा कठीण झाले असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. अर्धा तास लोकल उशिराने येत आहेत. तर रेल्वेकडूनही प्रवाशांना योग्य ती माहिती दिली जात नाही असे प्रवासी अजय पांडे यांनी सांगितले आहे. तर काही गाड्या या वसई, नालासोपारा येथूनच भरून येत असल्याने विरारच्या प्रवाशांना चढण्यास मिळत नसल्याचेही प्रवाशांनी सांगितले आहे.