वसई- भरधाव वेगाने जाणार्‍या फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने विवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आत्मजा कासाट यांचा मृत्यू झाला. विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथे गुरूवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.गुरूवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यावर प्रा. आत्मजा कासाट (४५) या विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या फॉर्च्युनर या आलिशान गाडीने त्यांना जोरदार धडक दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या धडकेत प्रा. आत्मजा या दुभाजकावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना विरारच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी चालक शुभम पाटील (२४) याला ताब्यात घेतले आहे. त्याने मद्यपान केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. प्रा. आत्मजा कासाट या विवा कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या. त्या सामाजिक क्षेत्रात सक्रीय होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva college professor atmaja kasat died in an accident vasai amy