मागील विधानसभा निवडणुकीतील  मतदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई/पालघर : नालासापोरा विधानसभा मतदारसंघातून ५६ हजार बोगस मतदारांना वगळण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात हजारो बोगस मतदारांचा समावेश केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर तब्बल ५६ हजार मतदारांना वगळण्यात आले आहे. हे सर्व मतदार दुबार, चुकीचे पत्ते, आधारकार्ड नसल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने वगळले आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात अडीच मतदारसंघ आहेत. त्यात वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघाचा अर्धा भाग येतो. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी नालाोसापारा मतदारसंघ चर्चेत आला होता. माजी चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा हे या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्यासमोर वसईच्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. नालासोपारा मतदारसंघात परप्रांतीय मतदार मोठय़ा संख्येने आहेत. त्यावेळी शर्मा यांच्यासाठी हजारो बोगस मतदारांचा समावेश केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. अनेक नावे बनावट असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन दाखवले होते. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार याद्यांचा फेरआढावा घेण्यात आला. त्यामध्ये नालासोपारा मतदारसंघात तब्बल  ५६ हजार ३३६ मतदार बोगस असल्याचे आढळून आले आहे.  एप्रिल २०१४ मध्ये नालासोपारा मध्ये तीन लाख ४८ हजार १८६ इतके मतदार  होते. त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होऊन एप्रिल २०१८ मध्ये या मतदारसंघाची मतदार संख्या ४,३२,६०८ तर एप्रिल २०१९ मध्ये नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदार संख्या चार लाख ८७ हजार ५६० पर्यंत पोचली होती.विधानसभा निवडणुकीपूर्वी नालासोपारा मतदार संघाची मतदार संख्या ५,१२,३५७ इतकी पुन्हा वाढली. नालासोपारा येथे एप्रिल ते ऑगस्ट २०१९ झालेली सुमारे २५ हजारची मतदार संख्या वाढ ही सर्वच  पक्षांच्या डोळय़ात भरली अनेक  पक्षांनी या वाढीविरोधात आक्षेप नोंदवला होता. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने नालासोपारा येथील मतदार संख्या   कमी झाल्याचे दिसून आले आहे. नालासोपारा विधानसभेतील मतदार संख्या गेल्या वर्षांच्या तुलनेत ५६ हजार ५३६ ने कमी झाली असून त्यामध्ये मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात रद्द झालेल्या मतदारांचे योगदान अधिक आहे.

७७ हजार मतदार छायाचित्राविना

१५ जानेवारी २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या यादीनुसार नालासोपारा येथे पाच लाख ५९ हजार ८४५ मतदार होते. ही संख्या कमी होऊन ५ लाख ५३०९ इतकी स्थिरावली आहे. म्हणजेच ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान नालासोपाऱ्यात ७७ हजार ३१० मतदारांकडे छायाचित्र नव्हती तर १ हजार ११२ मतदारांची नावं दुबार यादीत असल्याचे दिसून आले होते. या मतदारांना आवश्यक सुनावणी देऊन त्यापैकी बहुतांश नावे वगळण्यात आल्याचे आढळले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters excluded election assembly constituency ysh
Show comments