विरार : मागील आठवडय़ात औद्योगिक कंपनीला लागलेल्या आगीत तीन कामगारांचा हकनाक बळी गेला होता. दुर्घटनेच्या तपासणीत या कंपनीकडे कोणतेही परवाने आणि सुरक्षा यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. यामुळे पालिकेने आता आपल्या परिसरातील औद्योगिक कंपन्या, कारखाने, वसाहती यांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका स्वतंत्र पथक  नेमणार आहे.

पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील औद्योगिक कंपन्या, कारखाने, वसाहती यांना अनेकवेळा नोटीस पाठवू अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्यासाठी आवाहन केले आहे. पालिकेने आतापर्यंत २० हजार नोटीस बजावल्या आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात नोटीस बजावूनही या कंपन्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. काही प्रमाणात कंपन्यांनी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घेतले. मात्र अजूनही हजारो कंपन्या कोणत्याही सुरक्षा यंत्रणेचा वापर न करता कामगारांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यात मागील आठवडय़ात झालेल्या दुर्घटनेने या कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला, यामुळे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी तातडीची बैठक घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व लहान- मोठय़ा कंपन्यांच्या सुरक्षेचे लेखापरीक्षण करण्याचे ठरविले आहे.

 या बाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, जी दुर्घटना झाली ती कंपनी ही पालिकेच्या हद्दीत नाही, पण पालिकेने तातडीने अग्निशमन दलाच्या सहायाने त्यांना मदत केली. पण वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत हजारो लघुउद्योग करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यात अशा पद्धतीने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. यात पालिकेच्या वतीने एक स्वतंत्र पथक तयार केले जाणार असून सर्व प्रकारच्या कंपन्यांची पाहणी केली जाणार आहे. त्यात त्यांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण, त्यांनी बसवलेली उपकरणे, त्यांची क्षमता याचे तज्ज्ञांकडून चाचणी केली जाणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक ऑडिट आणि बांधकामाचे संरचना तपासणीसुद्धा केली जाणार आहे. ज्या कंपन्यांत सुरक्षा यंत्रणा नाहीत त्यांना तातडीने त्या बसविण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. ज्या कंपन्या करणार नाहीत त्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाणार आहे.