वसई: आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचा व अवयवांचा उपयोग गरजूंना व्हावा यासाठी देहदान ही चळवळ सुरू करण्यात येत आहे. यासाठी वसई विरार महापालिकेने ही पुढाकार घेत यासाठी अवयव दान कक्ष तयार केला जाणार आहे. जनजागृती यासह इतर सोयीसुविधांच्या दृष्टीने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आताच्या काळात जीवनमान पाहता, खाण्या- पिण्यातील बदल स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. परिणामी, जिथे काही लोक आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झालेत, तिथेच काही लोक जास्त बिनधास्त होताना दिसत आहेत. वाईट सवयी, उशिरा झोप, मानसिक त्रास या सर्वामुळे शरीर विविध आजाराला बळी पडते. काही वेळा अवयव निकामी होतात.
काही अवयव हे निकामी झाले, तर बदलता येतात. पण काही अवयव बदलणे किंवा त्यासाठी डोनर मिळणे हे सोपे नाही. बरेचदा घरचीच माणसे अवयवदानासाठी पुढे येतात. पण अनेकदा कधी रक्तगट, कधी वय, कधी मधुमेहासारखे अनुवंशिक आजारामुळे कुटुंबातील व्यक्ती अवयवदानास अपात्र ठरतात.अशा वेळी अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना दाते मिळणे कठीण होत असते. अशा वेळी अनेक अडचणी निर्माण होत असतात.
ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, हृदय, किडनी, यकृत व इतर अवयव दान करता येतात. त्याचा वापर असे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होऊ शकतो.
यासाठी समाजात जनजागृती करून अवयवदान व त्वचा दान ही चळवळ सक्रिय होत आहेत.
यासाठी वसई विरार महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात अवयव दान कक्ष तयार केला जाणार असून नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने २५ लाख रुपयांची तरतूद ही केली आहे.
एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना अवयव दान करायचे असेल तर त्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला जाईल. याशिवाय अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी संपर्क केल्या नंतर प्रशिक्षित डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने सांगितले आहे.
अलीकडच्या काळात आपल्या मृत्युपश्यात आपल्या देहाचा व अवयवांचा उपयोग एखाद्या गरजवंताला होऊन त्याला जीवनदान मिळावे यासाठी सध्या देहदान व अवयव दान ही चळवळ जनमानसात रुजवली जात आहे याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेने ही आपल्या कार्यक्षेत्रात देहदान व अवयवदान याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य उपक्रम सुरू केला असल्याचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.
यापूर्वी पालिकेच्या कार्यक्षेत्रातील १८ जणांच्या कुटुंबाने घरातील सदस्यांच्या मृत्यू पश्यात देहदान व अवयवदान केले आहे. त्यांच्या कुटुंबाचा महापालिकेने २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनी सत्कार करून प्रोत्साहन दिले होते.
शहरातील आरोग्य सेवा सुधारण्याबरोबर अवयवदान कक्ष तयार करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी निधीची व्यवस्था तरतूद नक्की केली आहे. अनिलकुमार पवार, आयुक्त महापालिका आयुक्त
वसईतील सामाजिक संस्थेचा पुढाकार
अवयवदानाच्या बाबत जनजागृती व्हावे यासाठी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बाॅडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्या संस्थे तर्फे ही अवयव दान व त्वचा दान याबाबत चळवळ सुरू केली असून त्या चळवळीला वसई विरार मधून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबियांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवयव व त्वचादान केले आहे.