वसई : वसई-विरार शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने विशेष योजना तयार केली आहे. पुण्याच्या धर्तीवर शहर सजावटीची ही योजना आहे. यामध्ये शहरात येणाऱ्या चारही ठिकाणी भव्य प्रवेशद्वार, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट पोल यांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख चौक विकसित केली जाणार असून नगरसेवकांच्या निवासस्थानांची माहिती व्हावी यासाठी नामफलकही लावण्यात येणार आहे.
वसई-विरार शहर हे मुंबईला लागून असलेले सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. महापालिका क्षेत्राच्या अखत्यारीत वसई, नालासोपारा, विरार आणि नालासोपारा अशी चार शहरे येतात. शहराची नियमित साफसफाई आणि स्वच्छता केली जात असते. परंतु शहर आकर्षक करण्यासाठी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विशेष योजना आखली आहे. शहरात येणाऱ्या मार्गावर आकर्षक प्रवेशद्वार, स्मार्ट पोल, शोभिवंत पार्किंग इत्यादींचा समावेश आहे.
आकर्षक प्रवेशद्वारे
वसई-विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव अशी चार शहरे आहेत. या शहरातून आत येणाऱ्या मार्गावर भव्य असे प्रवेशद्वार तयार करण्यात येणार आहे. प्रवेश येताना शहराची वेगळी ओळख निर्माण व्हावी हा त्यामागे उद्देश आहे. प्रवेशद्वारावरून शहराच्या भव्यतेची कल्पना यावी यासाठी प्रवेशद्वारे भव्य, आकर्षक केले जाणार आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानीवर रंगीत दिवाबत्ती केली जाणार आहे. वसईच्या संस्कृतीचे प्रतीक या प्रवेशद्वारातून साकारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध संकल्पचित्रांवर विचार सुरू आहे.
नाके, प्रमुख चौकांचा समावेश
शहरातील महत्त्वाचे नाके आणि प्रमुख चौकांचे सुभोभीकरण केले जाणार आहे. त्या ठिकाणी कारंजे, सजावट केली जाणार आहे. यासाठी खासगी कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) वापरण्यात येणार आहे. याशिवाय हवा शुध्द राहावी यासाठी सहा ठिकाणी हवा शुध्दीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहे.
शहरात स्मार्ट पोल
शहरात स्मार्ट पोल उभारण्यात येणार आहे. या पोलमध्ये इंटरनेट बूस्टर, अधिक प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल जाहिरातीचे फलक, दिशादर्शक फलक, आणि मोबाइल रेडीओचा सुद्धा वापर केला जाणार आहे.या शहरातील दिवे हे जुन्या पद्धतीचे असून त्यावर वीज अधिक वापरली जाते. यामुळे आता एलएडी दिवे लावले जाणार आहेत. यामुळे रस्त्यांवर अधिक लख्ख प्रकाश होईल.
नगरसवेकांच्या नावांचे नामफलक
शहरातील विविध भागांची माहिती व्हावी यासाठी नामफलक लावण्यात येतात. याच धर्तीवर शहरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची निवासस्थानांची माहिती व्हावी यासाठी नगरसेवकांच्या नावांचे फलक तयार करण्यात येणार आहे. प्रमुख माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवकांचा यात समावेश असणार आहे. नगरसेवकांच्या घराजवळ हे नामफलक लावण्यात येणार आहे.
स्मार्ट पार्किंग
शहरात वाहनतळांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिक कुठेही आपल्या दुचाक्या उभ्या करत असतात. त्यामुळे वाहतूकीला अडचण निर्माण होते. शिवाय बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने परिसरही अडगळीचा ठरतो. यासाठी शहराच्या नऊ प्रभागांतील मुख्य रस्त्यांवर दुचाकी उभी करण्यासाठी जागा शोधण्यात येत आहेत. या जागा खास दुचाकींसाठी राखीव असतील. त्यावर रेखांकन करून केले जाणार असल्याने उभ्या वाहनांना शिस्त लागणार आहे. त्या जागेच्या सभोवताली झाडे आणि आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याबरोबर ते आकर्षक आणि सुंदर ठेवावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही विशेष योजना तयार केली आहेत. त्यावर काम सुरू असून लवकर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. – अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका