लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : उन्हाळ्याची सुरुवात होताच मिरा भाईंदर मधील बहुतांश भागात एक दिवसा आड पाणी मिळू लागले आहे. नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक भागातू येऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून अघोषित पाणीटंचाई लागू करण्यात आली असल्याचे आरोप केले जात आहेत. ११ आणि २५ एप्रिल रोजी शटडाऊन घेण्यात येणार असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून ८६ दक्षलक्ष लीटर तर आणि एमआयडीसीकडुन १३५ दश लक्ष लीटर असा एकूण २२१ दक्ष लक्ष लीटर पाणी पुरवठा मंजुर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी गळती व इतर कारणांमुळे यात जवळपास दोनशे दक्ष लक्ष लीटर इतकाच पाणी पुरवठाच होतो. वास्तविक शहराला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र तेवढे पाणी उपलब्ध नसल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना एरवी फारशी पाणीटंचाई जाणवत नाही.

मात्र शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहिल्यास ही समस्या उभी राहते. दरम्यान मागील काही दिवसापासून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे काही भागात एक दिवसा आड तर काही ठिकाणी अत्यंत कमी पाणी येत असल्याची तक्रार पुढे येऊ लागली आहे. प्रामुख्याने उन्हाळा सुरु झालेला असल्यामुळे शासनाकडून पाणी टंचाई सुरु करण्यात आलेली असून याबाबत जाहीर माहिती दिली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एप्रिलमध्ये तीव्र पाणी टंचाईची शक्यता

एप्रिलमध्ये एमआयडीसीकडून ११ व २५ एप्रिल असे दोन वेळा आणि स्टेम प्राधिकरणाकडून २३ एप्रिलला २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्टेमचा २३ एप्रिलचा शटडाऊन झाल्यानंतर एमायडीसीकडून लगेचच २५ तारखेला शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्याचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाला बसणार असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

मिरा भाईंदर शहराला नियमित पाणी पुरवठा होत असून त्याची आकडेवारी जाहीर केली जात आहे.एखाद्या वेळेस स्टेम प्राधिकरण किंवा एमआयडीसी तर्फे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात काही बिघाड उद्भवल्यास पाणी टंचाई ची समस्या जाणवते, असा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहराला नियमित पाणी पुरवठा होत असून त्याची आकडेवारी जाहीर केली जात आहे. एखाद्या वेळेस स्टेम प्राधिकरण किंवा एमआयडीसी तर्फे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात काही बिघाड उद्भवल्यास पाणी टंचाई ची समस्या जाणवते, असा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

जुन्या भागात अधिक समस्या

मिरा भाईंदर शहरात पाणी टंचाईची समस्या प्रामुख्याने जुन्या परिसराला अधिक प्रमाणात जाणवते. यात भाईंदर पूर्व काशीनगर, नवघर, गोड देव, जेसल पार्क आणि भाईंदर पश्चिम येथील गीता नगर, बेकरी गल्ली आणि शिवसेना गल्ली सारख्या परिसराचा समावेश आहे. मोठ्या गृहसंकुलांना मोठ्या व्यासाच्या जल वाहिन्या देण्यात आलेल्या आहेत. तेथे पाणी टंचाई झाल्यास टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो.