कल्पेश भोईर
वसई : मुख्य जलवाहिन्यांपाठोपाठ आता शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्यांवर जलमापके बसविली जाणार आहेत. शहरात २२६ ठिकाणी ही जलमापके लावली जाणार असून यासाठी सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे.
वसई, विरार शहराचे नागरीकरण झपाटय़ाने वाढत असून पाण्याची मागणीही वाढली आहे. सद्य:स्थितीत धामणी, उसगाव, पेल्हार या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. दररोज या तिन्ही धरणातून २३० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी नागरिकांपर्यँत पोहचविण्यासाठी शहरातील विविध ठिकाणच्या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यातून सुमारे ६० हजार नळजोडणीधारकांना जोडण्या दिल्या गेल्या आहेत.
मात्र काही वेळा शहरातील विविध ठिकाणच्या भागात कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात. आता कोणत्या भागात किती पाण्याची गरज आहे व किती पाणीपुरवठा होतो यांची माहिती पुरवठा विभागाला मिळण्यास अडचणी येतात. यावर उपाय म्हणून विविध ठिकाणच्या भागात जलवाहिन्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. सुरुवातीला पालिकेने मुख्य जलवाहिन्यांवर आठ ठिकाणी ही जलमापके लावण्यात आली होती. त्यानंतर आता शहराच्या अंतर्गत ज्या जलवाहिन्या गेल्या आहे. त्याठिकाणीसुद्धा विभागनिहाय (झोन) जलमापके बसविली जाणार आहेत. एकूण २२६ ठिकाणी ही जलमापके लावली जाणार आहेत. यासाठी अंदाजे ९.१३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. पाण्याचा दैनंदिन होणारा पुरवठा व वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी यासाठी याचा फायदा होणार आहे.
पाणी चोरीलाही आळा बसणार
शहरात काही ठिकाणी पाणी चोरी करीत असल्याचे प्रकार घडतात. काही जण थेट नळ जोडणीला मोटार पंप लावून पाणी चोरी करतात. तर काही ठिकाणी वॉलमनच्या हस्तक्षेपामुळे पाणी चोरीचे प्रकार घडतात. नुकतीच पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली होती. जलमापके बसविल्यास चोरीच्या प्रकारांना आळा घालता येणार आहे.
मोजमाप मिळणे शक्य
शहरात पाण्याचे वितरण करताना विविध अडचणी येतात. जर विभागनिहाय जलमापके लागली तर कोणत्या भागात किती पाणी जाते ? किती पाण्याची गरज त्या भागासाठी आहे ? याचे मोजमाप मिळण्यास मदत होणार आहे. जर कमी पाणी जात असेल तिथे वाढविता येणार आहे. आणि जास्त जात असेल तर वॉल्व्हद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक नळजोडणीधारकाला समान पाणी देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.