भाईंदर : भाईंदर घोडबंदर येथील संक्रमण शिबीरात पाणी वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने येथील नागरिकांचे पाणी मिळविण्यासाठी हाल होत होते. याबाबत लोकसत्ताने वृत्त प्रसारित करताच संक्रमण शिबिरातील पाण्याच्या जलवाहिन्या बदलण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे येथील राहिवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडबंदर येथील महापालिकेच्या संक्रमण शिबिरात पाण्याचे नळ हे जमिनीला समांतर असल्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. तर अनेक जण चक्क नाल्यात भांडी ठेवून पाणी भरत असल्याचे चित्र दिसून आले होते. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात. या धक्कादायक प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पालिकेकडे तक्रार दिली होती.
तसेच दैनिक लोकसत्ता वसई विरार आवृत्तीमध्ये शनिवारी (१२ एप्रिल रोजी) प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार या बातमी ची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यतीन जाधव यांनी संक्रमण शिबिराला शनिवारीच भेट देत त्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानुसार पाण्याची ही समस्या दूर करण्याच्या दृष्टीने येथील जलवाहिन्या बदलून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.आणि मागील दोन दिवसांपासून या ठिकाणी जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व बदलण्याचे काम सुरू केले आहे.या कामामुळे येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
…आणि नळ वाहिन्या बदलल्या.
मिरा भाईंदर महापालिकेमार्फत घोडबंदर, सिल्वर सरिता तसेच काशीगाव परिसरात संक्रमण शिबीरे उभारण्यात आली आहेत.घोडबंदर येथील संक्रमण शिबिरातील पाण्याचा प्रश्न समोर आल्यानंतर प्रशासनाने अन्य ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिराची देखील पाहणी केली.आणि तेथील देखील जल वाहिन्या बदलून घेतल्या असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.