वसई : सुर्या योजनेचा पाणी पुरवठा खंडित होऊन निर्माण होणारी पाणी समस्या लवकरच सुटणार आहे. कवडास जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी १३२ केव्ही क्षमतेची वीज जोडणी देण्यासाठी ९२ मनोरे उभारणीच्या कामातील अडथळे दूर झाले आहे. ७ मनोर्‍यांना सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राची तसेच वनखात्याची परवानी मिळाली असल्याने कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, रोहित्रात बिघाड झाल्यास पर्याय म्हणून एमएमआरडीएने भाड्याने अतिरिक्त रोहित्र आणि जनरेटरची सोय केली आहे.

वसई विरार शहरासाठी एमएमआरडीएच्या सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्यातील १७० दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरार शहराला तर १५ दशलक्ष लिटर्स पाणी हे वसई तालुक्याच्या ग्रामीण भागाला दिले जाते. हे पाणी कवडास येथील पंपीग स्टेशनला आणून नंतर ते विरारच्या काशिदकोपर येथे आणले जाते आणि तेथून शहरात पाण्याचे वितरण होते.

कवडास जलशुध्दीकरण प्रकल्पाला (पंपींग स्टेशन) मार्च २०२३ मध्ये महावितरणकडून ३३/६.६ केव्ही क्षमतेची वीजजोडणी मार्च २०२३ मध्ये देण्यात आली आहे. मागील महिन्यात २५ मार्चला कवडास येथील पंपीग स्टेशनमधील एमएमआरडीएचे रोहित्र नादुरुस्त झाले आणि शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. तब्बल ६ दिवस वसई विरार मध्ये पाणी पुरवठा बंद होता. त्यानंतर हे रोहित्र वापी येथून दुरूस्त करण्यात आले होते. परंतु त्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा बिघाड झाला. हा पाणी पुरवठा गुरूवार संध्याकाळपर्यंत अनियमित सुरू होता.

नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासोबत बैठक घेतली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प होण्याची समस्या गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी नाईक यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्वार रोहित्राचा पर्याय सुचवला होता. त्यानंतर पुण्याहून भाडेतत्वाने रोहित्र आणण्यात आले आहे. सध्या कार्यरत रोहित्रात बिघाड झाल्यास पर्यायी रोहित्र कामाला येणार आहे. याशिवाय जनरेटरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी जनरेटरच्या सहाय्याने वीज सुरळीत राहिल आणि पाणी पुरवठा बाधीत होणार नाही, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.

१३२ केव्ही क्षमतेची वीज जोडणी

वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएला महावितरणकडून सुर्या प्रकल्प येथील पाणीउपसा आणि कवडास येथील पंपिग स्टेशनला उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. ती केवळ ३३ केव्ही क्षमतेची आहे. यासाठी १३२ केव्ही क्षमतेची वीज जोडणी देण्याची योजना तयार करण्यात आली होती. त्यासाठी ९७ मनोरे टाकण्याचे काम सुरू होते. परंतु ७ मनोरे हे वनखाते आणि सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राच्या कचाट्यात आल्याने काम थांबले होते.

काही ठिकाणी जागेचा तर काही ठिकाणी निधीची अडचण होती. यासाठी वनमंत्र्यांबरोब पाठपुरावा करून ७ मनोर्‍यांना परवानगी मिळवली आहे, असे राजन नाईक यांनी सांगितले. लवकरच हे काम पुर्ण होईल आणि वसई विरारचा पाणीपुरवठा अखंडितपणे सुरळीत सुरू राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम मार्गी लागण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्ने केल्याचेही नाईक यांनी सांगितले.