सुहास बिर्हाडे
वसई विरार शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची तूट लक्षात घेऊन एमएमआरडीएने सु्र्या प्रकल्पातून अतिरिक्त ४०३ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना आणली आहे. त्यातील १८५ दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरार शहरासाठी आणि २१८ दशलक्ष लिटर्स पाणी मिरा भाईंदर शहरासाठी देण्याची योजना आहे. २०१६ मध्ये या योजनेच्या कामाला सुरवात झाली होती. एमएमआरडीएकडून काशिदकोपर (विरार) जलकुंभापर्यंत पाणी आणले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरात हे पाणी वितरित केले जाईल. या योजनेतून पाणी वितरणासाठी शहरांतर्गत २८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या अंथऱण्यात आल्या असून १७ जलकुंभ तयार करण्यात आले आहे. या कामाची मुदत संपली तरी पाणी आले नव्हते. दुसरीकडे शहरात पाणी टंचाई वाढत असल्याने पाण्याचा मुद्दा तीव्र बनला होता. मागणी वाढत असताना पुरेसे पाणी नसल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालिकेने ५ दिवसातून एकदा विभागवार पाणी पुरवठा सुरू केला. टॅंकर शहरात सक्रीय झाले. अनेक ठिकाणी नवनवीन वसाहती विकसित झालेल्या होत्या. परंतु त्यांना पाणीच मिळत नव्हते. मागील उन्हाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे वसई विरार मध्ये पाण्याचा मुद्दा तीव्र बनला होता.
सर्वच राजकीय पक्ष पाण्यासाठी आंदोलन करू लागले होते. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले तरी पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढत होता. पाणी हा ज्वलंत विषय असल्याने त्याचे श्रेय घेता यावे यासाठी राजकीय श्रेय घेण्यासाठी भव्य उद्घाटन करण्याची योजना होती. त्यासाठी पाणी वितरण तांत्रिक कारण देत थांबविण्यात आले होते. नंतर तर चक्क पंतप्रधानांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचा प्रयत्न होता. जुलै महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आणि ४ महिने उलटूनही पाणी दिले गेले नव्हते. त्यामुळे जनक्षोभ वाढत होता. शिवसेना उध्दव ठाकरे गटाने एमएमआरडीएवर मोर्चा काढला, भाजपा तसेच परिवर्तन संघटनेने ५ जलआक्रोश मोर्चे काढले. बहुजन विकास आघाडीने सतत शासकीय दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. मनसेने तर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना घेऊन विरार मध्ये मोर्चा आणला. आगरी सेनेने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. ३ महिला सहा दिवस आमरण उपोषण करत होत्या. त्यानंतर शेवटी दिवाळीत उद्घटनाचा फार्स मागे ठेवून पाणी वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जलदाब चाचणी झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. आमच्यामुळे पाणी आले अशी श्रेयवादाची रंगलेली लढाई अजूनही शहरात सुरूच आहे. परंतु शहराची पाणी समस्या सुटलेली नसून ती यापुढे वाढतच जाणार आहे याकडे फारसे कुणाचे लक्ष नाही.
हेही वाचा… वसई : गाडीत डुलकी लागली आणि गमावला दीड लाखांचा फोन
वसई विरार शहराची लोकसंख्या पालिकेच्या नोंदीनुसार २४ लाखांच्या वर आहे. सध्या शहराला सुर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २३० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत आहे. सध्याच्या लोकसंख्येला सुमारे ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. आता अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर्स पाणी आणल्यादा दावा केला जात आहे. मात्र पाणी १८५ दशलक्ष लिटर्स नाही तर १६५ दशलक्ष लिटर्स मिळणार आहे. ते सुध्दा टप्प्या टप्प्याने मिळणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई समस्या कायम राहणार आहे. शहराला २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत असला तरी विविध कारणांमुळे पाण्याची गळती होत आहे. संध्या गळतीचे प्रमाण हे २१ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सुमारे ४३ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा कमी होत आहे. ठिकठिकाणी होणारी गळती, जुन्या जलवाहिन्या यामुळे ही गळती होत असते. पुर्वी गळतीचे प्रमाण हे २९ टक्के होते. त्यानंतर पालिकेने ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे केली होती. तेव्हा प्रमाण २१ टक्क्यांवर आले. ही गळतो रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.
हेही वाचा… ‘पुढे दंगल सुरू आहे’, ‘सेठ साड्या वाटतोय…’, ऐंशीच्या दशकातील फसवणुकीच्या पध्दती आजही सुरू
मागील अडीच वर्षात पालिकेकडे २ हजार १०८ नवीन नळजोडण्यांचे अर्ज आले होते. त्यामुळे नळजोडण्यांच्या अर्जाची संख्या ४ हजार ९४५ एवढी झाली होती. मात्र पाणी टंचाई असल्याने पालिकेने नवीन नळजोडण्या देणे थांबवले होते. सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी आल्यानंतर या नळजोडण्या दिल्या जाणार असे पालिकेतर्फे सांगितले होते. सध्या अतिरिक्त पाणी योजनेतून सरुवातील फक्त ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. सर्व भागातील राजकीय नेते आपापल्या भागात आधी नळजोडणी द्यावी यासाठी पालिकेवर दबाव टाकत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचे समान वाटप कसे करायचे आणि नवीन नळजोडणी कशी द्यायची असा प्रश्न पालिकेपुढे निर्माण झाला आहे.
..तरच पाणी प्रश्न सुटेल
भविष्यात वसई विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. एमएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार शहरातील लोकसंख्या पुढील २० वर्षांत ४५ लाख होणार आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून पालिकेला ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. डहाणू व्यतीगाव येथील धरणातून १८० दललक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जाणार आहे. परंतु हा प्रकल्प विविध प्रकारच्या अडचणीमुळे रखडला आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेऊन वसईला १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय पालिकेने देहरजी धरणाचे काम हाती घेतले असून राजावली, तिल्हेह आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करावे लागणार आहे. त्याशिवाय वसईचा पाणी प्रश्न सुटणार नाही