वसई : उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाच्या  प्रखरतेमुळे पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. परंतु वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या, पेल्हार व उसगाव या तिन्ही धरणात मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास , उसगाव , पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे त्यापैकी १७० दशलक्ष लीटर  असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होतो. उन्हाळा सुरू झाला असून त्याच्या उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी कमी होत असते.

तर दुसरीकडे पाण्याची मागणी ही शहरात वाढत आहेत. असे जरी असले एप्रिलच्या अखेरीस ही पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणांची स्थिती चांगली असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धामणी धरणात एकूण ४७ टक्के इतका जलसाठा असून हा जलसाठा साधारपणे वर्षभर पुरणार आहे. तर पेल्हार धरणात ४३ टक्के इतका पाणी साठा असून तो ४५ दिवस पुरेल,याशिवाय उसगाव धरणात ५२ टक्के इतका जलसाठा असून तो जवळपास ८२ दिवस पुरेल असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. पालिकेच्या तिन्ही धरणात पाणी साठा मुबलक आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज पडणार नसल्याचे पाणी पुरवठा विभाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागासाठी दैनंदिन २१ टँकर फेऱ्या

वसई पूर्वेच्या भागातील काही गावात अजूनही पालिकेच्या जलवाहिन्यांचे पाणी पोहचले नाही. यात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा यासह पेल्हार प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा समावेश आहे.उन्हाळा सुरू होताच दरवर्षी येथील भागातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. या भागात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने टँकर सुरू केले आहेत. दररोज २१ टँकरच्या फेऱ्या करून त्यांना पाणी पुरविले जात आहे.

तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न

विजेची समस्या व तांत्रिक अडचणी येतात तेव्हा अनियमित पाणी पुरवठा होत असतो. आता त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय नवीन जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकणे, त्यातील त्रुटी  सुधारणे अशी कामे प्रगतीपथावर असून ती पूर्ण झाल्यास पाण्याचा पुरवठा अधिक सुरळीत होईल असे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांनी सांगितले आहे.

वर्षभरात सात हजाराहून अधिक नवीन नळजोडण्या महापालिकेला सुर्या योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे महापालिकेने प्राधान्याने नवीन नळ जोडण्या देण्यास सुरूवात केली आहे. सुरवातीला शहरात ६० हजार इतक्या नळजोडण्या दिल्या होत्या. आता नवीन नळजोडण्या देण्यात सुरवात केल्याने वर्षभरात जवळपास ७ हजार ९५६ इतक्या नवीन नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १७ डिसेंबर २०२४ नंतर अनधिकृत बांधकामांना नळजोडणी देणे बंद केले आहे. पालिकेकडून अनधिकृत बांधकामांना नळजोडण्या दिल्या जात नाहीत असे सांगण्यात आले आहे.