वसई: महिनाभरापूर्वी विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसराला मोठा गाजावाजा करीत पाणी पुरवठा सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अजूनही या भागात पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याने येथील परिसर तहानलेला आहे. विरार पश्चिमेच्या भागात मागील काही वर्षांपूर्वी ग्लोबल सिटी परिसर विकसित झाला आहे. या भागात मुंबईपासून जवळच हक्काचे घर असावे म्हणून मध्यमवर्गीयांनी ग्लोबल सिटी मध्ये घरे घेतली होती. चकाचक इमारती आणि इतर सोयीसुविधा विकासकांनी पुरविल्या होत्या. मात्र अजूनही पालिकेकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या भागाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक यांच्या मार्फत मोर्चा काढून आंदोलने ही करण्यात आली आहेत. सुर्या प्रकल्पातून जेव्हा पालिकेला अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल तेव्हा या भागाला पाण्याचे वितरण केले जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते.
हेही वाचा >>> वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली
सुर्या प्रकल्पातून वसई विरार शहराला अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मंजूर झाले होते. त्यापैकी सध्या ९० दशलक्ष लिटर्स पाणी शहराला मिळत आहेत. टप्प्या टप्प्याने हे पाणी शहरातील इतर भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. ग्लोबल सिटी येथे १५ हजारांहून अधिक सदनिका असून त्यात ५० हाजरांहून जास्त रहिवाशी राहतात. या भागासाठी पालिकेने १० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारले आहेत. महिनाभरापूर्वी या परिसरात पालिकेने सामान्य महिलेच्या हस्ते पाणी जलकुंभात सोडून पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे येथील परिसर टॅंकरमुक्त होईल अशी आशा नागरिकांना होती. मोठा गाजावाजा करून ग्लोबल सिटीला पाणी सोडल्याची घोषणा झाली मात्र महिना उलटून गेला तरीही या भागाला अजूनही पाणीच मिळाले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> भाईंदर मधील १४९ शस्त्रे पोलिसांकडे जमा; ५ जण तडीपार
टॅंकरचा पाणी खर्च परवडेना
विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात पालिकेनचे पाणी पोहचले नसल्याने येथील नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टॅंकरच्या पाण्याच्या किंमतीही वाढत आहेत त्यामुळे महिन्याला येणारा मेंटेनन्स ही अधिक येत असल्याचे येथील रहिवासी मनोज सोनी यांनी सांगितले. जर पालिकेचे पाणी सुरू झाले तर हा खर्च कमी होईल व आम्हाला दिलासा मिळेल. पाणी येईल असे पालिकेने सांगितले होते.अजूनही पाणी आले नाही जशी आहे तशीच परिस्थिती असल्याचे राजेंद्र हातीसकर यांनी सांगितले आहे. पालिकेकडून काम सुरू विरारच्या ग्लोबल सिटी परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. मात्र त्याच्या वितरणात अडथळे निर्माण झाल्याने आता जलकुंभाजवळ जलवाहिन्या जोडण्याचे काम पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखीन काही दिवस लागणार आहेत.