धरणे भरत आली तरी पाणीकपात

वसई: गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पेल्हार आणि उसगाव धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी न देता दररोज पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाख आहे. सध्या शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २३० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. आता धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने पेल्हार आणि उसगाव धरणे पूर्ण भरली आहेत. तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातदेखील कमालीची वाढ झाली आहे. वसईकरांची पुढील वर्षांची पाण्याची समस्या मिटली असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना दररोज पाणी न देता एक दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. त्यात जलवाहिन्या फुटणे, वीजपुरवठा खंडीत होणे यामुळेदेखील पाणीपुरवठा खंडीत होत असतो. यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी मनसेचे नेते मनीष सामंत यांनी केली आहे. आधीच पालिका एक दिवसाआड पाणी देते, त्यातही अनेक दिवस विविध कारणांमुळे पाणीपुरवठा बंद असतो. म्हणजे नागरिकांना जेमतेम १० ते १२ दिवस सरासरी पाणी मिळत असते. आता पाणीसाठा मुबलक असल्याने नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालिकेने मात्र नियोजनासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करत असल्याचे सांगितले. शहराला जरी २३० दशलक्ष लिटर्स पाणी मिळत असले तरी त्यात २५ टक्के गळती होत आहे. लोकसंख्या २५ लाख असल्याने शहराला १२० दशलक्ष लिटर्स पाणी कमी पडत आहे. त्यामुळे सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. पाणी जरी एकदिवसाआड देत असलो तरी ते दोन दिवस पुरेल अशा पुरेशा दाबाने देत असल्याचेही पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water to vasaikar during the day ssh
Show comments