वसई-विरार पालिकेच्या आक्रमकतेपुढे रेल्वेची नरमाईची भूमिकावसई-विरार पालिकेच्या आक्रमकतेपुढे रेल्वेची नरमाईची भूमिका
वसई : रेल्वे संपूर्ण भारतात कुठल्याच महापालिकेला सेवा शुल्क देत नाही, असा दावा करणाऱ्या रेल्वेने वसई विरार महापालिकेला दंड माफ करून सेवा शुल्क भरण्याची तयारी दर्शवली आहे. पालिकेने मात्र कुठल्याही परिस्थितीत व्याज माफ केले जाणार नसल्याचे रेल्वेला निक्षून सांगितले आहे. यामुळे रेल्वेची दुहेरी भूमिका उघड झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वसईत १३ इमारती आहेत. नियमाप्रमाणे पालिकेला सेवा कर भरणे अपेक्षित आहे. मात्र पश्चिम रेल्वेने २००१-२००२ या आर्थिक वर्षांपासून सेवा शुल्क भरलेले नाही. त्यामुळे पालिकेने त्यांना दोन टक्के व्याजाप्रमाणे देयक आकारले आहे. त्याची रक्कम १ कोटी १५ लाख ३५ हजार रुपये एवढी झाली आहे. हे शुल्क भरावे यासाठी पालिका सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा करत होती. मात्र रेल्वेने नकार दिल्याने पालिकेने दोन वर्षांपूर्वी रेल्वे इमारतींच्या नळजोडण्या खंडित केल्या होता. त्यामुळे रेल्वे टॅंकरने पाणी मागवून या इमारतींना पुरवत आहे. आता पालिकेने आक्रमक पवित्रा घेत ही रक्कम भरली नाही तर रेल्वेने बांधकाम विभागाला आकारलेल्या देयकातून वळती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रेल्वेचे धाबे दणाणले आहे.
सोमवारी पश्चिम रेल्वेने पालिकेला पत्र पाठवून देयक भरण्याची तयारी दर्शवली आहे. सेवा शुल्काची मूळ रक्कम ही ४३ लाख ५३ हजार आहे. उर्वरित रक्कम दंडाची आहे. त्यामुळे आम्ही मूळ रक्कम भरतो पण दंड माफ करा, अशा आशयाचे पत्र रेल्वेने पालिकेला पाठविले आहे. विशेष म्हणजे यातील काही देयके गहाळ झाली असून त्याची नक्कल पत्र (डय़ुप्लिकेट कॉपी) पाठविण्याची विनंतीदेखील रेल्वेने पालिकेला केली आहे, अशी माहिती प्रभाग समिती एचचे प्रभारी साहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्विस यांनी केली आहे.
रेल्वेच्या दोन भूमिका
महापालिका सातत्याने रेल्वेकडे सेवा शुल्क भरण्यासाठी पाठपुरावा करत होती. मात्र रेल्वे त्याला दाद देत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यावर खुलासा करताना रेल्वेने आम्हाला देशात कुठेच सेवा शुल्क लागू होत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेला सेवा शुल्क भरणार नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले होते. दुसरीकडे वसई विरार महापालिकेला व्याज माफ करा आम्ही सेवा शुल्क भरतो, असे पत्र दिले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा शुल्काबाबतीत दुहेरी भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे.
पालिका ठाम, व्याज माफ करणार नाही
पालिका उपायुक्त (कर) प्रदीप जांभळे-पाटील यांनी मात्र रेल्वेच्या दबावापुढे झुकणार नसल्याचे सांगितले. रेल्वेला सेवा शुल्क तर भरावेच लागेल अन्यथा आम्ही बांधकाम विभागाकाच्या देयकातून वळते करू असे सांगितले. कुठल्याही परिस्थितीत व्याज माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आम्ही सर्वसामान्य नागरिकांना विलंब झाला तर व्याज आकारतो. हाच न्याय रेल्वेला आहे. कुणातही भेद करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.