लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई पूर्वेच्या वज्रेश्वरी- वसई या दरम्यान धावत्या एसटी बसचे अचानक चाक निखळल्याची घटना घडली आहे. या बस मध्ये ३० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने बसचालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित होत आहे.

वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या बस द्वारे सेवा दिली जाते. शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पारोळ गावा जवळ पोहचताच अचानकपणे पुढील बाजूने चाक निखळले. चाक निखळल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटून अपघात घडेल की काय अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती. मात्र बस चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी काही किलोमीटर अंतरावर होता. जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती असे नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात असेही प्रवाशांनी यावेळी सांगितले आहे. यापूर्वी २५ जुलै २०२४ रोजी वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघोली येथे ही एसटीचे चाक निखळल्याची घटना घडली होती.

बेरिंग तुटल्याने दुर्घटना

वसई वज्रेश्वरी मार्गावर घडलेल्या घटनेनंतर एसटी मंडळाच्या तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत सदर घटनेचा तपास करण्यात आला आहे. बस ची बेरिंग तुटल्याने चाक निघाले असल्याची माहिती पालघर जिल्हा विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतेही जिवीतहानी झाली नाही असेही त्यांनी सांगितले आहे. एसटी च्या बसेसची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यात काही त्रुटी असतील तर वेळीच दुरुस्त करून रस्त्यावर आणल्या जातात. प्रवाशांना सुरक्षित व चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.