सुहास बिर्हाडे
वसई : खासगी बसेसची परराज्यातून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार वसई विरार शहरात उघडकीस आला आहे. अशाप्रकारची ३४ बेकायदेशीर वाहने रस्त्यावर धावत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. भंगारात गेलेली वाहने दुरूस्त करून किंवा चोरीच्या इंजिनाच्या आधारे पुनर्निमाण करून आणली जात असण्याची शक्यता आहे. सर्वच शहरात अशी वाहने असून या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) केली जाते. वाहनांची नोंदणी करता त्याचे इंजिन आणि चेसीस क्रमांक तपासले जाते आणि मग अधिकृत नोंदणी करून क्रमांक दिला जातो. वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्या आणि औद्योगिक वसाहती आणि शाळा आहेत. आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांंसाठी तसेच कंपन्यांना कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी बसेसची आवश्यकता असते. त्यासाठी खासगी ठेकेदारांकडून बसेस घेतल्या जातात. मात्र आता या बसेस बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी केली असता एका बसेसची नोंदणी ही हिमाचल प्रदेशातील होती. मात्र त्याचे इंजिन आणि चेसिस क्रमांक वेगळा होता. ही तफावत असल्याने अधिकार्यांना संशय आला. मात्र संबधित बस मालक समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. अशा प्रकारच्या संशयास्पद नोंदणी केलेल्या ३४ बसेस वसई विरारच्या रस्त्यावर असल्याची तक्रार उपप्रादेशिक विभागाने विरार पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा… भरले ८५ लाख मिळाले फक्त १८ हजार; वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक
या प्रकरणी विरार पोलिसांनी एका बसचे मालक प्रवीण राऊत याच्याविरोधात फसवणुक तसेच बनवाट दस्तावेज बनविल्याप्रकरणी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८,४७१, १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. मागील २ ते ३ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता प्रादेशिक विभाग सावध झाला आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आम्ही या वाहनांची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तक्रार दिली आहे. आम्ही इतर वाहनांची तपासणी करत आहोत, अशी माहिती वसईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले.
हेही वाचा… नयना महंत हत्याप्रकरणी ६२२ पानांचे दोषारोपपत्र, मोहरीचे रोप आणि बादलीतील पाणी महत्वाचा पुरावा
चोरीचे इंजिन आणि भंगारातील वाहने नव्याने रस्त्यावर
या बेकायदेशीर वाहनांबाबत पोलीस वेगवेगळ्या शक्यतांवर तपास करत आहेत. राज्यात ८ वर्ष जुन्या वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे ही भंगार झालेली वाहने परराज्यात फेरफार करून नोंदणी करून राज्यातील रस्त्यावर आणली जात असल्याची एक शक्यता आहे. तर चोरीच्या वाहनांचे इंजिन वापरून बनविवेली ही वाहने असल्याची आणखी एक शक्यता आहे. आम्ही सर्व शक्यता पडताळून तपास करत आहोत, अशी माहिती विरारचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांनी दिली.
राज्यातील अनेक शहरात बेकायदेशीर बसेस
या प्रकरणामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. इतर अनेक परराज्यातून वाहनांची नोंदणी करून त्या महाराष्ट्रातील विविध शहरातील रस्त्यावर आणल्या आहेत. अशा प्रकारचा एक गुन्हा नवी मुंबई येथेही दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.