वसई- आरती यादव हत्या प्रकरण ताजे असतानाच विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर २७ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला तिच्या पतीने केला असून प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे. सध्या महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२७ वर्षीय महिला विरशीला कामावर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आली होती. सकाळी ७ च्या सुमारास ती विरार स्थानकाच्या दक्षिण पूलावर (एफओबी) जात असताना मागून आलेल्या तिच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक प्रवाशांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपी शिव शर्मा याला ताब्यात घेतले. त्याला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जखमी महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही याबाबत महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करू, असे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तुंबडा याने सांगितले.

हेही वाचा – पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

हेही वाचा – भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग, वसई रेल्वे स्थानक परिसरातील घटना

मागील महिन्यात वसईत भर रस्त्यात आरती यादव या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Story img Loader