लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: नालासोपाऱ्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेलेल्या महिलेचा विद्युत वाहक तारेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. जयंती देवराव म्हात्रे (७४) असे या महिलेचे नाव असून गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घटना घडली.

जयंती म्हात्रे या नालासोपारा पश्चिमेच्या नाळागाव, देवीच्या वाडी समोर गायवाडी येथे राहत आहेत. गुरुवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी ही महिला घराच्या समोर असलेल्या गेट समोर उभी होती. याचा भागातून महावितरणची वीज वाहक वाहिनी गेली आहे. या वाहिनीला स्पर्श झाल्याने जयंती म्हात्रे यांना विजेचा धक्का लागून त्या खाली कोसळल्या.

आणखी वाचा-मुंबईत तब्बल २८ तास विसर्जन मिरवणुकांची लगबग

त्यानंतर त्यांना त्यांची मुले दिलीप व वंदेश यांनी कुटुंबातील इतर लोकांच्या मदतीने नालासोपारा पश्चिम समेळपाडा येथील पालीकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना महावितरण व पालिका प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप म्हात्रे कुटुंबियांनी केला आहे.

Story img Loader