मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या महिलेने मुलीची हत्या केली आहे. हत्या दडपण्यासाठी मुलीने गळफास लावल्याचे आईने पोलिसांना सांगितले होते. मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. हत्या करण्यासाठी तिच्या अल्पवयीन बहिणीने देखील मदत केली. शनिवारी पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबे हिला अटक केली आहे.

अस्मिता दुबे (२०) ही तरुणी नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील फेज मधली जय विजय नगरी या इमारतीत आई वडिल तसेच लहान बहिणीसह रहात होती. गुरूवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई ममता दुबे (४६) हीने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तिचा चेहरा सुजलेला होता तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याने निशाण होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मितची मृत्यू ही आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले.

गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या

याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले की, मयत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती. तिने मुलीला बेदम मारहाण केली. तिची १७ वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातावर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. ही हत्या दडपण्यासाठी तिने अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ११५ (२) ३५१ (२) ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दुसरी आरोपी अल्वपयीन असल्याने तिला सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणात मुलीच्या वडिलांची भूमिका काय तसेच घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader