वसई- सीमा शुल्क अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. आरोपी याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि घर घेण्याच्या नावाखाली तिच्याकडून १ कोटी रुपये देखील घेतल्याची तक्रार महिलेने केली आहे. आचोळे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पीडित महिला ४२ वर्षांची आहे. २०२२ मध्ये आऱोपी योगेश मानकर (३९) याच्याशी ओळख झाली होती. पीडित महिलेने दिेलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मानकर याने तिला सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. याशिवाय घर खरेदी करण्यासाठी १ कोटी ३ लाख रुपये घेतले होते. हा सगळा प्रकार जून २०२२ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने आचोळे पोलीस ठाणे गाठले. आचोळे पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.