वसई- विरार मध्ये सुटकेस मध्ये आढळलेल्या महिलेच्या कवटी प्रकरणात त्या महिलेचे धड मांडवी पोलिसांनी मंगळवारी नाल्यातून हस्तगत केले. सुमारे ४ तासा नाल्यात शोधमोहिमेनंतर हे धढ मिळाले. ८ जानेवारी रोजी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शीर वेगळे केले होते. १४ मार्च रोजी हा प्रकार समोर आला होता.
नालासोपारा मधील रेहमत नगर मध्ये राहणारी उत्पला हिप्परगी (५१) या महिलेची कवटी विरार फाटा येथील पिरकुंडा दर्गाजवळील झुडपात आढळली होती. मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. घटनास्थळी आढळलेल्या एका सराफाच्या बटव्यावरून महिलेची ओळख पटविण्यात आली होती. त्यानंतर पुढील तांत्रिक तपास करून महिलेचा पती हरिष हिप्परगी (४९) याला अटक करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून त्याने पत्नीची हत्या केली होती. ८ जानेवारी २०२५ रोजी त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर विरारच्या देशमुख फार्म जवळ नेऊन तिचे डोके कोयत्याने कापले. यानंतर तिचे घड नाल्यात फेकले तर डोके एका सुटकेस मध्ये घालून विरार फाटा येथील पिरकुंडा दर्ग्याजवळ टाकून दिले होते.
याप्रकरणाचा तपास मांडवी पोलीस करत आहेत. मंगळवारी सकाळी मांडवी पोलिसांनी अग्नीशमनदलाच्या जवानांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. हा नाला मोठा असल्याने धड सापडणे कठीण वाटत होते. पोलिसांनी आरोपी हरिष हिप्परगी याला देखील घटनास्थळी आणले होते. त्याने नेमकी जागा दाखवली. सुमार ४ तासांच्या शोध मोहिमेनंतर तिचे धढ आढळले. पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतेले. हे धड कुजलेल्या अवस्थेत आहे आम्ही ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
उत्पला हिप्परगी ही महिला मुळची पश्चिम बंगालच्या नैहाटी गावात राहणारी होती.२५ वर्षांपूर्वी ती पती आणि मुलाला सोडून मुंबईलआ आली होती. त्यानंतर एका बार मध्ये ती काम करत होती. त्या बार मध्ये काम करणार्या हरिश हिप्परगी याच्याबरोबर तिची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न केले. दरम्यान बार बंद झाल्यानंतर हरिशने इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आणि ते मुंबई सोडून नालासोपारा येथे राहण्यासाठी आले. त्यांना २२ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद वाढले. उत्पला मध्ये गावी जात होती आणि ४-४ महिने गावी मुक्काम करायची. ती मुलाला घेऊन सोडून जाण्याची धमकी देत होती. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. अखेर ८ जानेवारीच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि हरिशने गळा आवळून तिची हत्या केली.