वसई– प्रेयसीने बोलावल्यानंतर तिच्या घरी गेलेल्या तरुणावर प्रेयसीच्या आईनेच चाकूने हल्ला केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तुळींज पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वसई : खासगी शिकवणीचालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

इम्रान खान (२०) हा तरुणा नालासोपारा पुर्वेला तुळींज येथे राहतो. त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. शनिवार ४ डिसेंबर रोजी त्याच्या प्रेयसीने त्याला भेटायला ओम नगर येथील घरी बोलावले होते. त्यानुसार रात्री इम्रान तिच्या घरी गेला होता. तो इमारतीचा जीना चढत असताना इम्रानच्या प्रेयसीच्या आईने गाठले आणि चाकूने त्याच्या पोटात वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इम्रान जखमी होऊन खाली कोसळला. त्याला पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयातली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. रुग्णालयातून ही माहिती गुरूवारी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोर महिलेच्या विरोधात कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आम्ही आरोपीचा जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गित्ते यांनी दिली. इम्रान आणि आरोपी महिलेच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्या दिवशी इम्रानची प्रेयसी झिलमिल हिने इम्रानला भेटायला बोलावले होते. त्यामुळे इम्रान गेला होता. पण त्याचा विश्वाघात करून त्याच्यावर झिलमिलच्या आईने हल्ला केल्याची माहिती इम्रानचा मोठा भाऊ सलमान खान याने दिली. इम्रान आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे नेमका हल्ला का केला ते समजले नाही. पोलिसांनी अद्याप काही कारवाई केली नाही, असेही तो म्हणाला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman stabs daughter boyfriend in nalasopara zws