वसई : मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. ३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावर घडणारे अपघातग्रस्त नागरिक व या भागाला लागूनच असलेल्या गावपाड्यातील नागरिकांची वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी परवड होत होती.
हीच समस्या लक्षात घेऊन २०१४ मध्ये महामार्गावरील खानिवडे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.यासाठी सर्व्हे क्रमांक १४८ व १६२ मधील ०.९९ हेक्टर इतकी जागा ही निश्चित करण्यात आली होती.मात्र या रुग्णालयाच्या कामात वनविभागाच्या जागेचा हस्तांतरण प्रश्न, आराखड्यातील बदल,प्रशासकीय मंजुरी साठी झालेला विलंब अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जवळपास दहा वर्षे या रुग्णालयाचे काम रखडले होते.
हेही वाचा…नालासोपाऱ्यात परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट, चार जण जखमी
या बांधकामाच्या आराखड्याच्या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.अधिक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ, कोकण भवन, यांच्या मार्फत ही इमारतीचे आरसीसी आराखडा तपासून घेण्यात आला आहे. उभारण्यात येणारे रुग्णालय हे दोन मजली असून त्याचे क्षेत्र ३ हजार ३९९ चौरस मीटर इतके आहे. या बांधकामासाठी १३ कोटी ३२ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.सद्यस्थितीत पायाचे खोदकाम, आरसीसी कॉलम उभे करणे, पीसीसी अशी कामे सुरू झाली आहेत. या रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यास दीड ते दोन वर्षे जरी लागणार असली तरी मार्च अखेर पर्यंत आम्ही या इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चर उभे करणार आहोत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय यादव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
अशी असेल सुविधा
तळ मजला- मेडिकल स्टोअर, पोलिस चौकी, स्टोअर
पहिला मजला – पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी कक्ष, रक्तपेढी,
एक्स-रे कक्ष, ओपीडी ४, ड्रेसिंग कक्ष, रीफ्रेंक्शन कक्ष, रीकव्हरी कक्ष.
दुसरा मजला-कॉन्फरन्स हॉल, आस्थपना विभाग, वैद्यकिय अधिक्षक कक्ष, मेलवॉर्ड, पेडियाट्रीक वॉर्ड, जनरल वार्ड, लेबर कक्ष, प्रसाधनगृह याचा समावेश आहे.
खानिवडे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. लवकरात लवकर काम कसे पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधूनमधून प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी जाऊन त्याचा आढावा घेतला जात आहे. संजय यादव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई.