लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मासवण येथील उदंचन केंद्रातील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने पाणी पुरवठण्यावर परिणाम होत आहे. यासाठी येथील वीज वाहक तारा संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अद्याप हे काम झाले नसल्याने येत्या पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा ठप्प होण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

मागील आठवड्यात एमएमआरडीएच्या सुर्या पाणी प्रकल्प योजनेतील कवडास येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील रोहित्र नादुरूस्त झाल्याने शहराला होणारा १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा ठप्प झाला होता. आठवडाभवर वसई विरार शहराला पाणी टंचाई भेडसावत होती. दुसरीकडे सुर्या प्रकल्पाच्या २०० दशलक्ष लिटर्सच्या जुन्या योजनेलाही सतत वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या भेडसावत असते. यासाठी मासवण उंदचन केंद्रातील वीज वाहक तारा संरक्षित करण्यात प्रस्ताव होता. मात्र अद्याप ते काम झालेले नाही.

वसई विरार शहराला सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लीटर, उसगाव २०, पेल्हार १० असा एकूण २३० दशलक्ष तर एमएमआरडीएच्या योजनेतून १४० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर्स पाणी हे सुर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघर जवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुध्दीकरण केले जाते. मासवण उदंचन केंद्रात ३०० हॉर्स पॉवरचे ७ पंप आहेत तर धुकणट केंद्रात ८०० हॉर्स पॉवरचे ३ आणि ६०० हॉर्स पॉवरचे ४ असे एकूण १४ पंप आहेत. दोन्ही ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा होतो.

उदंचन केंद्रात पाणी आणणे, ते शुध्दीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेची वीज लागते. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा देखील खंडित होतो. एक मिनिट जरी वीज खंडीत झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू होण्याासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणी पुरवठा बराच काळ खंडित होतो आणि पुढील पाणीपुरवठा देखील अनियमित दाबाने होत असतो. सुर्या प्रकल्पाला वीज पुरवठा करणार्‍या साडेचार किलोमीटर लांबीच्या या वीजवाहक तारा आहेत. त्या जंगलातून येतात. त्यामुळे विविध नैसर्गिक आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होत राहतो.

यासाठी पाणी प्रकल्पाच्या सर्व वीज वाहक तारा या प्लास्टिकच्या आच्छादनाने (कोर कंडक्टर) संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अद्याप हे काम झालेले नाही. परिणामी येत्या पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे संकट कायम आहे.