विरार : पालघर जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून मागील वर्षांच्या तुलनेत बाराशे रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार केंद्र आणि जनजागृतीचा अभाव असल्याने शहरांत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या जिल्ह्यात साडेचार हजारांहून अधिक एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचार घेत आहे. 

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. दोन दशकांपूर्वी एचआयव्हीने धुमाकूळ घातला असताना तो नियंत्रणात आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. यामुळे निर्माण झालेली जनजागृती आणि इतर उपाययोजनांमुळे एचआयव्हीचे प्रमाण नियंत्रणात असले तरी ते कमी झालेल नाही. पालघर जिल्ह्यात मागील वर्षांच्या तुलनेत यंदा एचआयव्हीग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

पालघरसह मीरा-भाईंदर शहरात सध्या चार हजार ५२० एआयव्हीबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी वसई, विरार आणि पालघरमध्ये १२१७ रुग्णांची भर पडली आहे.

सध्या वसई, विरारमध्ये एक हजार ८३८ तर पालघर मध्ये एक हजार ४१२ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील वर्षी वसई, विरार आणि पालघरमध्ये २०३३ रूग्ण उपचार घेत होते. हे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

एआरटी केंद्रात चाचण्या वाढविण्याची गरज

एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी एचआरडी (अ‍ॅण्टी रेट्रोव्हायरल थेरेपी) केंद्राची आवश्यकता असते. या केंद्रात एचआयव्हीग्रस्त रुग्णांचे उपचार, समुपदेशन आणि औषधे दिली जातात. हे केंद्र नसल्याने एचआयव्हीग्रस्त रुग्णांना उपचार मिळत नव्हते. पूर्वा केवळ मीर भाईंदर शहरात एकमेव केंद्र असल्याने पालघर जिल्ह्यातील रुग्णांना या केंद्रात जावे लागत होते. मात्र या वर्षांत  पालघर आणि वसई येथे एआरडी केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पालिकेच्या सर डी एम पेटीट रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यात सध्या २५ रुग्ण उपचार घेत आहेत. पण या केंद्रात नव्या रुग्णांच्या चाचण्या होत नसल्याने त्यांना चाचणी साठी मीरा भाईंदर येथील मख्य केंद्रवर जावे लागत आहे. त्यातही मुख्य केंद्रावर अभियांत्रीकी कायमस्वरूपी नसल्याने केवळ तीन दिवस चाचणीचे काम केले जात आहे. त्यातही ठरावीक संख्येचे रुग्ण घेतले जात असल्याने अनेक वेळा रुग्णांची मोठी फरफट होत आहे. यामुळे या केंद्रावर चाचण्यांच्या वेळा वाढविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

माहितीचा अभाव

काही वर्षांपूर्वी शासकीय स्तरावर एचआयव्हीबाबत मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यात येत होती. मात्र ही मोहीम थंडावली आहे. केवळ जागतिक एड्स दिनाच्या दिवशी केवळ वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. पण वर्षभर या संदर्भात कोणतेही उपक्रम घेतले जात नाहीत. यामुळे माहितीच्या अभावामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे शासनाकडून वर्षभर विविध उपक्रमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे रुग्णांनी सांगितले.

एचआयव्हीग्रस्त 

वसई- १ हजार ८३८

पालघर- १ हजार २१७

मीरा-भाईंदर – १ हजार २७०

Story img Loader