वसई – बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढत असल्याने बालकांचे कुपोषित होण्याचे प्रमाणवही वाढले आहे. दर १० पैकी ९ मुले ही दुसर्या वर्षात कुपोषित असतात अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवालातून समोर आली. आईने बाटलीऐवजी बाळाला स्वत:चे दूध पाजण्याचे आवाहन जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्ताने करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल दर ५ वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मागील १० वर्षांत बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण शून्य होणे गरजेच आहे. नवजात बालकाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान दिले पाहिजे. यातून बाळाला सर्व जीवनसत्त्वे, आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक मिळत असतात. ज्यामुळे बाळाला पोटाचे विकार, एलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार होण्याचे धोके कमी होतात. बाळाच्या जन्मानंतर २० मिनिटांच्या आत बाळाला आईच्या छातीवर झोपवून दूध देणे म्हणजे एकप्रकारचे लसीकरणच आहे. येथूनच बाळाची रोगप्रतिकारण शक्ती निर्माण होण्यास सुरुवात होते.
हेही वाचा – अमरावती : संभाजी भिडेंना राजापेठ पोलिसांकडून नोटीस
स्तनपान होत नसल्याने १० पैकी ९ मुले दुसर्या वाढदिवसाला कुपोषित होतात असे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितले. सतत ६ महिने आईचे दूध बाळाला मिळणे गरजेचे आहे. देशात दररजो ७० हजार बालके जन्माला येतात. अनेकदा आईचे दूध न देता पातळ अन्न दिले जाते. त्यामुळे उपासमार होते. उंची, वजन आणि मेंदूने वाढ होत नाही, असे डॉ जोशी यांनी सांगितले. आईचे दूध कमी असेल तेव्हा मांडीवर बसून मऊ वरणभात. दिड महिन्यापासूनच द्यायला हवे तरच बालके सुद्रुढ होतील, असेही ते म्हणाले. एक ते दीड वर्ष स्तनपान केल्यामुळे शरिरातील चरबी घटण्यास मदत होते. स्तन, गर्भाशय, बीजकोष आदींचे कर्करोग होण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे स्तनपान हे बाळासह आईसाठीही लाभदायक असते असेही डॉ जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा – राईस मिल कुणाच्या मालकीची? प्रॉपर्टीच्या वादावरून काका पुतण्यात तुफान हाणामारी
हिरकणी कक्ष आणि दूध बॅंकेची आवश्यकता
महिला विविध कारणांनी बाहेर जातात, पण त्या बाळाला घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण बाळाला भूक लागल्यावर स्तनपान कसे आणि कुठे करावे हा मोठा प्रश्न उभा राहातो. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष मोजकेच उपलब्ध आहेत. वसई विरार शहरात काही शासकीय, खाजगी रुग्णालये आणि अन्य ठिकाणे वगळता हिरकणी कक्ष उपलब्ध नाहीत. यामुळे महिलांना लांबचा, जवळचा प्रवास करताना समस्या येत आहेत. महिलांना स्तनपान करता यावे यासाठी शासनाने जागोजागी हिरकणी कक्ष मोठ्या प्रमाणात उभारले पाहिजे आणि त्याबाबतची जनजागृती केली पाहिजे. याशिवाय मिल्क बॅंक तयार केल्यास कुपोषित बालकांना दूध मिळू शकेल, असे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले. मॉल, करणमुकीची ठिकाणे, पर्यंटन स्थळे, आदी ठिकाणीही हिरकणी कक्ष बनवले पाहिजे. ज्याप्रमाणे प्रसानधगृह कुठे आहेत हे सांगणारे ॲप आहेत तसेच हिरकणी कक्ष कुठे आहेत हे सांगणारे ॲपही विकसित केले पाहिजेत, असे पालिकेच्या जूचंद्र येथील माता बालसंगोपन केंद्राच्या डॉक्टर गायत्री गोरक्ष यांनी सांगितले. पालिकेच्या सर्व रुग्णालयात हिरकणी कक्ष असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.