सुहास बिर्हाडे, लोकसत्ता
वसई- सध्या आहारशैलीत व्हिगन शैली स्विकारण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे व्हिगन पाकिटबंद पदार्थांचे सेवन मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढले आहे. अनेक कंपन्या व्हिगन पदार्थांच्या उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. वसईसह मुंबई परिसरात व्हिगन कॅफे सुरू होऊ लागली आहेत.
शाकाहारी असणे याची पुढची पायरी म्हणजे व्हिगन. व्हिगन जीवनशैली ही निरोगी शरिरासाठी आणि पर्यावरण संरक्षण-संवर्धन हा हेतूने स्विकारली जात असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारतात मुख्यत्त्वे मांसाहारी पदार्थांना पर्यायी व्हिगन मीट बनवण्याऱ्या उत्पादन कंपन्या अधिक असून, याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हे बनवण्यासाठी सोया, कच्च्या फणसाचा गर, काबुली चणे वापरले जातात. आत्तापर्यंत व्हिगन मीटची सर्वाधिक विक्री उत्तर भारतात झालेली आहे. साधारण ९२ टक्के विक्री पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात झाली आहे. मात्र आता हळूहळू मुंबई, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आदी ठिकाणी विक्री वाढली आहे, ही माहिती ऑक्टोबर २०२३ च्या इंडियन व्हिगन फूड मार्केट अनॅलिसिस अहवालात प्रसिद्ध झाली आहे.
हेही वाचा >>> Health Special: प्री-हॅबिलिटेशन काय असतं आणि ते इतकं महत्त्वाचं का?
२०१८ मध्ये ३०० कोटी एवढेच व्हिगन किंवा प्लांट बेस्ड मीटचा व्यवसाय होता, मात्र २०२३ सप्टेंबरपर्यंत १ हजार ३७२ पूर्णांक ३ दशलक्ष युएस डॉलर एवढा व्यवसाय झाला आहे. व्हिगनिझमविषयी तारे-तारकांकडून मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्यामुळे तसेच याविषयी ऑनलाईन खूप बोलले जात असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. सर्वाधिक व्यक्ती व्हिगनकडे आरोग्यदायी जीवनासाठी वळत आहेत तर १७ ते १८ टक्के व्यक्ती या पर्यावरण संवर्धन-संरक्षण या हेतूने व्हिगन होत आहेत. सध्या व्हिगन पदार्थांची सर्वाधिक विक्री ऑनलाईन होत आहे. मात्र पुन्हा ऑर्डर येण्याचे प्रमाणात हे केवळ २१ टक्के आहे. गेल्या तीन वर्षात हे प्रमाण १३ पटीने वाढले आहे, ही माहिती जेष्ठ व्यवसाय सल्लागार आणि विश्लेषक अशोक यशवंत यांनी दिली.
हेही वाचा >>> Health Special: पोषक सुपांची गोष्ट
रत्नागिरीतील संगमेश्वरमधील कळंबनेसर गावात कच्च्या फणासाचा गर स्वच्छ करून, अर्धे शिजवून कंपन्याना पुरवला जातो. हा व्यवसाय करणारे योगेश गांधी यांनी सांगितले की मागील वर्षी त्यांनी तब्बल ३ हजार किलो फणसाचा गर पाठवला होता. तर यंदा हा आकडा ७ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या व्हिगन फूड स्टार्टअपमध्ये मोठे सेलिब्रेटी गुंतवणूक करत आहेत.गेल्या दोन वर्षात तब्बल ३ हजार कोटींची गुंतवणूक या इंडस्ट्रीत झाली आहे. यामुळे व्हिगन पदार्थांचे उत्पादन वाढत असून, येत्या काळात भारतातून मोठ्या प्रमाणात हे पदार्थ निर्यात होतील, असेही के फार्माचे अध्यक्ष योगेश गांधी यांनी सांगितले.
व्हिगन कॅफे, रेस्टॉरेंटसमध्ये वाढ
व्हिगन कॅफे आणि रेस्टॉरेंटची संख्या देखील वाढू लागली आहे. व्हिगन मेन्यू, व्हिगन रेस्टॉरंट्स, बेकरी, कॅफेजही सुरू होत आहेत. वसईत पिंक सॉल्ट कॅफे, कॅफे रेलिश, अंधेरीत आहारवेद, कांदिवलीत सॅन मारझानो, ग्रीन हाऊस कॅफे, बोरीवलीत व्हिगन केक्री आदी काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत. आजकाल बेकरीत सहज व्हिगन केक मिळू लागले आहेत. अनेक बड्या रेस्टॉरंट्समध्ये जैनप्रमाणे व्हिगन मेन्यू उपलब्ध असतो. तर कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये खोबऱ्याची भाकरी, सोया पनीरची भाजी, हमस, काजू चीझ घातलेला पिझ्झा, तिळाचा सॉस घातलेले सॅलेड, ओट्सचे दही वडे असे भन्नाट पदार्थ मिळतात. मात्र यांचा मुख्य व्यवसाय हा ऑनलाईन फूड अॅग्रीगेटर्सवर अवलंबून आहे, असे एंजल गुंतवणुकदार एल. सहानी यांनी सांगितले.