वसई : दुचाकीवरून मित्रासोबत महाविद्यालयात जाणार्‍या २३ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी मिरा रोडच्या मेडतिया नगर येथे ही घटना घडली. दुचाकी भरधाव वेगाने जात असताना तिच्या मित्राने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी पलटी झाली आणि हा अपघात घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोरम शहा (२३) ही तरूणी बोरीवलीत राहते तर तिचा मित्र हर्ष शहा हा भाईंदर येथे राहतो. दोघे मिरा रोड येथील एका महाविद्यालयात शिकत होते. सध्या परिक्षा असल्याने फोरम हर्षच्या घरी आली होती. दुपारी ते दोघे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले. हर्षच्या दुचाकीवर ( ॲक्टीवा एमएच ०४ एचसी ०९६१) फोरम मागे बसली होती.दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट येथील मेडतिया नगर येथून जात होते. यावेळी समोर एक बस असल्याने अचानक हर्षने दुचाकीचा ब्रेक लावला. यामुळे भरधाव वेगात असलेली दुचाकी पलटी झाली आणि मागे बसलेली फोरम रस्त्यावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा…वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना

दुचाकी भरधाव वेगात असल्याने नियंत्रण सुटले आणि बसला पाहून त्याने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडल्याचे नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले. दुचाकी चालक हर्ष शहा याच्या विरोधात आम्ही कलम २७९, ३०४ अ, ३३७,३३८ तसेच मोटार वाहन कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे नया नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कड यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young college going girl dies in tragic two wheeler accident in mira road psg