वसई : वसईत राहणार्‍या एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडर मधील वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केल्याचा आगळावेगळा प्रकार बुधवारी उघडकीस आला. श्रेय अग्रवाल (२७) असे या तरुणाचे नाव आहे. कामण येथील स्पॅनिश व्हिला परिसरातील क्लस्टर ०९ या बंगल्यात बुधवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह सिलेंडरसोबत बांधलेला आढळला. विशेष म्हणजे वायूदुर्घटना होऊ नये यासाठी त्याने घराच्या खिडक्या बंद केल्या होत्या तसेच चिकटपट्टी लावून धोक्याची सुचना लिहून ठेवली होती.

श्रेय अग्रवाल (२७) हा तरुण वसई पूर्वेच्या हा कामण परिसरात असलेल्या स्पॅनिश व्हिला येथील ‘क्लस्टर ०९’ या बंगल्यात मागील एक वर्षांपासून भाड्याने रहात होता. दोन दिवसांपासून त्याच्याशी संपर्क होत नसल्याने श्रेयच्या बहिणीने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. मुंबई गुन्हे शाखेने त्याचा तपास सुरू केला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते वसईच्या कामण येथे निघाले. मुंबई गुन्हे शाखेने मग याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. नायगाव पोलीस त्याचे छायाचित्र घेऊन स्पॅनिश व्हिला बंगल्यात पोहोचले. ‘क्लस्टर ०९’ या बंगल्यात मागील एक वर्षांपासून रहात असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.

दारात धोक्याची सुचना देणारी चिठ्ठी

पोलीस बंगल्यात गेले तर बंगला पूर्ण बंद होता आणि कुबट दुर्गंधी येत होती. दारातच इंग्रजीमध्ये सावधगिरीची सुचना देणारी चिठ्ठी लावलेली आढळली. संपूर्ण घरात कार्बनमोनॉक्साईड पसरला असून दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल (कार्बन मोनॉक्साईड इनसाईड..डोन्ट स्वीच ऑन लाईट) असे इंग्रजीत लिहून ठेवलाला मजकूर होता नायगाव पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून अग्निशमन दलाला पाचारण केले. कार्बन मोनॉक्साईड हा प्राणघातक वायू असल्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी पीपीई किट व श्वसनासाठी लागणारा बीए सेट (ब्रिथिंग अपॅरटस सेट) करून हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या साह्याने बेडरूमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. आतील दृश्य धक्कादायक होते.

स्वत:ला सिलेंडरने बांधून सिलेंडरचा गॅस शरिरात घेतला…

श्रेयने कार्बन मोनॉक्साईड सिलेंडरची योग्यरीत्या मांडणी केली होती. दोन सिलेंडर दोन्ही हाताला बांधून डोक्यात हेल्मेट घातले होते. गॅस सिलेंडरला एक नळी जोडली आणि ती नळी श्वसनासाठी वापरला जाणार्‍या नॅब्युलाईझरद्वारे तोंडाद्वारे धरली होती. त्याद्वारे विषारी कार्बनमोनॉक्साईड गॅस शरीरात ओढून घेतला होता. अग्निशमन दलाने सावधानपूर्वक परिस्थिती हाताळून त्याच्या तोंडातली नळी चाकूने कापली आणि त्या सिलेंडर च्या जोडणी पासून वेगळा केला. त्याचे शरीर सुजले होते. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

आत्महत्येची योजना आणि खबरदारी

विषारी वायूने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचा अन्य कुणाला त्रास होऊ नये याची त्याने खबरदारी घेतली होती. घरात त्याने चिकटपट्टी लावून बेडरूम मध्ये कसा प्रवेश करावा याची सूचना लिहून ठेवली होती. घरातील खिडक्यांना लाकडी प्लाय लावून ते बंद केले होते. तसेच वायू बाहेर जाऊ नये यासाठी चिकटपट्टी लावून ठेवली होती, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली.

एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने एका भींतीवर लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्याच्या घरात ५ कार्बनमोनॉक्साईडचे सिलेंडर आढळले. रोहीत विश्वकर्मा या सुताराने दोन दिवसापूर्वी त्याच्या घरात लाकडी प्लायने खिडक्या बंद केल्या होत्या. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने हे सिलेंडर कुठून आणले याचा पोलीस तपास करत आहेत.