वसई- वसई पूर्वेच्या वसंत नगरी मैदानात आयोजित होळी मेळाव्यात वीजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकारानंतर नागरिकांनी मेळाच्या साहित्याची तोडफोड केली. आचोळे पोलिसांनी मेळाव्याच्या आयोजकांना ताब्यात घेतले आहे.
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे खेळाचे मैदान आहे. मात्र तरी देखील पालिकेने या मैदानात मेळाव्याला परवागनी दिली होती. ७ मार्च रोजी येथे होळी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. २१ मार्च रोजी हा मेळावा संपणार होता. या मेळाव्यात विविध मनोरंजनाचे आणि खेळण्याचे साहित्य आणण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी काही तरुणांचा ग्रुप मेळाव्यात फिरण्यासाठी आला होता. आकाशपाळणा बघत होते. त्यावेळी हर्ष सेन (२१) या तरुणाने तेथील एका खांबाला हात लावला. त्याचवेळी आकाशपाळण्यातून आलेला वीज प्रवाहाचा झटका त्याला लागाल आणि तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. हर्ष हा नालासोपारा येथील संयुक्त नगर मध्ये राहणारा होता. तो इन्स्टाग्रामवर रिल बनवायचा.
या प्रकारामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले. हर्ष सोबत असलेले मित्र आणि अन्य नागरिकांनी मेळाव्यात असलेल्या साहित्याची तोडफोड केली.मेळाव्यात दुर्घटनेची शक्यता वर्तवली होती. वसंत नगरी हा निवासी संकुलाचा परिसर आहे. येथे खेळण्याचे हे एकमेव मैदान आहे. त्याचा व्यावसायिक कार्यक्रम, लग्न समारंभ आदींसाठी स्थानिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाने ६ मार्चला आयुक्त अनिलकुमार पवार यांना लेखी पत्र पाठवून या मेळाव्याची परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. मेळाव्यात बेकायदेशीर वीजेचा वापर होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे अशी सावधगिरीची सुचना देखील पत्रात केली होती. मात्र तरी त्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले असा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव रवी भूषण यांनी केला आहे.