लोकसत्ता विशेष प्रतिनीधी
वसई- नालासोपाार पूर्वेच्या गावराईपाडा येथे भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुधीर सिंग असे या हल्ल्याच मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
कांदिवलीत राहणारा सुधीर सिंग (२७) हा शुक्रवारी दुपारी वसई पूर्वेला एका चाळीतील घर बघण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत वसईच्या वालईपाड्यात राहणारा त्याचा मित्र वैभव मिश्रा होता. यावेळी ६ ते ७ जणांच्या जमावाने सुधीर याला पकडून जवळील यादवेश विद्यालयाच्या एका मोकळ्या जागेत नेले आणि मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले. या मारहाणीत सुधीर सिंग याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, २०२३ मध्ये १९ बोगस डॉक्टरांवर कारवाई
पेल्हार पोलिसांनी दोन हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. पूर्ववैमन्यसातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा कयास आहे. मयत सुधीर सिंग हा पूर्वी नालासोपारा येथे रहात होता. सध्या तो कांदिवली येथे राहण्यासाठी गेला होता. आरोपींनी त्याला जागा दाखविण्याच्या निमित्ताने बोलावून त्याची हत्या केली, असे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहे. आम्ही लवकरच आरोपीला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.