सुसंस्कृत वसईत भर रस्त्यात एक माथेफिरू एका तरुणीवर सपासप वार करून हत्या करतो आणि तिथे उपस्थित असलेला जमाव तिला मदत करायची सोडून चित्रफिती बनवतो. ही घटना केवळ संतापजनक नाही तर मन बधीर करणारी..सुन्न करणारी आहे. तिथे असलेला जमाव एवढा संवेदनाशून्य आणि थंड कसा ? असा सवाल विचारला जातोय. पण जी घटना घडली ती वसई आमची नाही.. वसई शूरविरांचा वारसा सांगणारी, लढवय्या लोकांची, सुसंस्कृत आणि संवेदना जपणारी आहे. वसईच्या भूमीत परप्रांतियांचे अतिक्रमण झाले आहे. त्या परप्रांतियांच्या भागात ही कलंकित कऱणारी घटना घडली आहे..मूळ वसईत ही घटना घडली असती तर हजारो वसईकरांचे हात नक्कीच मदतीसाठी सरसावले असते. पण वसईत एक ‘दुसरी वसई’ तयार होत आहे. अनधिकृत वसाहतींची, परप्रांतियांची, बकाल आणि मठ्ठ लोकांची… ही वसई आमची वसई नाही….

वसई हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यांपुढे एक सुसंस्कृत नगरी समोर येते. पोर्तुगिजांच्या ताब्यातून वसई जिंकणार्‍या शुरवीर चिमाजी अप्पांच्या शौर्यांचा वारसा असलेली ही नगरी. अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुध्दांचा शांतीचा संदेश जगभर नेणारी शूर्पारक नगरी…ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सुसंस्कृत अशी वसईची ओळख. पश्चिम पट्ट्यातील निळाशार समुद्र आणि हिरव्यागार वनराईची निसर्गाची संपदा. ख्रिस्ती, कोळी, आगरी, वाडवळ, भंडारी, सामवेदी, कुपारी, आदिवासी, बौध्द हे वसईचे स्थानिक भूमीपुपत्र. हिंदू-मुस्लिम समाज इथे गुण्यागोविंदाने रहात आलाय. अशा वसईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. वसई पूर्वेच्या गावराईपाडा येथे भर रस्त्यात शेकडो लोकांच्या समोर आरती यादव या विशीतल्या तरुणीची माथेफिरू प्रियकराकडून निर्घृण हत्या कऱण्यात आली. तो तरुण तिच्यावर सपासप वार करत होता… पण गर्दी मख्खपणे तो रक्तरंजित थरार बघत होती…आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद करत होती. एका तरुणाचा अपवाद वगळला तर कुणालाही पुढे यावसं वाटलं नाही. त्याला थांबवावसं वाटलं नाही. किंचाळणार्‍या त्या मुलीची मदत कराविशी वाटली नाही.. लोकांच्या भावना मेल्या, माणुसकी मेली, संवेदना बोथट झाल्या त्याचे हे उदाहरण आहे…. जर वसई एवढी सुसंकृत आणि संवेदनशील आहे तर लोकं असे का वागले असा प्रश्न उपस्थित होतोय. पण वसईच्या ज्या भागात ही घटना घडली, ज्या लोकांसमोर ही घटना घडली ती वसई आमची नाही, ते लोकं वसईकर नाहीत..

आणखी वाचा-सासू सुनेचा आधुनिक वटसावित्री सण, लॅपटॉपवर वडाचे छायाचित्र ठेवून घरातच घातल्या फेर्‍या

या वसईत एक ‘दुसरी वसई’ आहे.

मागील काही वर्षांपासून वसईत अतिक्रमणे होऊ लागली आणि परप्रांतियांची घुसखोरी सुरू झाली. नैसर्गिक नाले भराव करून बुजवले गेले. झाडांची, तिवरांची कत्तल झाली, भूखंड एकापाठोपाठ एक गिळंकृत होऊ लागले. बेसुमार, अमर्याद अनधिकृत बांधकामे होऊ लागली. अनेक नवनवीन वसाहती, वस्त्या विकसित होऊ लागल्या. बिहार, उत्तरप्रदेश येथील सर्वाधिक कष्टकरी लोकं येथे येऊन स्थिराऊ लागली. दररोज लोंढेच्या लोंढे या शहराच्या पोटात सामावू लागले. अनधिकृत बांधकामांवर अंकुश राहिला नाही. शासकीय जमिनी, वनजमिनी, आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे झाली. वसई पूर्वेकडील गावामध्ये अनधिकृत बांधकामे जोर धरू लागली. महामार्गालत अनधिकृत वसाहतींचं साम्राज्य तयार होऊ लागलं. परप्रांतियांच्या वस्तीची नावे देखील वसईच्या संस्कृतीत न बसणारी. संतोष भुवन, नगीनदास पाडा, रेहमत नगर, गाला नगर, पांडे नगर,कुरेशी कंपाऊड असे भाग तयार झाले. या तेथे बेकायदेशीर चाळी, इमारती उभ्या राहिल्या. मग या भागाला वसई तरी का म्हणायचं? सभ्य सुसंस्कृत वसईत ही ‘दुसरी वसई’ तयार होतेय. ती भूमाफियांनी वसवलेली आहे. ती कलंकित आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला या भागात आणून सोडलं आणि पट्टी काढली तर तो म्हणेल की उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या एका गावात आलोय…या दुसर्‍या वसईत पोट भरण्यासाठी परप्रांतिय कष्टकर्‍यांबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं आले. भूमाफियांचे साम्राज्य तयार झालं. या दुसर्‍या वसईत बकालपणा आहे, अस्वच्छता आहे. इथे राहणारे लोकं कष्टकरी वर्गातील परप्रांतिय आहेत. पण त्याचबरोबर गुन्हेगारांचं आश्रयस्थान आहे. गुंडांचं थैमान, विविध प्रकारचे गुन्हे या भागात घडतात. वसईतील नालासोपारा शहर म्हणूनच बदनाम झालं आहे. वसईची शांतता, निर्मळता, प्रसन्नता या दुसर्‍या वसईत नाही.

आणखी वाचा-आरती यादव हत्या प्रकरण: हत्येचे चित्रण करणार्‍या १४ जणांचे नोंदविले जबाब

मूळ वसईकर लढवय्ये आहेत..

तरुणीच्या हत्येची घटना परप्रांतियांची वसाहत असलेल्या गावराईपाड्यात घडली. पण हीच घटना जर स्थानिक वसईकरांच्या भागात घडली असती तर हजारो हात मदतीला आले असते. दुर्देवाने मूळ वसईकर तेथे नव्हते. मूळ वसईकर, जात, धर्म समाजाने वेगळे असले तरी त्यांच्यात माणुसकी आणि एकोपा आहे. वसईकर संकटकाळी धावून एकत्र येतात. हा इतिहास आहे. वसईकरांनी अनेक आंदोलने केली. ती लोकशाही मार्गाने संवैधानिक मार्गाने. ९० च्या दशकातील पाण्याचे आंदोलन, एसटी वाचविण्याचे आंदोलन, सिडको विरोधातील आंदोलन अशी अनेक उदाहरणे आहेत. या आंदोलनातून जन्म झाला हरित वसई सारख्या संघटनांचा. अगदी अलिकडच्या काळात गावे वगळ्याचे आंदोलनानेही वसईकरांची एकी आणि ताकद अनुभवली. वसईतील नियतकालिने चळवळीतून उभी राहिली.. या वसईत मिशनार्‍यांनी शैक्षणिक क्रांती घडवली. शाळा महाविद्याये उभी राहिले. एकोप्याने नांदणारी ही आमची वसई आहे. ती शालिन आहे. संसस्कृत आहे तेवढीच अन्यायाविरोधात लढणारी आहे. ही खरी वसई आहे. पण या वसईत तयार होणार्‍या परप्रांतियांच्या ‘दुसर्‍या वसई’ मुळे सुसंस्कृत वसई कलंकित होत आहे. परप्रांतियांचा वसईच्या संस्कृतीशी, मातीशी नाळ जोडलेली नाही. त्यांना देणं-घेणं नाही. या परप्रांतियांच्या समावेश असलेल्या वसईला वेगळं तरी करा, वेगळं नाव द्या.. स्थानिक भूमीपुत्रांची वसई ही शालीन, सुसंस्कृत, संवेदनशील आहे. ही ‘दुसरी वसई’ आमची खरी वसई नाही… ती दुसरी वसई कधीच मूळ वसईकरांची होऊ शकत नाही.