प्राची पाठक

पूर्वीच्या रांगोळ्यांमध्ये अफलातून रचना आणि भूमितीय पॅटर्न्‍स आहेत. सौंदर्यदेखील आहे. गणित आहे. पर्यावरणाचा विचार आहे. कला म्हणण्यापेक्षा कौशल्य आहे. पण ते सगळे ट्रक भरून किलोकिलोच्या रांगोळ्या घालून बटबटीत होऊन अंगावर आले, रासायनिक रंगांची उधळण आणि माती प्रदूषण दिसले की त्याचे अप्रूप वाटत नाही.

एरवी नाही, तरी निदान ‘सणासुदी’ला रांगोळी असावी दारापुढे, असे वाटणारा खूपच मोठा वर्ग आहे. त्यांची ‘दारापुढे’ रांगोळी काढायची प्रथा आता सार्वजनिक ठिकाणी आली, तरी त्यांना तसे काही सोयरसुतक नसते. कारण सणासुदीला कशाने प्रसन्न वाटते, या कर्मकांडाची पक्की सवय होऊन गेलेली असते. आपल्याला जे प्रसन्न वाटते, ते इतरांची गैरसोय करणारे, त्यांना अप्रसन्न वाटणारे असू शकते. याकडे सोयीस्कर दुर्लक्षदेखील करायची कला सणासुदीच्या रंगीत छत्राखाली शिकता येते. मग सोसायटीच्या आवारात, लिफ्टजवळच्या तोकडय़ा जागेत, दिसेल त्या मोकळ्या जागी आणि कधी तर ट्रकच्या ट्रक भरून रांगोळी रस्त्यावर ओतून ही हौस भागवली जाते. किलोकिलोच्या बटबटीत, कुठल्या कुठल्या भयानक कृत्रिम रासायनिक रंगांची उधळण वगैरे केलेल्या, मैदानेच्या मैदाने आणि रस्तेच्या रस्ते भरून ठेवणाऱ्या रांगोळ्या काढत सुटायची परंपरा पाडली जाते. ऑफिसातली अधिकारी पदावरची स्त्री दहा-पंधरा फुटांच्या रांगोळ्या ऑफिसच्या परिसरात, येण्याजण्याच्या रस्त्यात, जिन्याजवळ काढत बसलेली पाहून जेंडर रोल्सबद्दल किती वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करता येईल, याची यादीच बनवता येते. ऑफिसच्या आवारात वरिष्ठ अधिकाऱ्याला रांगोळी काढायला नकार दिलेल्या कनिष्ठ अधिकारी स्त्रियांच्या बातम्याही अधूनमधून येत असतात. कला-सौंदर्य याचे साचेबद्ध निकष एकीकडे आणि त्याला सक्तीच्या श्रद्धेचे अस्तर असे गणित जमले की वेगवेगळे आविष्कार घडतातच.

छोटय़ाशा, आपल्या घरापुरत्या आणि आपल्या हद्दीतल्या, इतरांच्या चालण्यात येणार नाहीत अशा पारंपरिक रांगोळ्या असायला कोणाची हरकत असायचे कारण नाही. लहानपणी ज्ञानकमळ, सरस्वती, चक्रव्यूह वगैरे काढायचा, ठिपके एकमेकांना जोडत काहीतरी चित्र पूर्ण करायचा सराव अनेकांनी केला असेल. अमुक टिंब एकमेकांना पेन-पेन्सिल न उचलता जोडा, अशा कोडय़ांनी आपल्याला भुरळसुद्धा घातलेली असेल. खरोखर फार मनोवेधक रचना असतात त्या. अशा पूर्वीच्या रांगोळ्यांमध्ये अफलातून रचना आणि भूमितीय पॅटर्न्‍स आहेत. सौंदर्यदेखील आहे. गणित आहे. पर्यावरणाचा विचार आहे. कला म्हणण्यापेक्षा कौशल्य आहे. पण ते सगळे ट्रक भरून किलोकिलोच्या रांगोळ्या घालून बटबटीत होऊन अंगावर आले, रासायनिक रंगांची उधळण आणि माती प्रदूषण दिसले की त्याचे अप्रूप वाटत नाही. अगदी लहान स्तरावर काही रचना करणे आणि त्याची व्याप्ती वाढवत नेत मोठय़ा आकाराची मांडणी करणे यात काही एक मजा आहे. ती मजासुद्धा एकवेळ समजून घेतली, तरीही खूपच मोठय़ा स्तरावर अशा रांगोळ्या काढताना त्या वेळच्या फोटोंचा क्लिकक्लिकाट झाल्यानंतर तो सगळा प्रकार कचराच झालेला असतो. त्याचे डिस्पोजल कसे होते? कुठे जाते ती रस्त्यावरची भली मोठी रांगोळी? कुठे झाडून लावले जातात ते हानीकारक रासायनिक रंग? त्यात पाऊस पडला, त्यावर पाणी सांडले, तर सगळे मातीत झिरपत जाते. माती आणि पाणी या दोन्हीचे प्रदूषणच त्यातून होत असते. अशा मोठय़ा आकाराच्या रांगोळ्या सार्वजनिक जागी काढायच्याच असतील, तर त्याचीही नियमावली असणे गरजेचे आहे. किमान एखाद्या कागदी, कापडी, प्लॅस्टिक शीटवर त्या काढता येतात का, ते बघितले पाहिजे. कार्यक्रम झाल्यावर तो तथाकथित कलात्मक पसारा आवारायची, त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी त्याच लोकांवर असली पाहिजे. म्हणूनच जर कापडी अथवा कागदी शीटवर अशा रांगोळ्या काढल्या गेल्या तर त्या चटकन् उचलून घेता येऊ  शकतात. रंग अगदी मिक्स झाले तरी ते जे काय झालेले असेल, ते परत परत वापरतासुद्धा येईल. कुठेही झाडून लावायची गरज उरणार नाही. या बाजूने विचार करता येईलच.

आपल्या घरासाठी आपण किती रांगोळी वापरतो, ती कशी साठवतो, कधी, कुठे कशी वापरतो, याचीही झडती या निमित्ताने करता येईल. रांगोळीचे रंग आणि पांढरी रांगोळी नीट बंद होईल अशा डब्यांमध्ये आहे का, ते बघता येईल. रांगोळीचे पॅटर्न्‍स असतील तर तेही एकत्र ठेवता येतात. काही ठिकाणी ऑइलपेंटने कायमस्वरूपी अशी छोटीशी रांगोळी काढलेली दिसते. नैवेद्याच्या ताटाभोवती किंवा पंगतीत वाढलेल्या ताटांभोवती जी रांगोळी काढली जाते, ती नंतर पायाखाली येते. त्यापेक्षा काही लोकरीचे, कागद-कापडाचे पुन्हा वापरता येतील असे आकर्षक पॅटर्न्‍सदेखील अनेक ठिकाणी बघायला मिळतात. घरातले सगळे पूजेचे आणि त्यासाठी लागणाऱ्या डेकोरेशनचे साहित्य नीट एकत्र ठेवले, तर वेळ पडेल त्यानुसार ते चटकन् हाताशीसुद्धा राहते. या पॅटर्न्‍सची सवय झाली, सोय लक्षात आली तर रांगोळीची कचकच हळू हळू कमी होऊन जाते. एक कलाकौशल्य म्हणून एरवीही ती शिकता येतेच की! फुलांच्या-पिठाच्या छोटय़ाशा रांगोळीचे काही पर्यायदेखील करून बघता येतील. किंवा रांगोळी म्हणून चक्क लहानमोठे फ्लॉवरपॉट्स, लहान कुंडीतलं रोपटं वापरता येतील. रांगोळीच्या निमित्ताने घरातले सगळे पूजेचे सामान नीट आवरून ठेवता येईल. त्यातील रासायनिक रंग, रासायनिक पदार्थ कमीतकमी करता येतील. अधिकाधिक निसर्गस्नेही पूजेचा विचार करता येईल. एखादे कलाकौशल्य आपल्याला आवडते, आपल्या श्रद्धेचा भाग असते म्हणून सार्वजनिक जागीही बटबटीत स्वरूपात आल्यावर सर्वाना ते आवडतेच असे नाही. किंबहुना, तो बळजबरीचा रामराम ठरतो, ही संवेदनशीलतादेखील रांगोळीबद्दल असाही विचार करून शिकता येईल!

prachi333@hotmail.com

Story img Loader