आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अ‍ॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. अजून काही जण फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा माठाचे गार पाणी पिण्यास प्राधान्य देतात.
पूर्वी उन्हाळी कामात घरोघरी बायकांना एक महत्त्वाचे काम असे ते म्हणजे माडीवरून नाहीतर माळ्यावरून माठ, तिवई काढणे व तो धुऊन त्या माठाला दोन उन्हे देणे.
‘माठ’ हा तीन पायांच्या लोखंडी रिंगवरच (तिवई) असायचा. त्यावर पितळ्याचे तबक व वरती नक्षीदार मुठीच्या दांडय़ाचे ओगराळे, खाली परात. माठातले पाणी हे फक्त ओगराळ्यानेच काढून पेला (ग्लास) भरायचा. त्यात दुसरे भांडे बुडवायचे नाही, अशी आम्हा पोराबाळांना ताकीद असायची. फारच उन्हाळा वाढला तर आई धोतराचा ओला फडका माठाभोवती गुंडाळायची म्हणजे पाणी जास्त गार व्हायचे. सुरुवातीला माठाच्या पाण्याला एक प्रकारचा मातीचा वास यायचा, त्या पाण्याची चवही छान असे. माझी आजी त्या माठात वाळा नावाची वनस्पती काडय़ांची जुडी करून टाकायची, त्याचा थंडावा व वास तर वेगळाच असायचा. अजून काही ठिकाणी माठ घरात दिसतो, फक्त जागेअभावी तिवई, ओगराळे जाऊन माठाला स्टीलचा कॉक आला व तो छोटय़ा फळीवर ठेवतात.
फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठाचे पाणी बरे! म्हणून पनवेलजवळ रस्त्याच्या कडेला तऱ्हेतऱ्हेचे माठ घेऊन कुंभार बसतात. त्यांच्याकडून स्टीलचा कॉक असलेला सुबक माठ घेऊन आलो. स्वयंपाकघरात फळीवर कपडय़ाची रिंग करून ठेवला. दुसऱ्या दिवशी उठून बायको बघते तर काय! स्वयंपाकघरात जमिनीवर सगळे पाण्याचे थारोळे झालेले. पटकन आम्हाला वाटलं माठ फुटका निघाला, पण आईने बरोबर ओळखले, ती म्हणाली, अरे! तो माठ कच्चा आहे. नीट भाजला गेला नसल्यामुळे, तो भरपूर पाझरला. माझी आई तिचा जुना अनुभव सांगत होती. ती म्हणाली, माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे. पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.
‘माठ’ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे असे. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. काळाप्रमाणे सगळ्या वस्तूंचे रंग बदलले, पण या मॅचिंगच्या दुनियेत माठाचा रंग मात्र अजून लाल राहिला आहे. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात. उन्हाळ्यात सिंहगडावर किंवा निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळांजवळ मोठय़ा माठाला लाल फडके गुंडाळून गारेगार ताक विकत असतात. मला वाटतं म्हणूनच ताकाला ‘मठ्ठा’ म्हणत असतील. तसेच पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात.
‘माठ’ हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात चांगला. तो इतर धातूंच्या भांडय़ाप्रमाणे कळकट नाही, रापत नाही किंवा ठेवला तर त्याला गंजही चढत नाही. काचेच्या भांडय़ाप्रमाणे जपून वापरावा लागतो एवढेच.
मडके, हंडी, कुंडी, सुगड, कुल्लड वगैरे अशा मातीच्या अनेक प्रकारच्या उपयोगी वस्तूंत माठ हा प्रकार भारदस्त, खानदानी वाटतो. तो त्याच्या डेरेदार आकाराबरोबर असलेल्या तिवई, सुबक ओगराळे, ताटली, परात यांच्यामुळे. माठाने अगणित लोकांची तहान भागवली असेल. असाच आमच्या सेवेत राहून उन्हाळ्यात आम्हाला तृप्त कर बस!
केवळ माठ शब्दावरून विषयांतर होईल, पण मनोरंजन म्हणून सांगतो, उन्हाळ्यात बैठे खेळ म्हणून खेळताना एका शब्दाचे अनेक अर्थ लिहिणे या खेळात मी माठ शब्दाचे तीन अर्थ लिहिले होते. १) माठ- पालेभाजी, २) माठ- गार पाणी करण्याची हंडी ३) माठ- मंदबुद्धीचा मुलगा. गाणीबजावणी करताना आमच्यातला एक तबलजी, दाक्षिणात्य लोकांसारखा बोटात रिंगा घालून जुना माठ वाजवायचा, या सर्व ओघाओघाने आलेल्या जुन्या आठवणी. असो..

माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे. पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.

श्रीनिवास डोंगरे