हेमा वेलणकर nvelankarhema@gmail.com

झोपाळा ही घरातली एक वस्तू. पण याचं स्थान घरातल्यांच्या हृदयात आहे. म्हणूनच झोपाळ्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही हेच खरं

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bollywood actress Malaika Arora shares her 9 health goals for November
नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Puneet Superstar eating bread with mud shocking video goes viral
फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत

सर्वानाच झोपाळ्याचं आकर्षण असतं. झोपाळ्याचे उल्लेख अगदी रामायण-महाभारतातही आहेत. राधा-कृष्णाच्या रासक्रीडेत झोपाळा असतोच. मराठीतही झुला/झोपाळा या विषयावर झुलवू नको हिंदोळा, झुलतो झुला, उंच उंच माझा झोका यांसारखी अनेक प्रेमगीतं, बालगीतं, कविता लिहिल्या गेल्या आहेत. कोकणातल्या माणसांना हे झोपळ्याचं वेड जरा जास्तच असतं. पिढय़ान् पिढय़ा दारिद्रय़ामुळे कोकणात असलेल्या दळणवळणाच्या कमतरतेमुळे कोकणी माणसाचं आयुष्य तसं खडतरच असतं. झोपळ्याच्या हिंदोळ्यावर त्याचं मन स्वप्नरंजनात रमत असेल म्हणून कदाचित कोकणी माणसाला झोपाळा जास्त आवडत असावा. पुढील दारी तुळशी वृंदावन, मागच्या आगरात फुलझाडं आणि घराच्या दर्शनी भागात असलेल्या पडवीत झोपाळा नसलेलं घर क्वचितच सापडेल कोकणात.

आमच्या कोकणातल्या घरी पुढल्या दारी पडवी नसल्याने ओटीवरच्या मुख्य वाशाला आमचा झोपाळा लावलेला आहे. काही घरात दिवाळीनंतर खळ्यात मांडव पडला की झोपाळा ही खळ्यातच आणला जातो. पण आमच्याकडे खळ्यात झोपाळा लावायची सोय नसल्याने तो कायम ओटीवरच लावलेला असतो. हा आमचा झोपाळा जाड सागवानी लाकडापासून बनवलेला आहे. एका वेळी एका बाजूला तीन जण आरामात बसू शकतील एवढा लांब-रुंद आहे. झोपाळ्यांच्या फळीला एखाद इंच उंचीची चौकट आहे. झोपाळ्यावर पाणी सांडलं किंवा छोटय़ा बाळाने शू वगैरे केली तर फळी थोडी तिरपी केली की सगळं पाणी निघून जावं यासाठी काही झोपळ्यांना कोपऱ्यात एक छोटंसं भोक असतं. आमच्या झोपाळ्याला नाहीये तसं भोक आणि असतं तरी उपयोग झाला नसता. कारण अधिक आरामदायी होण्यासाठी आम्ही झोपाळ्यावर गादी घालतो. झोपाळ्याच्या कडय़ा लोखंडीच आहेत. झोपळ्याच्या कडय़ा कुरकुरत असतील तर झोके घेताना मोठाच रसभंग होतो. कडय़ा कुरकुरू नयेत यासाठी त्यामध्ये वंगण घालावं लागतं. वंगणाचे डाग कपडय़ांना लागू नयेत म्हणून आज अनेक वर्षे तेच विको वज्रदंतीचे रिकामे डबे दोन्ही बाजूंना कापून घरच्या घरी बनवलेले (कोब्रा ना आम्ही) सिलेंडर्स कडय़ांवर घातले आहेत. ते सिलेंडर गोल गोल फिरवण्याचा खेळ करताना लहान मुलं खूप वेळ रमतात हा त्यांचा आणखी एक फायदा.

पावसाळ्यात पहाटेच्या धूसर प्रकाशात घरात इतरत्र शांतता असताना झोपळ्यावर बसून हलके झोके घेत, ओटीवरच्या रेज्यातून बाहेरच्या पागोळ्यांच्या मुंडावळ्या बघत चहा पिणं म्हणजे माझ्यासाठी तो अगदी ‘मी टाइम’ असतो. बाहेर पावसाची लय आणि मनात मंद झोक्यांची लय! बघता बघता मन हलकं होऊन जातं. काही अपवाद वगळता घरातल्या सगळ्यांनाच झोपाळा आवडत असल्याने दिवस उजाडला की झोपाळ्यावरची वर्दळही वाढत जाते. संध्याकाळी झोपाळ्यावर बसून खळ्यात रंगलेला मुलांचा खेळ पाहताना आपणही मनाने लहान होऊन जातो. कधी कामाचा कंटाळा आलाय म्हणून, कधी काही काम नसण्याचा कंटाळा आलाय म्हणून, कधी एकटं वाटतंय म्हणून, कधी कोणाचा तरी राग आलाय म्हणून, कधी लाइट गेले की उकडतंय म्हणून सतत कोणी ना कोणी तरी बसलेलं असतंच झोपाळ्यावर. आणि झोपळ्याची जादूच अशी आहे की, पाच-दहा मिनिटं झोका घेतला की आपोआपच मूड सुधारतो. झोपाळा फक्त घरातल्या माणसांनाच आवडतो असं नाही तर अंगाचं मुटकुळ करून गुरगुटून झोपण्याची मनाची सर्वात आवडती जागा झोपाळाच आहे. आणि जॉनी झोपाळ्यावर बसत नसला तरी त्याची ही आवडती जागा झोपाळ्या खालचीच आहे.

लहान मुलं पाळण्यात झोपेनाशी झाली की त्यांना झोपवायला झोपाळा लागतोच. थोडय़ा मोठय़ा मुलांचा अभ्यास, खेळ, भांडण सगळं झोपाळ्यावरच चालतं. रात्री आईच्या नाही तर काकूच्या मांडीवर डोकं ठेवून झोके घेता घेता झोपाळ्यावरच झोपी जातात मुलं. आमचा झोपाळा ओटीवरच असल्याने आणि ओटीवर सतत मोठय़ा माणसांचाही राबता असल्याने फार उंच झोका घ्यायला मात्र मुलांना मिळत नाहीत. मुलांना मोठे झोके घेऊन मजा करता यावी म्हणून खालच्या घरात आणखी एक झोपाळा आहे आमचा. मे महिन्यात सगळी जमली की त्या झोपाळ्यावर खूप खेळतात मुलं. झोपाळ्यावर कधी बस बसचा तर कधी भातुकलीचा खेळ रंगतो. गाणी म्हटली जातात. भेंडय़ा खेळल्या जातात. उंच उंच झोक्यांचा खेळही रंगतो. मला त्या झोपाळ्यावर दुपारी वाचत पडायला फार आवडतं. असो. आमचा झोपाळा चांगला लांब रुंद असल्याने दुपारची वामकुक्षी घ्यायला किंवा खूप जास्त पाहुणे असतील तर रात्रीही झोपायला उपयोगी पडतो.

तिथे राहणाऱ्या माझ्या सर्वच सासूबाईंना झोपाळा फार आवडत असे, पण त्या वेळी स्त्रियांवर एकूणच अनेक बंधन असल्यामुळे त्यांची ही अतिशय साधी, बिन खर्चाची हौसही पुरवली गेली नाही. एक तर तेव्हा घरात कामं खूप असत, त्यामुळे सवडच नसे त्यांना आणि त्यात ओटीवर कोणी पुरुष माणूस नसेल तेव्हाच त्या बसत असत झोपाळ्यावर थोडा वेळ. आता काळ बदललाय, आता आम्ही मनात येईल तेव्हा झोपळ्यावर बसतो त्या वेळी हे फार जाणवतं आणि खूप वाईटही वाटतं. असो. आम्ही घरातल्या बायका रोज दुपारी जेवण झालं की दोघी-तिघी झोपाळ्यावर, दोघी त्या समोरच असणाऱ्या बाकावर, एक-दोघी खुर्चीवर अशा बसून थोडा वेळ तरी गप्पा मारतो आणि मगच झोपायला जातो. रात्रीही कधी कधी गप्पा रंगतात आमच्या झोपाळ्यावर. कधी तरी रात्री घरातल्या सर्वाची निजानीज झाल्यावर एकटय़ानेच झोपळ्यावर बसून झोके घेत ओटीवरच्या रेज्यातून घरात येणारे शांत, स्निग्ध, दुधाळ चांदण्यांचे कवडसे पाहणे स्वर्गीय सुखाचा आनंद देत.

घरात कुणाचं डोहाळजेवण असेल तर तो दिवस झोपळ्यासाठीही अगदी खास दिवस असतो. झोपाळ्याच्या कडय़ांना आंब्याचे टाळे, झेंडूची फुलं लावून सुशोभित करतात. झोपाळ्यावरच्या गादीवर नवीन चादर घातली जाते. बाजूला लोड, तक्केठेवले जातात. आमचा झोपाळा तसा जमिनीपासून उंच आहे त्यामुळे उत्सव मूर्तीचे पाय लोंबकळून तिच्या पायाला रग लागू नये म्हणून खाली छोटंसं स्टूल ठेवलं जातं. ओटीवर निमंत्रित बायकांच्या गप्पा, गाणी, उखाणे, फराळ सगळं झोपाळ्याच्या साक्षीने रंगत. त्या नवीन जिवाच्या स्वागतासाठी जणू काही झोपाळाही अधीर झालेला असतो.

आमच्या घरात जेव्हा एखादं कार्य असतं तेव्हा मात्र झोपाळा तेवढय़ापुरता काढून ठेवला जातो. झोपाळा न काढताही मॅनेज करायचा आटोकाट प्रयत्न केला जातो, पण झोपाळा काढल्याशिवाय पर्याय नसतो. घरात एवढी माणसं असतात, शुभकार्याची लगबग असते, ओटीवर बसायला जागा नाही इतकी माणसं असतात, तरीही झोपाळ्याशिवाय ओटी फार सुनीसुनी वाटते. कार्याची लगबग संपली की पहिलं काय केलं जातं, तर झोपाळा लावला जातो. तेव्हाच घरातल्यांचा जीव झोपाळ्यात पडतो. झोपाळ्याशिवाय ओटीला शोभा नाही आणि आता झोपाळा लावल्यावर कशी ओटी छान दिसतेय यावर गप्पाही रंगतात. त्याही अर्थातच झोपाळ्यावर बसूनच.

तसं बघायला गेलं तर झोपाळा ही घरातली एक वस्तू. पण याचं स्थान घरातल्यांच्या हृदयात आहे. म्हणूनच झोपाळ्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही हेच खरं!