मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

प्रकाश जसा कमी असून चालणार नाही, तशी केवळ दिव्यांची उधळण करूनही भागणार नाही. कारण गरजेपेक्षा कमी प्रकाशात जसं या वस्तूंचं सौंदर्य उठून दिसत नाही, तसंच प्रकाश गरजेपेक्षा जास्त असेल, तर डोळे दिपतात, पण ते गृहसजावटीचं सौंदर्य बघून नाही, तर झगझगीत दिव्यांच्या प्रखर प्रकाशामुळे! त्याकरताच प्रकाशाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात, अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशरूपी ज्ञानाची वाट दाखव, अशी प्रार्थना याज्ञवल्क्य ऋषींनी बृह्दारण्यकात केली आहे. कारण, अगदी वनस्पतींपासून ते माणसांपर्यंत बहुतेक प्राणिमात्रांना आणि पशुपक्षांना प्रकाशाची ओढ आणि आकर्षण असल्याचं दिसून येतं. काही निशाचर प्राणी, शिकारीसाठी जाणारी हिंस्र जनावरं आणि वटवाघळासारखे पक्षी सोडले, तर इतर सजीवसृष्टीला प्रकाशाची आस असते. वेदांसारख्या अपौरुषेय वाङ्मयाच्या अभ्यासापासून ते आधुनिक काव्यांच्या रचना आणि अभ्यासापर्यंत सगळ्याच काव्यप्रकारांमध्ये माणसाला असलेली प्रकाशाची आस दिसून येते. संध्याकाळ झाली की बऱ्याचदा मन उदास होतं. इतकंच कशाला पावसाळ्यात भर दुपारी आकाश काळ्या ढगांनी दाटून येतं आणि अंधारतं, तेव्हा मनावरही कसलीतरी अनामिक भीती, चिंता आणि अस्वस्थता यांच्या एका विचित्र रसायनाचं मळभ येतं. दिवसा बोगद्यातून प्रवास करताना पहिले काही क्षण मजा वाटते, पण लगेचच नजर कावरीबावरी होऊन शोध घ्यायला लागते, ती दुसऱ्या टोकाला असलेली प्रकाशाची तिरीप कुठे दिसते का, याची! या प्रकाशाला आपण सूर्याच्या रूपाने देवता

मानून पूजतो. कारण प्रकाश ऊर्जेला रासायनिक ऊर्जेत परिवर्तित करणारी प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वनस्पतींच्या हिरव्या पानांमधून राबवली जाते. काही उपचार पद्धतींमध्ये आरोग्यासाठी ‘सनबाथ’ अर्थात, सूर्यस्नान सुचवले जाते.

अशा या प्रकाशाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण आपली घरं सजवताना खरोखरच लक्षात घेतो का? आपण फर्निचर आकर्षक असावं, यासाठी आग्रही असतो. फ्लोअिरगच्या टाइल्स, मार्बल किंवा ग्रॅनाइटसारखे दगड कसे सुंदर दिसतील, याचा विचार करतो. छानछान पेंटिंग्ज, शोभेच्या वस्तू, इतकंच काय पण भिंतीवरची घडय़ाळंसुद्धा आकर्षक डिझाइनची कशी असतील, याची काळजी घेतो. पण हे सगळं सुंदर तेव्हाच दिसेल, जेव्हा त्याचं सौंदर्य दिसण्यासाठी आवश्यक तितका नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश उपलब्ध असेल. प्रकाश जसा कमी असून चालणार नाही, तशी केवळ दिव्यांची उधळण करूनही भागणार नाही. कारण गरजेपेक्षा कमी प्रकाशात जसं या वस्तूंचं सौंदर्य उठून दिसत नाही, तसंच प्रकाश गरजेपेक्षा जास्त असेल, तर डोळे दिपतात, पण ते गृहसजावटीचं सौंदर्य बघून नाही, तर झगझगीत दिव्यांच्या प्रखर प्रकाशामुळे! त्याकरताच प्रकाशाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.

घर प्रसन्न वाटण्यात घराच्या सजावटीचा महत्त्वाचा वाटा असतो आणि गृहसजावट करताना केलेली प्रकाशयोजना ही घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यात फार मोठी भूमिका बजावते. त्यासाठी त्यासंदर्भातल्या काही मूलभूत आणि जुजबी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.

घर हे आरामदायी असलं पाहिजे. त्यामुळे त्यात वावरताना अगर विविध कामं करताना, जर सतत डोळ्यांवर ताण आला, तर डोकेदुखी, चक्कर येणं, मळमळणं अशाप्रकारचा त्रास डोळ्यांमुळे संभवू शकतो. मग आरामदायी कसं वाटणार?

त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

* घरात पुरेसा प्रकाश असण्यासाठी दिवसा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे, तर रात्रीच्या वेळीही पुरेशी कृत्रिम प्रकाशव्यवस्था असणं आवश्यक आहे. अर्थात आजूबाजूला असलेल्या इमारती, वाढलेली झाडं किंवा इतर गोष्टींमुळे जर नैसर्गिक प्रकाश कमी होत असेल, तर अशा बाह्य़ घटकांवर आपलं नियंत्रण नसतं. मात्र, घरात बाहेरून येणारा नैसर्गिक प्रकाश खोलीत परावर्तित करून खोलीतल्या प्रकाशात थोडीशी वाढ करता येते. यासाठी खोलीत जर आरसे असतील, किंवा ज्यावरून प्रकाश परावर्तित होऊ शकतो अशा वस्तू असतील, तर त्या खिडकीसमोर येतील अशा पद्धतीने मांडल्या तर, त्यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे खोलीतल्या नैसर्गिक प्रकाशात वाढ होऊ शकेल.

* आपल्या कार्यालयांमध्ये रायटिंग टेबलाची आणि खुर्च्याची जागा ठरवतानाही काळजी घ्यावी की, खिडकीतून येणारा प्रकाश हा खुर्च्याच्या मागच्या बाजूला न पडता तो थेट टेबलावर पडेल.

* वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींची प्रकाशाची गरज ही वेगवेगळी असते. कारण वयोमानानुसार दृष्टीत जसा फरक पडतो, तशी ती गरजही बदलत जाते. त्यामुळे ज्या घरासाठी आपल्याला प्रकाश व्यवस्था करायची आहे, त्या घरातल्या व्यक्तींचा वयोगटही लक्षात घ्यावा लागतो.

सफेत प्रकाश देणाऱ्या टय़ूबलाइटमध्ये दिवसाच्या प्रकाशाचा आभास निर्माण होतो, तर आज बाजारात उपलब्ध असणारे आणि वीजबचत करणारे सीएफएल दिवे हे मंद निळसर प्रकाश देतात. नेहमी वापरले जाणारे टंग्स्टन बल्ब हे पिवळसर प्रकाश देतात. विशिष्ट जागी प्रकाशझोत हवा असेल, तर स्पॉटलाइट वापरता येतात. फॉल्स सिलिंगमध्ये हे स्पॉटलाइट अनेकदा बसवले जातात. हे स्पॉटलाईट पिवळा प्रकाश देणाऱ्या दिव्याचे असू शकतात किंवा सफेत प्रकाश देणाऱ्या दिव्यांचेही असू शकतात. कधीकधी हॅलोजन दिवेही वापरले जातात.

जिथे दिव्यांचा सतत वापर होतो अशा ठिकाणी बल्बऐवजी एलईडी टय़ूब लाईट किंवा एलईडी दिवे बसवावे. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर वीजबचत होते.

काही घरांमध्ये दिव्यांचा प्रकाश थेट असतो, तर काही ठिकाणी तो अप्रत्यक्ष असतो. म्हणजे दिव्यांना किंवा टय़ूबलाइटला कव्हर किंवा जाळीचं आवरण असल्याचं पाहतो. पण असा अप्रत्यक्ष प्रकाश घरात देताना आवडीनिवडीबरोबरच प्रत्यक्ष उपयोगितेचा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. म्हणजे, त्याखोलीत कुठल्याप्रकारचं काम होणार आहे यावर किती आणि कशाप्रकारे म्हणजे, प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष प्रकाश द्यायचा याचा विचार करणं गरजेचं आहे.

दिवे कुठल्याही प्रकारचे असले तरी दिव्यांच्या पृष्ठभागावर बऱ्याचदा धूळ साचते. त्यामुळे प्रकाशाची तीव्रता २० ते ३० टक्क्यांनी कमी होते. ही धूळ केवळ प्रकाशच कमी करते असं नाही, तर त्या दिव्यातून निर्माण होणारी आणि एरव्ही वातावरणात विरून जाणारी उष्णता ही धूळ शोषून घेते. अशा प्रकारे दिव्यांवरच्या या धुळीमुळे ते सतत गरम होतात व तापूनतापून त्यांचं आयुष्यही कमी होतं. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठेवावेत.

दिवसभराच्या कामानंतर थकूनभागून आपल्या घरी आल्यावर आपल्याला आरामदायी आणि प्रसन्न वाटायला पाहिजे. काळोखी घरांमध्ये गेल्यावर मनावर जसं एकप्रकारचं मानसिक दडपण जाणवतं, तसं जाणवता कामा नये. यासाठी आपल्या घरातल्या दिव्यांची योग्य ती काळजी घेतली तर प्रसन्न तर वाटेलच, पण दिव्यांचं अधिकाधिक आयुष्य आपल्याला वापरायला मिळेल आणि आर्थिक बचतही होईल. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता येण्यासाठी आणि आलेली सुबत्ता टिकण्यासाठी बचतीची सवय ही हवीच! नाहीतर चंचल लक्ष्मी कशी टिकणार?

(इंटिरिअर डिझाइनर आणि स्पेस मॅनेजमेंट कन्सलटंट)

Story img Loader