मैत्रेयी केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

संन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून तयारी लागते, तसं एखादं रोप लावायचं म्हटलं की मातीपासून सुरुवात करावी लागते. नर्सरीतून तयार माती विकत आणणं हा तसा सोपा पर्याय, पण खरा पर्यावरणवादी- बागप्रेमी मात्र माती तयार करणंच अधिक पसंत करतो. ‘माती’ या शब्दाची माझी व्याख्या म्हणजे ‘माझी संपत्ती’. खरंच ही एक प्रकारची संपत्तीच आहे. प्रयोगाअंती तुम्हालाही पटेल. सृजनाचं लेणं या मातीतूनच बहरायच असतं. मग ती कसदार आणि संपन्न हवीच! त्यात हिणकसाला जागा नको.

आपण रोप लावतो तेव्हा आपल्या बऱ्याच कल्पना या स्वप्निल असतात. त्याला विज्ञानाचा आधार नसतो. मऊ-लालसर माती कुंडीत भरली की आपलं झाड आनंदाने नांदेल ही आपली धारणाच मुळी खुळी असते. कारण  झाडाला माती हवी ती आधारासाठी, पोषणासाठी, वाढीसाठी. ती सगळी कामं या एका लाल मातीने साधणं कठीणच असतं.

झाडाच्या प्रकारानुसार त्यांना लागणारी मातीही वेगवेगळ्या प्रकाराची असते. पण म्हणून माती तयार करणं हे फार कष्टाचं, खर्चाचं काम आहे का? तर तसं मुळीच नाही. यासाठी लागेल ती थोडी विज्ञानाची समज आणि थोडी निरीक्षणशक्ती. समजा तुम्हाला एखादं फुलझाड लावायचंय तर त्यासाठी माती कशी हवी –  मुळांना पसरायला वाव देईल अशी, हवा खेळती राहील इतपत मोकळी, रोपाला अत्यावश्यक अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करणारी सकस म्हणजेच जिवंत माती. अशी परिपूर्ण माती जर मिळाली तर ते झाड आपल्याकडे सुखाने वाढेल. मग पुढे दर पंधरा एक दिवसांनी त्याच्या वाढीचे निरीक्षण करत त्याला हव्या त्या गोष्टींचा पुरवठा केला की झालं. अशी उपयुक्त माती तयार करण्याकरता आपल्याला लागतील भरपूर वाळलेली पानं- ज्यांचं सावकाशपणे विघटन होत राहील व बराच काळ झाडाला खत मिळेल. ही वाळकी पानं आपल्याला सोसायटीच्या आवारातून सहज गोळा करता येतील. ती गोळा करत असताना सोबत येणाऱ्या बारीक काडय़ा आणि दगड, माती हेही आपल्याला हवंय. याबरोबरच जमा करायची ती थोडी जाडसर वाळू, थोडय़ा नारळाच्या करवंटय़ांचे तुकडे किंवा विटांचे, फुटलेल्या कुंडीचे तुकडे. याबरोबर हव्या नारळाच्या बारीक कातरलेल्या शेंडय़ा, थोडं सुकलेलं आणि चुरलेलं शेणखत,  कडुलिंबाचा वाळका पाला किंवा कोळशाची पूड. असल्यास थोडी लाल माती.

आता कुंडी निवडताना रोपाच्या आकारमानाप्रमाणे निवडायची. शिवाय तिच्या तळाला भरपूर भोकं आहेत की नाही हे पहायचं. नसल्यास ती पाडून घ्यायची. खापराच्या किंवा नारळाच्या तुकडय़ाने ती भोके अलगद झाकून त्यावर पाऊण कुंडी भरेल एवढा वाळलेला पालापाचोळा भरायचा. तोही थोडासा दाबून आणि चुरून. कारण काही दिवसांनी जेव्हा त्याच विघटन होईल त्या वेळी आपल्या मातीची पातळी खाली जाते. आता उरलेल्या पाव भागात कोकोपीट किंवा नारळाच्या बारीक केलेल्या शेंडय़ा, लालमाती, थोड शेणखत, कम्पोस्ट, कडुलिंबाचा पाला, थोडी वाळू यांचं मिश्रण घालून रोप लावायचं. शक्य तोवर रोप लावण्याचं काम संध्याकाळी करावं, त्याला हलक्या हाताने पाणी द्यावं. एक-दोन दिवस रोप सकाळच्या उन्हात ठेवून थोडं स्थिर झालं की मग भरपूर उन्हाच्या जागी ठेवावं. अशा रीतीने तयार केलेल्या मातीत झाड आनंदाने वाढतं. मुळांना पुरेशी हवा मिळते. पहिला जोम धरेपर्यंत शेणखत आणि कम्पोस्टचा उपयोग होतो. आपण तयार केलेल्या या मातीमुळे पाण्याचा उत्तम निचरा होतो. कडुलिंबाच्या पानांमुळे किंवा कोळशाच्या पुडीमुळे कीड, मुंग्या लागत नाहीत. कुंडी वजनाने अतिशय हलकी होते. अर्थात एकदा कुंडी अशा रीतीने भरली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. एक-दोन महिन्यात आपल्याला अजून थोडी माती आणि इतर पोषक घटक द्यायचे असतात. पण तोवर रोपटय़ाने चांगली मुळं धरलेली असतात.

माती तयार करताना मी वर्णन केलेल्यां पैकी एकदोन गोष्टी नाही मिळाल्या तरी हरकत नाही, त्या मिळतील तेव्हा घालाव्यात. पण वाळलेला पाचोळा किंवा गवत मात्र हवंच.

माती तयार करण्यासाठी आपण वापरणार असलेले सर्व घटक हे सहज उपलब्ध होणारे आहेतच, पण नाही मिळाले तर थोडय़ा खटपटीने आपण ते मिळवू शकतो.  अशा प्रकारची माती वापरून भरलेली कुंडी एका जागेवरून दुसरीकडे हलवणं सोपं पडतं. त्याचबरोबर पाणी दिल्यावर तळाकडून वाहून जाणाऱ्या मातीमुळे आपली फरशी खराब होत नाही. अशी प्राथमिक माती तयार करणं एकदा जमलं की मग पुढची कामंही जमतात. बागकामाचं खरं रहस्य हेच की, बागेची सुरुवात आपण करायची असते. उरलेल्या बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या शाळेत आपोआप शिकवल्या जातात. माती तर तयार झाली, पण ती करताना आपण जे कम्पोस्ट वापरणार आहोत ते प्रत्येक वेळी विकत आणणं परवडण्यासारखं नाही. मग तेही आपल्याला करता आलं पाहिजे नाही का? त्याची माहिती घेऊया पुढच्या लेखात.