विश्वासराव सकपाळ

vish26rao@yahoo.co.in

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काही वर्षांपूर्वी पुण्यात घराचे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर सर्व दारे-खिडक्या बंद करून झोपलेल्या दोघी बहिणींचा विषारी वायूंमुळे मृत्यू झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती मुंबईतील वर्सोवा येथे पेस्ट कंट्रोल झालेल्या घरात झोपण्यापूर्वी एअर कंडिशनर चालू करून झोपल्यामुळे खोलीत सर्वत्र विषारी वायू पसरून टॉक्सिक-शॉकमुळे दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा पुण्यातील बिबवेवाडीतील गणेशविहार सोसायटीमध्ये घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने वासाने गुदमरून निवृत्त बँक अधिकाऱ्यासह पत्नीचाही मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली आहे.

पेस्ट कंट्रोलमुळे लगेचच घरी न जाण्याचा सल्ला देऊनही ते संध्याकाळी सातच्या सुमारास घरी परतले. खिडक्या-दारे त्यांनी उघडी ठेवली नाहीत, त्याचप्रमाणे पंखाही सुरू केला नाही. परिणामी काही वेळाने त्यांना त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी व खबरदारी न घेतल्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी पेस्ट कंट्रोलचे कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी आपण कोणती काळजी व खबरदारी घ्यावी तसेच सदरहू कंपनीतर्फे वापरण्यात येणाऱ्या रसायनांची संपूर्ण माहिती व त्याचे संभाव्य दुष्परिणाम व उपाययोजना आणि पेस्ट कंट्रोल केल्यानंतर परिवारातील सदस्यांनी स्वत:ची, सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सखोल माहिती करून घेणे आवश्यक आहे. बहुतांश पेस्ट कंट्रोल कंपन्या फवारणीच्या कामासाठी रोजंदारी पद्धतीवर अकुशल कामगार नेमून त्यांच्यामार्फत काम करून घेतात. त्यांना घातक रसायनांची नावे व दुष्परिणाम माहीत नसतात. तसेच घराचे पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व नंतर कोणती खबरदारी घ्यावी याबाबतची सखोल माहिती लेखी स्वरूपात ग्राहकांना दिली जात नाही. त्यामुळे आपल्या घराचे पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व नंतर कोणती काळजी व खबरदारी घ्यावी याची माहिती घेऊ  :–

(अ)  पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी  :–

*   शासकीय मान्यताप्राप्त, नोंदणीकृत व अनुभवी पेस्ट कंट्रोल कंपनीची निवड करावी.

*   आपल्या घराची पेस्ट कंट्रोलविषयक नेमकी समस्या व निराकरण आधुनिक पद्धतीने कसे करण्यात येईल याबाबत कंपनीकडून लेखी माहितीचा आग्रह धरावा.

*   पेस्ट कंट्रोल कंपनीतर्फे घरात फवारणीकरिता वापरण्यात येणारी रसायने व त्याचा दुष्परिणाम जाणवल्यास देण्यात येणारा (Antidote) उपाय व उपचार पद्धती याबाबतची लेखी माहिती व फवारणीदरम्यान व फवारणीनंतर काही समस्या उद्भवल्यास कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याचा तसेच कुटुंबाचे डॉक्टर यांचा व जवळपास असणाऱ्या दवाखान्याचा व रुग्णवाहिका यांचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी याबाबतची लेखी माहिती ठळकपणे दर्शविणारा फलक सर्वाना दिसेल अशा ठिकाणी घरात लावण्यात यावा. त्याची एक प्रत आपल्या शेजारील सदनिकाधारकास व सोसायटीच्या सचिवास देऊन आपण पेस्ट कंट्रोल तारीख व वेळ याची लेखी माहिती कळवावी. जेणेकरून आपत्कालीनप्रसंगी अथवा दुर्घटना घडल्यास संबंधित व्यक्तीस संपर्क साधून वेळीच योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल.

*   आपण निवड केलेली पेस्ट कंट्रोल कंपनी (Non-Toxic Pesticides) बिनविषारी रसायने वापरत असल्याची खात्री करावी.

*   सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने रॉकेल किंवा तत्सम द्रवपदार्थाऐवजी पाण्यात मिसळून वापरण्यात येणारी, उग्र वासविरहित व सुरक्षित कीटकनाशके काही नामांकित कंपनीतर्फे फवारणीस उपलब्ध आहेत, याबाबत माहिती घ्यावी.

*   आपल्या घरातील सर्व सभासदांना (विशेषत: कॉल सेंटर व कामाच्या नियमित वेळा नसणाऱ्या) आपण ठरावीक दिवशी / वेळी घराचे  पेस्ट कंट्रोल करून घेत असल्याची माहिती द्यावी. आपल्या घरातील सर्व व्यक्ती- नवजात अर्भके व लहान मुले, वरिष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, अपंग व्यक्ती, दमा व श्वसनाच्या समस्या असणाऱ्या व्यक्ती, एकाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असणाऱ्या व्यक्ती व पाळीव प्राणी पेस्ट कंट्रोल सुरू करण्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलविण्याची खबरदारी घ्यावी.

*   घरातील सर्व अन्नपदार्थ / खाद्यपदार्थ / भाजीपाला व्यवस्थित डबाबंद ठेवावेत. विशेष दक्षता म्हणून व शक्य असल्यास त्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवू नये. जेवणखाण बाहेरच करावे.

*   वातानुकूलित यंत्रे, टेबल फॅन व पेडेस्टल फॅन यांचे विजेचे प्लग काढून ठेवावेत. जेणेकरून घरातील अन्य व्यक्तीच्या हातून चुकून चालू केल्यास विषारी वायू घरात पसरण्यास मदत होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(ब)  पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर घ्यावयाची काळजी  :–

*   पेस्ट कंट्रोल कंपनीने दिलेल्या ठरावीक मुदतीनंतर प्रथम घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडावे. त्यानंतर  क्रमाक्रमाने सर्व खोल्या उघडल्यानंतरच व घरात विषारी वायूचा वास येत नसल्याची खात्री करून  मगच सर्वानी घरात प्रवेश करावा. घराच्या खिडक्या, काचा काही काळ उघडय़ा ठेवाव्यात. त्यामुळे घरात वायुविजन होण्यास मदत होईल.

*   स्वयंपाकघरातील पाणी पिण्याची व जेवण करण्याची सर्व भांडी स्वच्छ करून मगच वापरण्यास घ्यावी. स्वयंपाकाचा ओटा, सिंक स्वच्छ करणे. त्यानंतर संपूर्ण घराची फरशी स्वच्छ करणे. जेणेकरून घरात लहान मूल असल्यास काही अनुचित घटना टाळता येईल.

*   पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर घरात प्रवेश करून वावरताना सर्वानी नाका-तोंडाला मास्क लावणे.

*   अलीकडे रोज नवनवीन पेस्ट कंट्रोल कंपनींचे फलक संस्थेच्या गेटवर व झाडावर लावलेले दिसतात. परंतु अशा कंपन्या कोणती रसायने वापरतात, त्यांचा कर्मचारीवर्ग प्रशिक्षित आहे का, तसेच  ग्राहकांना योग्य ती माहिती देतात किंवा नाही याची प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक आहे.

Story img Loader