मनोज अणावकर
आजच्या काळात सकाळी उठल्यापासून आपण आपल्या तोंडात कोणती ना कोणती रसायनं कोंबत असतो. सगळ्यात आधी टूथपेस्टने सुरुवात होते. मग दिवसभरात जेवता-खाताना जंतुनाशकं फवारलेल्या भाज्या, फळं आणि अन्नपदार्थ टिकून राहावेत यासाठी घातलेले प्रिझव्र्हेटिव्हज् अर्थात पुन्हा रासायनिक पदार्थच! इतकी सारी रसायनं खाऊनही माणूस साठ-सत्तर वर्ष जगतो, म्हणजे मनुष्य देहाची कमालच आहे. पण या जगण्याला आजच्या काळात खरंच अर्थ आहे? कारण रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी यांसारख्या ‘लाइफस्टाइल डिसिजेस’ म्हणून ख्यात असलेल्या जीवनशैलीवर आधारित रोगांशी लढताना, औषधांवर उभा केलेला माणूस हा आयुष्यातला खरा आनंदच गमवून बसतो. माणसाला अजून आनंदाची गोळी तयार करता आलेली नाही, अन्यथा दिवसाला तसल्या दोन गोळ्या खाऊन कृत्रिम आनंद देणाऱ्या जाहिरातीही पाहायला मिळाल्या असत्या. पूर्वीच्या काळी आजीबाई चष्म्याशिवाय सुईत दोरा ओवायच्या, ऊठसूट कोणालाही गुडघेदुखी होत नव्हती आणि डायबिटीस आणि बीपी हे आजचे रोजच्या वापरातले शब्दही लोकांना माहीत नव्हते. आजारपण आलं की, बऱ्याचदा घरगुती पदार्थच त्यांच्यातल्या औषधी गुणांमुळे उपचारासाठी वापरले जायचे आणि लोक त्याने बरेही व्हायचे. जर आजारपणाचं प्रमाण जास्त असलं तर काढे, वनस्पतींचे रस अशा गोष्टींच्या सेवनाने आजार बरे व्हायचे. मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी विविध छंद जोपासले जायचे आणि मग त्याला योगासनांचीही जोड दिली जायची. शरीर, मन आणि एकूणच जगण्याचं नियमन असलेल्या या सर्व एकत्रित प्रयत्नांनाच आपण आयुर्वेदिक आणि योग उपचार पद्धती म्हणून ओळखतो.
अलीकडेच सीआयआय अर्थात, भारतीय औद्योगिक महासंघानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ सालापर्यंत या क्षेत्राच्या वाढीचा दर १६ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या सगळ्या पाश्र्वभूमीवर झपाटय़ाने वाढणाऱ्या या क्षेत्रात अग्रणी असलेल्या विको लॅबोरेटरीजच्या ऑफिसबद्दल, त्याच्या वाढीबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या या ऑफिसची अंतर्गत रचना, सजावट आणि एकूणच वातावरणनिर्मितीबाबत विकोचे संस्थापक असलेल्या केशवराव पेंढरकरांचे नातू आणि विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांच्याकडून जाणून घेऊ या..
विको लॅबोरेटरीजची स्थापना केव्हा आणि कशी झाली?
साधारण १९५० च्या सुमाराला फ्लोराइड टूथपेस्टचे मौखिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात यायला लागले आणि त्याबाबत दंतआरोग्याच्या वाढणाऱ्या तक्रारी आणि फ्लोरोसिससारख्या आजाराचं प्रमाण वाढत होतं. अशा वेळी यावर काहीतरी उपाय शोधायला हवा या विचाराने माझे आजोबा केशव विष्णू पेंढरकर यांना अस्वस्थ केलं. त्यादृष्टीने लोकांचं आरोग्य धोक्यात न येता कोणते उपचार करता येतील, याचा विचार करत असताना एखादं आयुर्वेदिक उत्पादन असेल तर हे शक्य होईल, अशा विचारानं स्वत:चं असं उत्पादन तयार करून बाजारात आणायचं त्यांनी ठरवलं आणि वडिलांच्या नावाने ‘विको’ अर्थात, ‘विष्णू इंडस्ट्रिअल केमिकल कंपनी’ स्थापन केली. मग बऱ्याच प्रयोगांनंतर १८ वनस्पतींचा वापर करून विको वज्रदंती टूथपावडर त्यांनी तयार केली. यातूनच १९५२ साली विको लॅबोरेटरीजची निर्मिती झाली. माझे वडील गजानन पेंढरकर यांनी या उद्योगात १९५९ साली प्रवेश केला आणि त्यांच्या वडिलांना समर्थपणे साथ दिली आणि विको टूथपेस्ट आणि टर्मरिक क्रीम ही नवी उत्पादनं बाजारात आणलीत. मीही १९८६ पासून या व्यवसायात आलो. त्यानंतर वैयक्तिक निगा राखणारी टर्मरिक स्किन क्रीम, फेसवॉश, शेविंग क्रीम आणि आयुर्वेदिक औषधोपचार करणारी विको नारायणी तेल, क्रीम आणि स्प्रे अशी आमची विविध उत्पादनं बाजारात आणली. ही उत्पादनं अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात आणि आइसलँड अशा जगभरातल्या सुमारे ५० विविध देशांमध्ये निर्यात केली जातात. या कामात आता माझा मुलगा चिराग याची म्हणजेच चौथ्या पिढीचीही साथ लाभते आहे. फार्मसीचं तसंच व्यवस्थापनाचंही शिक्षणही त्याने घेतलं आहे. तो निर्यात विभाग सांभाळतो.
तुमच्या या व्यवसायातली निर्मितीपासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया कशी असते? त्यासाठी कोणते विभाग कंपनीत आहेत आणि त्यांची ऑफिसमधली रचना कशी केली आहे?
नागपूरमधल्या १०० एकर जागेवर असलेल्या औषधी वनस्पतींच्या शेतीतून मिळणारा कच्चा माल आम्ही आमच्या उत्पादनांसाठी वापरतो. नागपूर, गोवा आणि डोंबिवली याठिकाणी असलेल्या कारखान्यांमध्ये ही उत्पादनं तयार केली जातात. (छायाचित्र १) विविध देशांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांची निर्मिती ही त्या त्या देशांमधल्या प्रचलित औषध-मानकांनुसार करावी लागते. त्यामुळे निर्यात केली जाणारी उत्पादनं ही डोंबिवलीतल्या कारखान्यात तयार होतात, तर गोवा आणि नागपुरात देशांतर्गत उत्पादनांची निर्मिती होते. उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल वापरण्याआधी विविध चाचण्या करून त्याच्या गुणवत्तेची खात्री करून मगच वापरला जात असल्याने, या कारखान्यांमध्ये चाचण्या आणि संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा, मायक्रोबायॉलॉजी अर्थात, सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा, क्वालिटी कंट्रोल अर्थात गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि मालाची साठवणूक करणारा स्टोअरेज विभाग या सर्व विभागांची रचना एकमेकांजवळच केली आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा प्रोसेसिंग विभाग, उत्पादनांची प्रत्यक्ष निर्मिती करणारा विभाग, अभियांत्रिकी विभाग, पॅकेजिंग आणि लेबिलग करणाऱ्या विभागांची रचनाही एकमेकांजवळ केली आहे. विविध विभागांच्या भूमिका आणि त्यांचं एकमेकांवरचं परस्परावलंबित्व लक्षात घेऊनच अशा प्रकारची रचना कारखान्यांमध्ये केली आहे. हे झालं कारखान्यांमधल्या निर्मिती प्रक्रियेबाबत! नागपूर आणि मुंबईत कंपनीची कॉर्पोरेट ऑफिसं आहेत. (छायाचित्र २ मध्ये मुंबईतले परळ इथले ऑफिस) त्यातही मुंबईत निर्यात विभागाचं ऑफिस आहे. मुंबईतल्या ऑफिसमध्ये अकाऊंट्स, अॅडमिन आणि निर्यात विभाग आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बठक बोलावायची असेल, तर साधारण बारा माणसं बसू शकतील अशी कॉन्फरन्स रूम माझ्या केबिनसमोरच आहे (छायाचित्र ३ पाहा). ऑफिसमधल्या स्टाफसाठी शेजारीच जोडून असलेल्या इमारतीत व्यवस्था केली आहे. इथे दोन्ही बाजूंना खिडक्या असल्यामुळे हवा खेळती राहायला मदत होते. कामाच्या टेबलावर रोजच्या कागदपत्रांसाठी कपाटं केली आहेत, तर फाइल्स ठेवण्यासाठी स्लाइिडग दरवाजे असलेली उंच कपाटं करून घेतली आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांचं सामान ठेवता यावं म्हणून या भागाच्या प्रवेशद्वाराशेजारी लॉकर्स केले आहेत (छायाचित्र ४). याच भागात एक छोटी पँट्रीही केली आहे (छायाचित्र ५). नागपूरचं ऑफिस तुलनेनं मोठं आहे. त्यामुळे तिथली माझी केबिन तर प्रशस्त आहेच, पण कर्मचाऱ्यांसाठी डायिनगरूम आणि आलेल्या पाहुण्यासाठीची वेटिंग एरियाही प्रशस्त आहे. (छायाचित्र ६).
ऑफिसमध्ये रंगांचं व्यवस्थापन आणि प्रकाशव्यवस्था कशी केली आहे?
भिंतींसाठी ऑफ व्हाइट, तर विकोच्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने हळदीचा वापर असल्यामुळे पिवळ्या रंगाचा वापर प्रामुख्याने केबिनमध्ये केला आहे. उजळ रंग हे मनाला प्रसन्नता देतात. त्यामुळे त्यांच्या वापरावर भर दिला आहे. जिथे शक्य आहे त्या ठिकाणी नैसर्गिक प्रकाशव्यवस्था केली आहे, तर गरज असेल तिथे पांढरा प्रकाश देणाऱ्या दिव्यांच्या माध्यमातून कृत्रिम प्रकाशव्यवस्था केली आहे. रंग आणि प्रकाश यांच्या मनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांतून काम करताना कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं आहे.
तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने ऑफिसच्या रचनेत कोणता विचार केला आहे?
कोणत्याही उद्योगाची वाढ होण्यात कर्मचाऱ्यांचा वाटा महत्त्वाचा असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठीची बठकव्यवस्था ही आरामदायी हवी, याची काळजी घेतली आहे. तसंच रंग, आणि प्रकाशाच्या दृष्टीनेही याआधी सांगितल्याप्रमाणे वातावरणात प्रसन्नता यावी यासाठी रंगांचा आणि प्रकाशाचा वापर खुबीने केला आहे. नागपूर ऑफिस आकाराने मोठं असल्यामुळे तिथे छायाचित्र ६ मध्ये दाखवल्याप्रमाणे आकाराने मोठी अशी डायिनग रूम केली आहे. त्यामुळे एकित्रतपणे जेवताना त्यांच्यात एक खेळीमेळीचं वातावरण राहायला मदत होते.
संजीव पेंढरकर यांच्याबरोबरच्या गप्पांमधून जाणवलेले या ऑफिसमधले काही महत्त्वाचे मुद्दे असे-
अनेकदा आपल्याला असं वाटतं की, पिढीजात उद्योग असणाऱ्या माणसांना सगळं तयार मिळतं. पण आधीच्या पिढीने कमावलेलं नाव जपतानाचं उद्योगात वाढ करून त्याचा विस्तार करणं, हे खरं आव्हान नव्या पिढीसमोर असतं. हे आव्हान संजीव पेंढरकर यांनी पेललं आहेच, पण ते करत असताना अनेक लहानमोठय़ा गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घालून उत्पादन, विक्री आणि निर्यात या तिन्ही गोष्टींच्या वाढीवरही भर दिला आहे. परंपरा जपतानाच नवतंत्रज्ञानाची कास धरत संशोधनाच्या आधारे व्यवसायाची वाढ करणारं हे ऑफिस म्हणूनच अनेक उद्योगांना मार्गदर्शक ठरू शकेल..
इंटिरिअर डिझाइनर
anaokarm@yahoo.co.in