आश्विन अमावास्येला रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासाची जागा शोधते. ज्या वास्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते; त्या वास्तूमध्ये ती निवास करते.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. प्रकाशाचा उत्सव. अंधाराकडून तेजाकडे नेणारा सण. भारतीय संस्कृतीत दिवाळीचा सण हा सणांचा राजा म्हणूनच मानला जातो. आपला भारत देश शेतीप्रधान असल्याने आपल्याकडे ॠतू आणि सण उत्सवांची अगदी योग्य अशी सांगड आपल्या पूर्वाचार्यानी घातली आहे. दिवाळीचा सण हा शरदॠतूमध्ये येतो. धान्य तयार होऊन सगळय़ाच शेतकऱ्यांची घरं धान्याने भरलेली असतात. हे सुगीचे दिवस असतात. समृद्धतेचे, संपन्नतेचे दिवस असतात. म्हणूनच आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब भारतीय माणसं दिवाळीचा सण मोठय़ा आनंदाने, उत्साहाने साजरा करतात.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी या दिवसापासून नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या म्हणजे लक्ष्मी-कुबेर पूजन, कार्तिक प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा आणि कार्तिकशुद्ध द्वितीया म्हणजे यमद्वितीया-भाऊबीज असे पाच दिवस दीपावलीचा सण साजरा केला जातो.
उद्या आश्विन अमावास्येचा दिवस आहे. ज्या दिवशी आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत अमावास्या आहे. म्हणून या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. व्यापारी जन या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी नवीन वर्षांच्या हिशेबाच्या वह्यांची पूजा करतात. घराघरांमधून सामान्य लोक लक्ष्मीची पूजा करतात.
लक्ष्मी हा शब्द ‘लक्ष्म’ म्हणजे ‘चिन्ह’ यावरून तयार झालेला आहे. लक्ष्मीला ‘श्री’ किंवा ‘मा’ असेही म्हटले जाते. ‘श्री’ हे अक्षर स्वस्तिकापासून बनले आहे. म्हणून स्वस्तिक हे लक्ष्मीचे चिन्ह असावे असे मानले जाते. श्री किंवा लक्ष्मी ही एकाच देवीची दोन नावे आहेत. आणि ती विष्णूच्या पत्नीची नावे आहेत. ही लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे आहेत. आणि ती  सर्व पूजनीय आहेत.  
ॠग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे. म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी ती जागी होते. ‘सरसिजनिलयेसरोजहस्ते’ म्हणजे तिच्या हातात कमळ आहे. म्हणजे हत्ती, कमळ, सुवर्ण, बिलव फळ या वस्तू लक्ष्मीशी निगडित आहेत. ती गळय़ात सोन्यारूप्याच्या माळा घालते. ती आल्हाददायक प्रसन्न आहे. तृप्तता आणि समाधान देणारी आहे. असे तिचे श्रीसूक्तात वर्णन केले गेले आहे.
आश्विन अमावास्येला रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासाची जागा शोधते. ज्या वास्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते; त्या वास्तूमध्ये ती निवास करते. त्याचप्रमाणे चारित्र्यवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव्य करणे तिला आवडते. म्हणूनच आपले राहण्याचे घर स्वच्छ, प्रसन्न ठेवले, घरातील सर्व माणसे सदाचारी, उद्योगप्रिय, शांत, समाधानी, संयमी आणि चारित्र्यवान असतील तर त्या घरात लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने वास्तव्य करेल.
या आश्विन कृष्ण अमावास्येला कुबेराचीही लक्ष्मीबरोबर पूजा केली जाते. कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आहे. पुलत्स्य ॠषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत. विश्रवा हा पुलत्स्य ॠषीचा पुत्र होय. आणि कुबेर हा विश्रव्याचा पुत्र होय. म्हणूनच कुबेराला वैश्रवण असे म्हणतात. अत्यंत कष्टाने त्याने संपत्तीचा स्वामी आणि विश्वसंरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. मंत्रपुष्पांजलीमध्येसुद्धा ‘‘कुबेराजवैश्रवणाय महाराज नम:’’ असा वैश्रवणाचा उल्लेख आहे.
आपल्या वास्तूमध्ये आपल्याला सुखसमाधान, शांती, ऐश्वर्य लाभावे म्हणून आपण नेहमीच देवी लक्ष्मीची प्रार्थना करतो. ही लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. ही लक्ष्मी म्हणजे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळविलेले समाधान, संतुष्टता देणारे, यज्ञ देणारे धन असते. म्हणूनच या लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटले जाते.
नमस्ते सर्वदेवांना वरदासि हरे: प्रिया।
या गति: त्वत् प्रसन्नांना सा मे स्यात् तव दर्शनात्॥
‘‘सर्व देवांना वर देणाऱ्या, भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या हे देवी लक्ष्मी तुला माझा नमस्कार असो. तू प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते, ते मलासुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.’’
५ं२३४१ंल्लॠ@ी७स्र्ी२२्रल्ल्िरं.ूे