लंडनचा पहिला दिवस. मंदारने आमच्या लंडन दर्शनची सुरुवात ‘ट्रॅफलगार स्क्वेअरने केली. मंदार पुराणिक हा माझा विद्यार्थी आणि मुलांच्या वर्गातला. गेली अनेक वर्षे तो नोकरी निमित्ताने लंडनला आहे. स्थानिक वास्तुकारच आमच्या सोबत असल्याने आमचे लंडन दर्शन झकास होणार याबद्दल आम्ही आश्वस्त होतो. बरोबर त्याची बायको मधुरपण होती. ती सुद्धा वास्तुकार. अशी आम्ही एकाच क्षेत्रातली, समविचारी मंडळी एकत्र जमलो होतो.
ट्रॉफल्गारची ख्याती एक भव्य चौक अशीच आहे. याचा प्रशस्तपणा, विस्तीर्णपणा नजरेत भरतो. असल्या प्रशस्त गोष्टी आपल्याला पाहायची सवयच नाही. त्यामुळे सहजपणे भारावून जायला होते. पुढे युरोपमध्ये असे प्रशस्त चौक खूप पाहायला मिळाले. तरीपण जगातल्या काही उत्तम चौकांमध्ये त्याची गणना होते. ह्य़ाचे मुख्य आकर्षण आहे ती त्याची दोन कारंजी. तीसचाळीस फूट उंची पाणी वर उडविणारी. हे पाण्याचे तुषार जेव्हा अंगावर पडतात, तेव्हा शरीर आणि मन पुलकित होऊन जाते. समोर दर्यासारंग नेल्सनचा उंचच उंच पुतळा आहे. जो जवळजवळ दिसतच नाही. ह्य़ाचे सेटिंग अतिशय भन्नाट आहे. मागे भव्य नॅशनल आर्ट गॅलरी आहे. बाजूलाही अशाच भव्य दगडी वास्तू आहेत. त्यामुळे शेकडो पर्यटकांनी हे ठिकाण नेहमी फुललेले असते. दीड दोन तास इथे कसे जातात ते कळतही नाही. आर्ट गॅलरीच्या पुढे तीसपस्तीस फुटी रुंद दगडी पायऱ्या आहेत. खाली चौकात जाण्यासाठी. बसलेल्या पर्यटकांनी त्या नेहमी भरलेल्या असतात. जागोजाग अशा बसायला जागा असणे ही उत्तम पर्यटन स्थळाची मागणी असते. ती मिळाली की पर्यटक निश्चिंत होतात. भरपूर फोटो सेशन्स होतात आणि वेळही मजेत जातो. आमचाही वेळ असाच मजेत गेला. इथे माझा पुण्याचा एक वास्तुकार मित्रही भेटला. अचानकपणे त्यामुळे आमचे टोळके नऊदहा जणांचे झाले.
तिथून पुढे आम्ही कोव्हेंट गार्डन केले. तिथून इंडियन हाय कमिशनवरून ‘सॉमरसेट हाउस’ ह्य़ा भव्य बिल्डिंगकडे आलो. इंडियन हाय कमिशनसमोर नेहरूंचा एक अर्धपुतळा आहे. तो पाहताना नाही म्हटले तरी मन अभिमानाने भरून येतेच. ह्य़ा सॉमरसेट हाउसमध्ये एक मोठा चौक आहे. त्यातसुद्धा जागोजाग कारंजी उडत होती. त्यांना पार करून आम्ही टेम्स नदीकाठच्या एम्बॅकमेंटपाशी आलो आणि तिथून थेट ‘वॉटलरू ब्रिज’वरती. टेम्स नदीच्या वळणावर बरोबर हा पूल आहे. पुलावरून नदी पाहताना मन खरोखर भरून येते. कारण अशी भरभरून वाहणारी नदी आपल्याला माहीतच नसते. नदीला पाणी असते हे मी कधीच विसरून गेलो आहे. त्यामुळे शहरामधून वाहणाऱ्या नदीचे वैभव काय असते ते मला एकदम जाणवले. ‘भरलेली स्त्री’ आणि ‘भरलेली नदी’ पाहताना मन कसं भरून येते नाही का? माझेही तसेच झाले. प्रथमदर्शनीच मन भरून आले.
ह्य़ा पुलावरून लंडनचे विहंगम दृश्य दिसते. डाव्या हाताला थोडे मागच्या बाजूला सेंट पॉल चर्चचा घुमट दिसतो. उजव्या हाताला पार्लमेंट हाउसची लांबलचक वास्तू दिसते आणि बिग बॅनचा टॉवर. दूरवर ‘घेरकिन’ची उंच इमारतही दिसत होती. जी काहीशी उभट अंडय़ासारखी दिसते पण एकूणात लंडनची आकाशरेषा फारशी वेधक नाही हेच खरे.
‘‘आपण ज्या एम्बॅकमेंटवरून आलो त्या खालून सर्व शहराचे सांडपाणी नेलेले आहे आणि दूरवर नेऊन समुद्रात सोडलेले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला अशा तटबंदी (एम्बँकमेंट) आहेत. म्हणून नदीचे हे पाणी बऱ्यापैकी स्वच्छ आहे. नाहीतर याचाही नाला झाला असता.’’ मंदार सांगत होता, स्थानिक माणूस बरोबर असेल तर असे बारकावे पण सहजपणे कळतात.
नदी ओलांडून आम्ही लंडनच्या दक्षिण भागात आलो. पुलावरून खाली उतरलो आणि समोर आला तो पुस्तकांचा जुना बाजार. वेळेअभावी आम्ही पुढे निघालो. उजव्या हाताला भव्य नॅशनल थिएटर आहे. लंडनच्या आकाराला आणि ‘सांस्कृतिक माहात्म्याला’ साजेसे. संपूर्ण आधुनिक शैलीतले आणि अनलंकृत प्लास्टरचे (एक्सपोज्ड कांक्रीट) पण आता त्याला थोडी जुनाट कळा आल्यासारखे वाटले. एकोणीसशे सत्याहत्तर साली याचे उद्घाटन झाले. त्याच्या पुढय़ात एक छोटी मोकळी जागा आहे. त्याचे रूपांतर हिरवळीत केलेले होते. कृत्रिम टर्फ टाकून. तेथे एक-दोन भले मोठे काँक्रीटचे सोफेपण होते. त्यावरही हे हिरवे टर्फ फिरवलेले होते. छोटी मुलं तेथे बागडत होती. मोठी माणसे घोळका करून गप्पांमध्ये दंग होती. एकूण सर्व वातावरण खेळकर आणि उत्साही वाटले.
समोर काळ्या ग्रॅनाइटमधले एक शिल्प होते. वक्षस्थळे उघडी असणाऱ्या दोन पुष्ट स्त्रियांचे आणि गंमत म्हणजे एक विशीतला ‘गे’ वाटणारा मुलगा त्या स्त्रियांच्या मांडय़ांवर बिनधास्त रेलला होता. मी लगेच त्याचा फोटो काढला. कधीकधी फोटोलाही असे गमतीशीर विषय मिळतात.
पलीकडे नदीकाठचा पादचारी मार्गाचा रुंद पट्टा दिसला. तो थोडय़ा वरच्या पातळीवर होता. त्याच्या पायऱ्या पायऱ्यांचे एक गमतीशीर डिझाइन केले होते. या नदीकाठच्या मार्गावरती ओळीने झाडे होती. ठरावीक अंतरावर लावलेली. या झाडांभोवती स्टीलचे कट्टे होते. चारही बाजूने बसण्यासाठी. आणि त्यावर चारही बाजूने माणसे बसलेली असत. नदीलगत स्टीलचे रेलिंग होते आणि ओळीने त्यावर जुन्या पद्धतीचे दिवे होते. अशा या माणसांनी गजबलेल्या पादचारी मार्गावर जरा रेंगाळलो. भोवतालच्या माहोलचा आस्वाद घेतला आणि पुढे निघालो.
परत पुलाखालून डाव्या बाजूला आलो. इथे लंडनचा प्रसिद्ध रॉयल फेस्टिव्हल हॉल आहे. खास वाद्यवृंदासाठी बनवलेला आहे. १९५१ साली लंडन फेस्टिव्हलसाठी हा मुद्दाम बनवला गेला. इथे पहिल्या मजल्यावर प्रशस्त डेक आहे. ज्यावर उघडय़ावरचे रेस्टॉरंट आहे. तासनतास गप्पा मारत बसायला अतिशय मस्त जागा आणि आपल्या रूपालीसारखेच अड्डे. फक्त तरुण स्त्री-पुरुषांचे आणि वयस्क लोकांचेसुद्धा. येथे येऊन बसावे आणि टेम्स नदीच्या माहोलचा आनंद लुटावा. इतकी ही झकास जागा आहे.
पण मंदार आम्हाला त्याच वास्तूत चौथ्या मजल्यावर घेऊन गेला. तेथे लांबच्या लांब व्हरांडा आहे. फारशी गर्दी नसते. तिथून लंडनचा दूरवरचा नजारा दिसतो. पहिली दहापंधरा मिनिटे हा नजारा डोळे भरून बघण्यातच गेली. तिथून भरपूर फोटो काढले. खालच्या डेकवरच्या माणसांचाही काढला. झकास आला. तिथे आमचे बिअरपान झाले. थोडी खादन्ती झाली. एखाद तास आरामही झाला. आम्ही खाली उतरलो.
परत डेकवर आलो. उन्हं कलली होती. संध्याकाळचा सातचा सुमार असावा. पण वाटत होते चार-साडेचार वाजल्यासारखे. रात्री नऊनंतर अंधार पडतो. सर्वत्र माणसांची भरपूर वर्दळ होती. शिवाय ही माणसे जगभरातली असल्याने त्यांच्यात वैविध्यही होते. त्यामुळे आजूबाजूची माणसं पाहणे हा देखील एक मोठा विरंगुळा होता. खरं तर या माणसांमुळेच या जागा जिवंत होतात आणि मग अशा माणसांनी भरभरून वाहणाऱ्या रस्त्यांवर हिंडायला आपल्याला आवडते. हे साधे मानसशास्त्र आहे. आपल्या राज्यकर्त्यांना हे कधी कळलेच नाही. त्यामुळे आपली तरुण प्रेमिक मंडळी पुलांच्या फूटपाथवर बसतात मोटारसायकलचा आडोसा करून. पण ज्यांना नोकरी नाही, त्यांना छोकरी नाही. या दोन्ही गोष्टी नसणारे मग प्रामुख्याने गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारी कमी करायची असेल, तर प्रथम बेकारी हटवावी लागेल आणि शहरामध्ये जागोजाग सुंदर ‘पब्लिक स्पेसेस’ कराव्या लागतील. एवढय़ा दोन गोष्टी जरी सत्ताधाऱ्यांना कळल्या तर (गल्लीतल्या आणि दिल्लीतल्या दोन्ही) गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणावर आटोक्यात येईल.
लंडनमधला दुसरा दिवस. प्रथम मॅन्शन हाउस बघितले. तेथून फायर मॉन्युमेंट बघितले. १६६६ साली लंडनला प्रचंड आग लागली. त्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध वास्तुकार ‘क्रिस्तोफर रेन’ याने या मान्युमेंटची रचना केली होती. तिथे थोडा वेळ घालवून आम्ही थेट नदीकाठी आलो. तिथून ‘टॉवर ब्रिज’चे पहिले दर्शन झाले. आम्ही त्यालाच लंडन ब्रिज समजत होतो. तो भव्य पूल लंडन शहराची खरोखरच शान आहे. तिथे अर्थातच भरपूर फोटो काढले गेले. गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा फोटो काढण्यात आपण जास्त वेळ घालवतो.
त्या पुलाकडे जाण्यासाठी नदीकाठचा रुंद रस्ता आहे. जेमतेम अर्धा पाऊण किलोमीटर असेल. पण सर्व दगडी फरसबंदी होती. डाव्या हाताला टॉवर ऑफ लंडन हा दगडी भुईकोट किल्ला. ह्य़ा रस्त्यावरसुद्धा ओळीने झाडे आहेत. बाकडी आहेत. दिवे आहेत आणि मुख्य म्हणजे हाही रस्ता पर्यटकांनी भरलेला होता. नदीच्या दोन्ही बाजूला असलेले असे रस्ते नदीची शान वाढवतात. तर नदी या रस्त्यांची! दोघेही एकमेकांना पूरक. अर्बन डिझाइनच्या भाषेत यांना ‘रिव्हर डेव्हलपमेंट’ म्हणतात. युरोपातल्या सर्व शहरांनी आपापल्या नद्यांचा असा कायापालट केलेला दिसेल.
पुढे टॉवर ब्रिजवरून रमतगमत नदीच्या दक्षिणकाठी आलो. उत्तरकाठाचा नदी विकास पारंपरिक पद्धतीचा होता. तर हा पूर्णपणे आधुनिक पद्धतीचा. अत्याधुनिक पद्धतीच्या ऑफिस बिल्डिंगचे एक छोटे संकुल येथे होते. ह्य़ातली ‘टाउन हॉलची’ वास्तू वेगळी आणि हटके होती आणि ती ह्य़ा संकुलाची शान होती. त्यामुळे इथे हिंडताना आम्ही या सुंदर परिसराने भारून गेलो. जणू एखाद्या परिकथेतल्या राजकुमारासारखे आहोत असे सारखे वाटत होते. इथे वावरताना आम्ही हवेत तरंगल्यासारखे वावरत होतो. ही किमया उत्तम परिसर विकासाचीच होती. (अर्बन डेव्हलपमेंट) त्यामुळे इथे काही काळ रेंगाळावे असे सतत वाटे. असे वाटत राहणे हीच याच्या उत्तम विकासाची पावती. केवळ आमच्याच नव्हे तर येणाऱ्या सर्व पर्यटकांचीही हीच भावना असावी.
टेम्स नदीकाठी आमचा जवळपास एक दिवस मजेत गेला. पर्यटकांनाही नेमके हेच पाहिजे असते. म्हणूनच शहर प्रशासक जागोजाग अशा जागा निर्माण करतात. मग जगभरचे पर्यटकही ‘पाहिलेच पाहिजे’ अशा ठिकाणाच्या यादीत त्याचा समावेश करतात. अशा ठिकाणांना भेटी पण देतात. ‘पर्यटक देवो नम:’ हे युरोपचे आज ब्रीद वाक्य आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार