शाळा ही केवळ एक वास्तू नव्हे, ती देशाचं भविष्य असलेल्या बालकांची मानसिक-शारीरिक जडणघडण करणारी एक संस्थाच! बालशिक्षणाचा पाया रोवणाऱ्या ताराबाई मोडकांनी ‘शाळा’ या वास्तूला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला. आजच्या ‘महिला दिना’निमित्त ताराबाईंनी उभारलेल्या शाळांविषयी..
अ मरावती, मालटेकडीवरचा प्रशस्त बंगला, पुढच्या बाजूला पोर्च, भोवताली व्हरांडा, चारी बाजूंना मोकळं आवार, मागे विहीर, गॅरेज आणि गोठा. गोठय़ात तैनात राखलेली लाडकी म्हैस आणि वाळय़ाचा पंखा, ज्यांच्यावर नोकर झुलवताहेत असे लाडावलेले कुत्रे! पुढच्या बाजूला निगराणी राखलेली फळा-फुलांनी डवरलेली बाग, दाट मखमली रेखीव हिरवळ, मागच्या अंगणात बॅडमिंटनचं कोर्ट. तिथं खेळणारे कृष्णाजी वामन मोडक, ताराबाई मोडक आणि त्यांचे स्नेही.
हिरवळीवर वेताच्या खुच्र्या, सुविद्य, रसिक सुखवस्तू मित्रमंडळी- युरोपियन अधिकारीसुद्धा- चांदीच्या नक्षीदार ट्रेमधून येणाऱ्या चहा-फराळ, फळांचा आस्वाद घेणारे, त्यांना हवे-नको पाहणारे अदबशीर बटलर! स्वयंपाकी, चपराशी, ड्रायव्हर, खानसामा अशी नोकरांची फौज! हवापालट, विश्रांती, शिक्षणासाठी आलेले, राहणारे आप्तस्वकीय. आतल्या भागात उत्तमोत्तम मराठी-इंग्रजी ग्रंथांचा सधन संग्रह आणि त्याचा लाभ घेणारे गरजू विद्यार्थी तसेच ग्रंथप्रेमी. नाटकं, गाणी, साहित्य यांच्या गप्पा, मेजवान्या, मैफली, सहली. यशस्वी वकिलीतले एक बडे प्रस्थ बनलेले केव्ही (श्री. मोडक) आणि १९१४ मध्ये पदवीधर असलेल्या ताराबाई मोडक! अमरावतीमध्ये तर इ.अ. म्हणजे अपूर्वाईच! त्यांची सरकारी शाळेतली नोकरी. अशी तरुण, देखणी, सुविद्य, रसिक जोडी, जी केवळ कथा-कादंबऱ्यांतून दिसे, ती प्रत्यक्षात अवतरली होती.
आणि आता ही एक जोडी दिसते गुरु-शिष्याची. ताराबाई मोडक आणि अनुताई! ताराबाईंचा ‘मुलगा ’ किंवा ‘वाघ’! अभावग्रस्तांमध्ये काम करणारी, नवनवे विधायक प्रयोग करणारी, कार्यकर्ते तयार करणारी जोडी. एक ६०च्या पुढची, तर दुसरी पन्नाशीजवळ आलेली. खादीचे भरड कपडे, अलंकार नाहीत, पण चेहऱ्यावर उत्साह! एक बालविधवा, तर एकीने गृहत्याग केलेला. पण दोघीही संकटाचं भांडवल न करता त्यांनी घडवलं. दु:ख भोगावं लागलं तरी त्याचं ही ऋण मानणाऱ्या कोसबाडच्या टेकडीवर वारल्यांसाठी शैक्षणिक तीर्थक्षेत्र उभारणाऱ्या. वारली म्हणजे वारा. शाळेच्या भिंतीत तो कसा बंद करणार? मग निघते बिनभिंतीची शाळा! आभासी शाळा! आपली शाळा म्हणजे ‘मुलांच्या अंगणातलं झाड झालं पाहिजे.’ मग त्यांच्याच अंगणात जायचं. नंतर लक्षात आलं, त्यांच्या समस्या वेगळय़ाच आहेत. धाकटय़ा भावंडांना सांभाळणं, गुरांपाठी जाणं त्यांना आवश्यक वाटत होतं. म्हणून मग पाळणाघर, प्राथमिक शाळा, कुरणशाळा, रात्रशाळा या कल्पना राबवल्या. भाताच्या मुदीसारख्या निर्विकार चेहऱ्यांवर हसू फुलू लागलं, भाव आले. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या संकल्पनांना जुळणारी उदाहरणं, शिकत आहोत हे जाणवू न देता दिलेला रूढ अभ्यासक्रमापलीकडचा अभ्यास. आजवर आदिवासींवर इतक्या वेगवेगळय़ा स्तरांवर अत्याचार आणि शोषण झाले आहे की, साप-वाघाला न घाबरणारी ही माणसं ‘पांढऱ्या कपडय़ाला’ घाबरतात. त्यामुळे त्यांच्यात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं, त्यांना जवळ यायला लावणं ही कसोटी होती. त्यांना माणसात आणणं गरजेचं होतं. मग दोघींनाही कधीही बरा न होणारा ‘बालरोग’ जडला.
मग त्यांच्या अंगणात जायचं, झाडांचे बुंधे मातीने सारवायचे, आजूबाजूच्या पाना-फुलांनी, बियांनी चिकटवून नक्षी काढायची, रंगवायची. एकीने शेणाचा पोह आणला. त्याला आकार दिला, रंग लावला, फुलं खोवली. कुणी शिंपल्यांचा वापर केला. मग एकेकाची आपल्या अंगणात यावं म्हणून आमंत्रणं सुरू झाली. कधी मुलं लपून बसत. त्यांना हाकारलं ‘सोमी’, ‘मंगळय़ा’, ‘चैता’, ‘शनवाऱ्या’ (त्यांची नावं वारा-महिन्यांची असत) तरी यायचीच नाहीत. मग झोपडीच्या दाराशी मणी आणि दोरा वाटीत ठेवला, तर वाटी गुप्त, पण थोडय़ाच वेळात मणी ओवून माळा तयार. आणि एक लाजरं हसू! असा विश्वास कमावल्यानंतर मग स्वच्छता, आंघोळी घालणं, औषधं देणं, मलम लावणं, हे सुरू झालं. मग ताराबाईंच्या लक्षात आलं की, त्यांची मुख्य समस्या ‘भूक’ आहे. एकेक कंद, मूळ, फळ मिळवण्याकरिता ते दिवस खर्ची घालतात. मोटारींची गाणी, ताऱ्यांच्या गोष्टी त्यांना कशा रिझवणार? मग फंडस् गोळा केले गेले, शासनाला धडका मारल्या, त्यांच्या भाताची व्यवस्था केली. तशा आंगणवाडय़ा खुलायला लागल्या. त्यांच्या मातीतली गाणी गोळा करून त्यावरच फेर धरला. गुरांमागे जाणाऱ्या मुलांपाठोपाठ शिक्षक गेले. पावसापाण्यात, उन्हातान्हात शिक्षकही भटकले. भाजी, बांबूचे कोंब, खेकडे हुडकले. गोगलगायीप्रमाणे शिक्षक पाठीवरच शाळा घेऊन जाई. अशी ‘कुरणशाळा’ सुरू झाली. ‘बारसं’ माहीतच नव्हतं ती प्रथा सुरू केली. गणितासाठी दगड, फुलं, बियांचा वापर केला. साप सापडला की त्याच्या जाती, त्याचं काम, पक्षी मारला की पक्ष्यांची ओळख, पिसं गोळा करायला सांगून त्यांच्या आधारे वेगवेगळे रंग, त्यांची लांबी, कोणाची पिसं, त्यांचं लहान-मोठेपण, त्यांची घरटी अशी माहिती द्यायची. उडीद काळे, मग त्यांचे पापड पांढरे कसे होतात, त्याचं प्रात्यक्षिकच दाखवायचं. चिंचोके, वेगवेगळय़ा बियांबरोबर दगडही पेरायचा आणि सजीव-निर्जीव यांच्या संकल्पना सांगायच्या. सगळा अभ्यासक्रम अनुभवातूनच घडवला. साचेबंदपणाला वावच नव्हता. लांब उडीचा खेळ वा झाडाची सावली पावलांनी मोजून मग हळूच फूटपट्टी काढायची. सगळी अंतरं मोजायला लावायची. मग मुलं मास्तरणींना घेऊन ओढय़ावर गेली. १० फूट रुंदीचा ओढा एका ढेंगेत पार केलाच, पण गायींनासुद्धा पार करायला लावला. शिक्षिकाच नापास व्हायची वेळ आली. अंगणातच काही उद्योग सुरू केले. रेती चाळायची, छोटय़ा विटा बनवायच्या, मग बालवाडीची साधनं बाहेर काढून त्याद्वारे शिक्षण द्यायचं. विकासवाडीचा उद्योगवर्ग म्हणजे काम आणि शिक्षण यांची सांगड घालण्याचा हा यशस्वी प्रयोग शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. इथं खडू, लाकडी खेळणी, छत्र्या, बालवाडीची साधनं बनवली जातात. त्यातून उपजीविकाही होते. आदिवासींच्या जीवनाशी समरस होत, सतत राबत, कष्टत, त्यांना फुलवत स्वत:ला या कार्याचे फक्त साधन मानलं. हेच जीवनकार्य समजून आयुष्याला साजरं करणारी ही जोडी!
आता मुलं रात्री घरी न जाता इथंच राहू लागली. मग ‘रात्रशाळा’ही झाली. ७ वीपर्यंत शिक्षण मिळून छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या मिळायला लागल्या. मुख्य म्हणजे ही मुलं व्यसनापासून दूर राहायला लागली. एके दिवशी १५-२० मुलींची ‘हसरी लाट’ उभी राहिली.
‘आमी पन शिकनार’ म्हणाली. जिथं १/१ मूल मिळवायला कष्ट पडायचे तिथं आपणहून एकगठ्ठा मुलं येऊ लागली, हे यशच!
वसतिगृहासह विद्यालय, त्याला व्यवसाय शिक्षणाची जोड आणि शेतजमिनीचा तुकडा अशी आश्रमशाळाही थाटली गेली.
(शासनाची शाळा म्हणजे २० ७ २० ची बिनभिंतींची झोपडी असे. मध्यभागी उंच खांब, भोवताली ८ खांब आणि उतरते छप्पर अशी. दारं-खिडक्या असण्याचा संबंधच नसलेला. एक शिक्षकी चार वर्गाची शाळा असं स्वरूप असे. तिचंही स्वरूप नेटकं केलं गेलं.)
याआधीचं त्यांचं आयुष्यही शिक्षण क्षेत्रातच गेलं, पण किती वेगळं वातावरण! शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी आणि साधनं पुरवणारे तत्पर पालक! घरच्या आघाडीवर सगळी रांगोळी विस्कटली होती. घर सोडण्याची वेळ आली. मग राजकोट येथे ताराबाई २९ व्या वर्षी ‘फिमेल ट्रेनिंग कॉलेज’च्या पहिल्या भारतीय स्त्री-प्राचार्या झाल्या. ही मोठी रुबाबाची, मोठय़ा पगाराची नोकरी होती. कॉलेजच्या आवारातच इंग्रजी बांधणीचा मोठा बंगला, मोठं आवार, हिरवळ, बाग, नोकरांसाठी स्वतंत्र घर, वाहनसुख असं मोठं स्वत:चं असं वैभव प्राप्त झालं. पण दोन वर्षांतच या ऐश्वर्याचा त्याग करून आपली मुलगी ‘प्रभा’ हिच्यासाठी गिरिजाशंकर बधेका यांची माँटेसरी पद्धतीची शाळा योग्य वाटली म्हणून भावनगर गाठलं. आयुष्यातून अनेक गोष्टींची वजाबाकी होणार होती. पण देहा-मनाची? सर्व हौस-मौजेची त्यांनी निर्दयपणे काटछाट केली. तिथं त्यांना दोन खोल्यांचं स्वतंत्र घर मिळालं, ते पुढे ‘ताराबेननु घर’ म्हणून ओळखलं जाई. या शाळेत राष्ट्रीय, नैतिक, सांस्कृतिक शिक्षणावर भर होता. बालकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, त्याला संधी द्या, शिक्षकाने मार्गदर्शक बनायचे अशी भूमिका होती. बालशिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची खरी घडण इथंच झाली. इथं नऊ र्वष काम केल्यावर. पुढे त्यांना बडोद्याजवळच्या ‘बांसदा’ संस्थानात राजघराण्यातील मुला-मुलींना सांस्कृतिक-शैक्षणिक देखभालीसाठी नियुक्त केलं. पगाराबरोबरीनेच अनेक राजेशाही सवलती होत्या. राजवाडय़ाचा परिसर अर्थातच खूप भव्य, कारंजे, बगीचा हिरवळ असा होता. तिथं दुमजली बंगला त्यांना मिळाला. उजव्या बाजूला अतिथिगृह, क्लब वगैरे इमारती. बाकी सर्व थाट हत्ती, घोडे, दरबार इ. होताच. पॅलेसमध्ये समृद्ध वाचनालयही होतं. प्रत्येकच ठिकाणी ताराबाई आपला आव आणि स्वत्त्व राखून इतरांशी समरस होत आणि सर्वाची मनं जिंकून घेत. एकदा महाबळेश्वरला गेले असताना त्यांनी राजकुमाराला प्रत्येक झाडावर ‘ढ’ काढायला सांगितला आणि येताना किती काढले ते मोजायला सांगितलं. मग परत त्यांच्याबरोबर जाऊन किती बरोबर ते सांगून आता चुकले किती, ते विचारलं. मग प्रत्येक ‘ढ’ पुसत त्या त्या झाडा-पानांची माहिती सांगितली आणि आता उद्या दुसरं अक्षर काढू या म्हणून सांगितलं. अशा पद्धतीने मुलांशी जवळीक होऊन मजेमजेत शिक्षणही होई. फक्त दोन र्वष इथं राहूनही राजपुत्राने त्यांना अखेपर्यंत लक्षात ठेवलं होतं.
पुन्हा प्रभासाठी मुंबईला आल्या. तिथंच हिंदू कॉलनीत चार खोल्यांचा तिसऱ्या मजल्यावर ब्लॉक घेतला. ‘शिशुविहार’ बालमंदिरसारख्या शाळा पायापासून रचल्या. अनेक विधायक उपक्रम तिथं राबवले. अंगस्वच्छता, शांतीच्या खेळासाठी वेगळी खोली, वेगवेगळे खेळ, चित्र काढणं, यामुळे मुलं शाळेत रमत. ही शाळाही चांगली नावारूपाला आली.
त्यानंतर त्यांनी बोर्डी हे समुद्रकाठचं गाव आपलं कार्यक्षेत्र केलं. तिथं त्यांना समुद्राला लागूनच असलेला एक बंगला भाडय़ाने मिळाला. भोवती छान आवार, चिंच-आंबा अशी झाडं, हात रहाटाची विहीर. शेजारी एक लांबलचक दालन. आणि मागच्या बाजूला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना राहता येईल अशी दुमजली चाळ. आजूबाजूला वेगवेगळ्या जातींची वस्ती. इथं चिकू, आंबा, नारळ यांच्या वाडय़ा होत्या म्हणून यांचीही ‘बालवाडी’ झाली, पण इथंही खूप त्रास झाला. मुलांचा वयोगट असा स्थिर नाही. संख्याही बदलती, सहकार्यात औदासीन्य. स्पृशास्पृश्यतेची समस्या तीव्र, सवर्णाची नाराजी. पण अथक परिश्रम, ठामपणा, तटस्थ, चिकाटी दाखवून विरोधाची धार बोथट केली. पण अस्पृश्य-सवर्ण अशा भिन्न शाळा काढल्या नाहीत. सर्व अडथळय़ांची शर्यत पार पाडली.
या सर्व अनुभवांची शिदोरी आणि वाघासारख्या अनुताई यांना बरोबर घेऊन त्यांनी कोसबाडची टेकडी काबीज केली आणि आपल्या सर्व क्षमतांचा वापर करून स्थायी स्वरूपाच्या कार्याला दिशा दिली
संदर्भ : १) ताराबाई मोडक : पद्मजा फाटक
२) कोसबाडच्या टेकडीवरून – अनुताई वाघ,
संपादन – अशोक चिटणीस
शाळा उभारताना..
शाळा ही केवळ एक वास्तू नव्हे, ती देशाचं भविष्य असलेल्या बालकांची मानसिक-शारीरिक जडण्घडण करणारी एक संस्थाच!

First published on: 08-03-2014 at 10:52 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School development