केरळातील कन्नरू जिल्ह्य़ात एका मुस्लीम व्हिडिओ छायाचित्रकाराचा स्टुडिओ त्याने मुस्लिमांमधील पडदा पद्धतीला विरोध करणारा संदेश व्हॉट्सअॅपवर टाकल्याने जाळून टाकण्यात आला. शनिवारी ही घटना घडली आहे. कन्नूर येथील तालिपरम्बा येथे पी. रफीक याचा स्टुडिओ असून रफीक हा एका व्हॉट्सअॅप गटाचा नियंत्रक होता. त्या गटाचे नाव व्हॉट्स इस्लाम असे आहे. रफीक हा डाव्या विचारांचा असून त्याने मुस्लिमांमध्ये पडदा पद्धतीच्या नावाखाली अनेक लोक अनैतिक कृत्ये करतात अशी टिप्पणी त्याने व्हॉट्सअॅपवर केली. त्यानंतर मुस्लीम समाजातून त्याला धमक्या येऊ लागल्या कारण केरळ व आखाती देशातील मुस्लीम समाजात त्याचा हा संदेश चर्चिला गेला होता. रफीक याने सांगितले की, नंतर अनेकांनी माझ्या स्टुडिओवर बहिष्कार टाकला व मला समाजातील कुणीही काम देऊ नये असा आदेश काढला. नंतर इंटरनेटवर धमक्या येऊ लागल्या. माझा कुठल्या मुस्लीम संघटनेवर असा संशय नाही कारण सर्वच मुस्लीम संघटना कर्मठ आहेत त्यामुळे कुणीही असा हल्ला करू शकते. तोंडावर बुरखा किंवा पडदा घेण्याचे गैरवापर मला सांगायचे होते. समाजातील लोकांनी माझा स्टुडिओ नंतर जाळला त्यात १० लाखांचे नुकसान झाले. त्याने पोलीस तक्रारीत असे म्हटले आहे की, आग लावली जाण्याच्या आधी मी या स्टुडिओचे नूतनीकरण केले होते. आता सगळी साधनसामग्री व फर्निचर जळून गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात टोकाच्या विचाराचे गट असू शकतात व या घटनेची चौकशी चालू आहे.