गावकऱ्यांचं तर ते श्रद्धास्थान! ‘तुंबाड’ गावची पहिली वास्तू! या वास्तूतील माणसांबद्दल बरं-वाईट, वेडं-वाकडं बोललं गेलं तरी गावाच्या प्रतिष्ठेचं प्रतीक होतं ‘वाडा’!
पुरुषभर उंचीचा चौथरा, एखाद्या सिंहासनावर विराजमान व्हावं तसा वाडा, प्रशस्त ‘ओटी’. तिथं पोहोचायला लांबलचक पायऱ्या चढून जावं लागे. काळवत्री दगडाचे उंच-उंच खांब! सर्वत्र साग-शिसवीच्या लाकडाचा वापर; एकेक बहाल कवेत न मावणारा, इतक्या वर्षांनंतरही चकाकणारं लाकूड. एक भारदस्त वास्तू! नव्याने सासरी आलेल्या गोदावरीला प्रथमदर्शनी ती वास्तू म्हणजे ‘अंगावर चालून येणारं प्रचंड धूड’ आहे असं भासतं. सर्वानाच वाडय़ाबद्दल प्रचंड जिव्हाळा! इतका की ओडुलने बांधलेला बंगला असो, बजापाने धो धो पैसा ओतून बांधायला घेतलेला वाडा असो की नरसू खोताचा लिंबाडचा वाडा असो, सर्वाचं प्रेरणास्थान ‘तुंबाडचा वाडा’ असला तरी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट चार-दोन अंगुळांनी कमीच होण्याचं पथ्य पाळलं आहे. कारण वाडय़ाची बरोबरी करावी ही ईर्षां नाहीच. उलट कितीही किमती सामान वापरलं तरी ‘मूळ पुरुष मोरयाचे लागलेले हात’ आणि ‘चारशे वर्षांच्या वयामुळे’ आलेले ‘अनमोलपण’ आपल्या नव्या वास्तूंना येणार नाही, हे त्यांनी मनोमन ओळखलं आहे.
वाडय़ाचा दिवाणखाना तर राजवैभव ओसंडून जात असावा असा! एका वेळी शंभर माणसं आरामात बसू शकतील इतका भव्य. सागवानी लाकडाची तक्तपोशी, छताला टांगलेल्या उंची हंडय़ा झुंबरं. विशेषत: जुलालीनं दिलेलं झुंबर खासच राजेशाही, दुर्मीळ खानदानी! ज्याचे लोलकही जपून ठेवावेत असं. भिंतीपर्यंत भिडलेलं जाडजूड जाजम, आरामदायी लोड जसा राजाचा दरबारच! तिथं येणारही प्रतिष्ठित माणसंच. ठेंगू माणसांना येथे प्रवेश नाहीच. इथं खोतही वेगळेच बनतात. सौम्य, रसिक, अदबशीर वागणारे, आम जनतेच्या वाटय़ाला येणारी खोतांची मग्रुरी, रगेलपणाची इथं नावनिशाणीही नाही. इथं कारभार होतो तो खरेदी-विक्रीचा, कधी सोंगटय़ांचा डाव, कधी इंग्रजांविरुद्ध खलबतं. पुढे गणेशशास्त्रींचं अध्ययन-चिंतन, गोदावरीचं ज्ञानेश्वरीचं वाचन. गणेशशास्त्रींनी अखेरचा श्वास घेतला तोही इथंच!
दिवाणखान्याला लागून असलेली खोली. हिने तिच्या आयुष्यात काय काय पाहावं? कधी प्रकाशात तर कधी पूर्ण अंधारात. कधी वर्षांनुवर्षांचा बंदिवास, तर कधी ताईसारख्या साध्वीचं वास्तव्य. या खोलीत ‘मूळ पुरुष’ ध्यानस्थ बसे. पण पुढे त्याचेच वंशज ‘दादा खोत’ आणि ‘बंडू खोत’ अघोरी पंथाची साधना करतात ती या खोलीत. याचा अनपेक्षित शोध त्यांचा धाकटा भाऊ ‘नाना खोत’ला लागतो. अघटित काहीतरी घडतंय याची शंका त्याला होती म्हणून तो लपत-छपत चोरटेपणाने त्या खोलीत प्रवेश करतो, तर विद्रूप-ओंगळ ज्याचा आभासही त्याला नव्हता ते सामोरं येतं. भय दाटून यावं अशी देवीची ओबडधोबड मूर्ती, गांजा भरलेल्या चिलमी, माणसांच्या मणक्यांची माळ, हाडं, कवटय़ांमधून ठेवलेले विचित्र पदार्थ, सर्वत्र पसरलेली दरुगधी, दर्प हे बघून भेदरलेला ‘नाना खोत’ दुसऱ्या दिवशीच भावांपासून वेगळा होतो. खोतांची ‘लिंबाड’ला दुसरी शाखा होते, त्याला कारण ही खोली. ‘वझे काकां’च्या खुनाच्या आरोपावरून ही खोली पोलीस उघडतात आणि त्याच अमंगळाचे दर्शन घेतात. या प्रकरणात खोतांची सगळी मग्रुरी, रग खच्ची केली जाते. ‘बंडू खोत’ परांगदा होतो. ‘खैराचं झाड’ असं वर्णन असणारा, तांब्याच्या कांबीसारखा ताठ, तजेलदार कृष्णवर्णावर सोन्यामोत्याचे दागिने भूषवणाऱ्या दादा खोताची तर रयाच गेली. मग्रुरी जाऊन चेहरा बापुडवाणा झाला. केस पिकले, दाढा पडल्या, शरीरही गेलं आणि वाडय़ाचं सगळं वैभवही निपटून काढल्यासारखं गेलं. सोनं-नाणं काहीही शिल्लक राहिलं नाही. पोलिसांच्या भीतीने नोकरचाकरही गेले. क्षुद्र माणसेही खोतांना ‘अरे ला कारे’ करू लागली. काही जवळच्यांनी खोतांच्या जमिनी कमी किमतीत लाटल्या. गाई-गुरांविना गोठा सुना झाला. आल्या-गेल्यांची वर्दळ आटली आणि मग हाच वैभवशाली वाडा ‘केशवपन केलेली’ स्त्री प्रथम सामोरी यावी तसा भकासपणे सामोरा येतो. एक पूर्ण तप वाडा हे भकासपण काढतो. ‘दादा खोत’ आणि ‘गोदावरी’चा मुलगा ‘गणेश’ शास्त्री, प्रकांडपंडित आणि उत्तम हातगुण असलेला वैद्य बनून येतो. आणि वाडय़ाच्या मागचे नष्टचर्य संपते. वाडय़ाला परत ‘झळाळी’ प्राप्त होते. धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-थोर न पाहता हा वैद्य, खोत असूनही- सर्वाचा जीवनदाता बनतो. त्यांची सौजन्यपूर्ण वागणूक, गंभीर आजाराला पळवून लावण्याचं सामथ्र्य आणि निलरेभी वृत्ती यामुळे वाडय़ाला वैभव नाही पण तेज प्राप्त होतं. वाडय़ाला पुन्हा एकदा मान-सन्मान, आदर, प्रेम मिळतं. तो पावन होतो. त्याला तीर्थक्षेत्रासारखी प्रतिष्ठा लाभते.
पण पुन्हा चक्र फिरावं तसं वाडय़ात वागणूक वृत्तीचा ओंगळपणा भरतो. दीर-भावजय नात्याला काळिमा फासला जातो. वैभव मात्र दो-दो हातांनी पाणी भरतं. वाद झाले-वाटप झाले तरी वाडा अभंग ठेवायचा यावर एकमत आहे. त्यामुळे वाडा ताठ उभा आहे.
वझेकाकांचं भूत वावरणारा ‘जिना’, वापरून गुळगुळीत झालेल्या ओटीच्या ‘पायठण्या’, अघोरी पंथाचं किळसवाणं दान मागणारी ‘विटाळाची खोली’, बायकांची हितगुजं ऐकणारी ‘टेंभुर्णीची खोली’, विश्रामला गुरासारखं बडवलेलं पाहणारा ‘चौक’, खोताची ‘छपरी पलंगाची खोली’- गोदाची पहिली रात्र याच पलंगावर साजरी होते. दैत्य भासणारा, चाळिशी ओलांडलेला तिजवर आणि १२ वर्षांची नुकतीच नहाण आलेली कोवळी गोदावरी! वाडय़ाच्या पिछाडीला असलेली ‘वपनाची खोली’. तिला दरवाजाही मागून! चोरटेपणाचे कृत्य! दबकत चोरपावलांनी येणारा बापू न्हावी. तिन्ही विधवा सासवांची नित्यनेमाची खोली. पण भागीरथीसारख्या सवाष्ण बाईचेही शिक्षा म्हणून केलेले वपन भयंकरच! स्वरूपसुंदर, ऐन तारुण्यातल्या गोदावरीचे लांबसडक केस कापून तिच्या जागी लाल आलवणातल्या ‘भयानक प्राण्याला’ निर्माण केले ते याच खोलीत.
लिंबाडचा वाडाही तुंबाडसारखाच! ही तुंबाडची धाकटी पाती. दिलदार, माणसांची कदर करणारी, दुसऱ्यांचे संसार उभारून देणारी; इथं ‘बजापाची खिडकी’ आहे. जिथून त्याने वाघाला हुसकावून पाळण्यातल्या बाळाचा जीव वाचवला. इथली ‘गोठय़ाची खोली’ हे नाव फसगत करणारं. ही खोली म्हणजे नरसू खोताचा ‘रंगमहाल’! पुरुषभर उंचीचे आरसे सर्वत्र लावलेले, सगळ्या तऱ्हेचे ऐषाराम असलेले ‘शय्यागृह’! तिथला पाहुणचार मिळणं हा अंमलदारांना सन्मान वाटे. या खोलीने खोताबरोबरच अनेक प्रतिष्ठितांचा रंगेलपणा पाहिला.
एक बिनभिंतीचंही शय्यागृह इथं आहे. इतकं देखणं- पंचतारांकित हॉटेलातही मिळणार नाही असं! मंद सुगंधी वाऱ्याच्या तलम झुळका, हवेत हवासा गारवा, आकाशात चांदण्याचे दिवे, कधी चंद्राचं सुखद प्रकाशमान झुंबर, सतत पखरण करणारी बकुळ. हे आहे बाबल्याशेटच्या घराचं अंगण!
‘सातमायचं देऊळ’ हा तर चमत्कारच! जमिनीच्या पोटात विवर, त्यात पायऱ्या उतरून आत जायचं. पुढे सभागृहाची विस्तीर्ण पोकळी आणि मिट्ट काळोख! टॉर्चच्या प्रकाशात देवीची मूर्ती पाहायची- स्मितहास्य करणारी सहा फुटी! आणि आश्चर्य करायचं अशा काळोखात कोणी आणि कसं उभारलं असेल हे शिल्प? इथंच अनंता आणि अनू प्रेमाने बांधले गेले आणि इथंच अनंताची शोकान्तिका निश्चित झाली.
नारळी-पोफळीची डुलणारी झाडं, जगबुडी नदीची कमनीय वळणं, त्यावरचा ओटी भरण्याचा धक्का, हरण टेंभा, मोरयाचं पाऊल, सुगंधी फुलांची झाडं, गावाला लागून असणारी घनदाट जंगलं अशा भोवतालच्या कोकणच्या निसर्गाच्या कोंदणात जडवलेली हिरे-माणकंच आहेत या वास्तू म्हणजे.
कादंबरीची सुरुवात बजापाचा अर्धवट बांधलेला वाडा आणि ओडुलच्या विरूप झालेल्या बंगल्याने झाली आहे. साठ वर्षांपूर्वी बांधलेला बजापाचा तालुक्याचा वाडा एखाद्या किल्ल्यासारखा ताठ. तुंबाडची जणू प्रतिकृती! तोच चौथरा, त्याच लांबलचक पायऱ्या आणि तोच काळवत्री दगड आणि सागाचा वापर. पण कौलं आणि दारं नाहीत. आत गवत माजलेलं, ढोरं-कुत्र्यांचा वावर. मग आपल्याला प्रश्न पडतो का? असं का? वास्तूही शापित असते का? तिलाही नशीब असतं का? असावंच. नाहीतर नांदत्या गोकुळाचं असं का व्हावं? कारण गंगाच्या अवेळी, अनैसर्गिक मरण्यामुळे बजापाला ‘ती वास्तू’ अपशकुनी वाटते; आणि तो तिला हातात पैसा असूनही अपूर्ण ठेवतो. तर अमेरिकेला स्थायिक झाल्यामुळे मुलगा दुरावतो आणि ओडुल सैरभैर होऊन बंगल्याकडे दुर्लक्षच करतो आणि बंगला ढासळायला लागतो.
तुंबाडच्या वाडय़ाचा शेवट तर हृदयद्रावकच होतो. गांधी वधानंतर जे जळिताचं तांडव झालं त्यात वाडय़ाचा बळी गेला. शास्त्रीबुवांनी जिथं रोग्यांना जीवनदान दिलं ती ओटी विरघळत होती. जिथं त्यांनी अध्ययन-चिंतन केलं तो वैभवशाली दिवाणखाना ज्वालांनी वेढला गेला. अघोरी पंथाच्या खोलीचं अमंगलत्व शास्त्रीबुवांचे ग्रंथ ठेवून, तिला सारवून, दारं-खिडक्या उघडून ताईआत्याने तिला प्रसन्न केलं. ती स्वत: तिथं राहू लागली. त्या खोलीला पावित्र्य आणलं. तो पाप-पुण्याचा हिशेब अग्निदेवाकडे नव्हता. त्याने ती खोलीही स्वाहा केली. ताईआत्या ठामपणे उभी राहून, ‘गणेशशास्त्री तुंबाडकरांची मुलगी मेल्याशिवाय वाडा मरणार नाही’ असे म्हणते. मनोमन तिने वाडय़ाला सजीव नातलग मानलं आहे.
चारी बाजूंनी लपेटणाऱ्या ज्वाळांत ती सती जाणाऱ्या साध्वीसारखी शांत उभी राहते. उंबऱ्यावर त्या पुण्याईचा कोळसा होतो. पण तरीही वाडय़ाच्या काही भागांपुढे अग्नीचंही काही चाललं नाही. नंतर राहिलं ते उरात धडकी भरवणारं भेसूर भग्न लेणं!
(संदर्भ : तुंबाडचे खोत- खंड १ आणि २ – श्री. ना. पेंडसे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा