स्वयंपाक करण्याच्या पद्धतींत गेल्या काही दशकांत आमूलाग्र बदल झाला आहे. साहजिकच आपल्या स्वयंपाकघरांचा चेहरामोहराही बदललेला आहे. या बदलांसोबतच स्वयंपाकघर अधिक परिपूर्ण, कार्यक्षम आणि पर्यावरण-अनुकूल करता येईल का?
मला असं ठामपणे वाटतं की घरातली बठकीची खोली जर घराच्या अभिरुचीचा आरसा असेल तर स्वयंपाकघर घरातल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा आरसा असतो. स्वयंपाकघरात काय आणि कसं शिजत यावरून त्या घराची खाद्यसंस्कृतीच नाही तर एकूणच संस्कारांचा कानोसा घेता येतो. अगदी साधं उदाहरण देतो, कामात व्यस्त असणाऱ्या आधुनिक जोडप्यांच्या स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये तयार पदार्थाच्या पाकिटांचा, घाऊक तयार करून ठेवलेल्या पदार्थाचा भडिमार असतो, तर त्यांच्या आई-बाबांच्या फ्रीजमध्ये ताज्या भाज्या, फळं आणि आवर्जून निवडून ठेवलेल्या पालेभाज्या, कडधान्य यांची रेलचेल असते. घरात लहान मूल असेल तर खाऊचा डबा असतोच असतो- कधी चॉकलेट-बिस्किटांनी भरलेला तर कुणाकडे घरच्या चिवडा-लाडूंनी!
या लेखासाठी विचार करताना, संशोधन करताना मी एका शेफसोबत बोलायचं ठरवलं. ‘‘घरापेक्षा कोणत्याही हॉटेलचं स्वयंपाकघर अधिक कार्यक्षम असणं ही व्यावसायिक गरज असते. स्वयंपाकघर जितके कार्यक्षम तितका अधिक नफा हे सरळ गणित असतं.’’ आमच्या भेटीचं महत्त्व पहिल्याच भेटीत, पुण्यात मेट्रो मिक्स हे यशस्वी रेस्तरॉ चालवणारे आणि मुदपाक-सल्लागार असणारे शेफ सचिन जोशी यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं. ‘‘मात्र आत्ताच्या काळात जागेच्या टंचाईमुळे अनेक मोठय़ा रेस्तरॉची स्वयंपाकघरं देखील घरांइतकीच छोटी असतात, मात्र त्यांना घरांपेक्षा कितीतरी अधिक माणसांची भूक रोज भागवायची असते.’’
दोन-तीन दशकांपूर्वी स्वयंपाकाच्या गॅसच्या बचतीचा मार्ग म्हणून भांडय़ांवर झाकण ठेवून पदार्थ शिजवण्याच्या पद्धतीचा जाहिरातींद्वारे प्रसार करण्यात येत असे, नंतर प्रेशर कुकर वापरण्याचा सल्ला जाहिरातींद्वारे देण्यात येई, आणि आता तर गॅसशेगडय़ा अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला जातो. ‘‘आज घराघरांतून मायक्रोवेव्ह दिसतात. झटपट मागल्या पिढीने यांचा स्वीकार हात राखूनच केला, आजची पिढी मात्र आता हिरिरीने हे उपकरण वापरतात.’’ सचिन एक नवं निरीक्षण नोंदवतात. ‘‘आम्ही रेस्तरॉमध्ये काही वर्षांपासून वापरत असलेले इंडक्शन कूकटॉप आता घरांतूनही दिसायला लागले आहेत. अजून म्हणावा तितका प्रसार झालेला नाही. मात्र वेळ आणि ऊर्जा दोन्हींची बचत या कारणांसाठी त्यांचाही प्रसार झपाटय़ाने होईल यात शंकाच नाही. ‘‘पारंपरिक उपकरणांत – चूल, गॅसशेगडी वगरे – ऊर्जा भांडय़ांसोबतच इतरत्र देखील पसरते. वाया जाते. आधुनिक उपकरणातं मात्र ती थेट पदार्थापर्यंत (मायक्रोवेव्ह) किंवा थेट भांडय़ापर्यंत (इंडक्शन कुकर) पोहोचते. सहाजिकच ही उपकरणं इतर पारंपरिक उपकरणांपेक्षा अधिक कार्यक्षम ठरतात. माझ्या मनात विचार आला की काही पारंपरिक पदार्थ या आधुनिक उपकरणांद्वारे बनवता आले तर? आणि मी काही प्रयोग केले. अगदी साधं उदाहरण म्हणजे प्रेशर कुकर गॅसवर लावण्याऐवजी मी इंडक्शन शेगडीवर लावतो. दीडएक मिनिटांत काम होतं. याच तंत्राचा वापर मी पारंपरिक पुलाव, बिर्याणी यांसाठी करतो. अचूक साधलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे भात मोकळा राहतोच, भाज्यादेखील अचूक शिजतात. शिवाय तासचे तास दम लावून ठेवण्याचा व्याप वाचतो.
‘‘स्वयंपाक करताना सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे स्वयंपाकाकरिता लागणारे जिन्नस जमवणं.’’ सचिन आपल्या स्वयंपाकघरातलं एक गुपित उघड करत म्हणाले, ‘‘हे रेस्तरॉमधून शिकलो, आणि घरी वापरायला लागलो – जेवढं लागेल तेवढंच खरेदी करतो. आज टॉमेटोचे भाव उतरले तेव्हा एकदम दहा किलो न घेता, एका वेळी फारतर दीड किलो खरेदी करतो. मॉलमधून एकदम आठवडय़ाची भाजी आणत नाही, लागेल तशी एक-दोन दिवस पुरेल एवढीच भाजी आणतो. एक तर यामुळे ताजे जिन्नस मिळतात आणि अन्न वाया जाण्याचे प्रसंग टाळता येतात. दुसरं म्हणजे मी ऋतुमानानुसारच घरचा मेन्यू ठरवतो. केळी वर्षभर मिळतात, मात्र आंबा नाही. आता पावसाळ्यात अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात तेव्हाच त्या मुबलक वापरायच्या. जे ज्या ऋतूत मिळत नाही ते त्यावेळी खरेदी करायचं नाही.’’ सचिन या विचारामागचं रहस्य सांगताना म्हणाले, ‘‘आपलं स्वयंपाकघर असं पर्यावरणाशी जोडलेलं आहे. साठवलेले पदार्थ खायचे तर त्यासाठी ऊर्जा लागते. काही पदार्थ साठवून जरूर खावे मात्र जे ताजं खाता येईल ते का खाऊ नये? आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, शिवाय पदार्थ साठवण्याचे, प्रवासातून वाहून नेण्याचे श्रम व ऊर्जा वाचतात.’’ सचिनशी बोलताना मला स्थानिक खरेदीचं महत्त्वदेखील पटलं. मी स्वत शक्यतोवर स्थानिक खरेदी करतो. आजही अनेक शहरांतून सकाळी स्थानिक बाजार भरतात. बोरिवली-कांदिवली भागात वसई-विरार-डहाणूहून भाज्या येतात. ठाण्यात अनेक ठिकाणी आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातले शेतकरी आपली घरची फळं-भाजी आणतात.
अनेक अंगांनी स्वयंपाकघरांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की स्वयंपाक घर कसं असावं याचा विचार केला तरी आपलं स्वयंपाकघर अधिक कार्यक्षम आणि पर्यावरण-अनुकूल करता येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वयंपाकघर मोकळं, हवेशीर असलं म्हणजे वायुवीजन उत्तम होऊन एक्झॉस्ट पंखा, इलेक्ट्रिक चिमणी या उपकरणांची गरजच भासत नाही. सचिननी त्यांच्या अनुभवाने यात एक महत्त्वाचा मुद्दा जोडला. ‘‘आज आपण बऱ्याच घरांत मॉडय़ुलर किचन बघतो प्रत्येकाच्या बजेटनुसार सगळेच याचं प्लॅिनग करतात. मात्र लाकूड टाळून स्टील वापरलं तर झुरळं-पालींचा त्रास टळतो. कीटकनाशकांचा वापर टाळता येतो. शिवाय कीचन टिकाऊ होतं. स्टील परवडत नसेल तर लाकडाला पर्याय म्हणून टऊासारखे इतर पर्याय आहेत. कीचनमध्ये ओटा-जमीन याकरता मार्बल किंवा लाकूड यांसारख्या द्रव शोषून घेणाऱ्या मटेरिलपेक्षा ग्रॅनाइट किंवा पॉलिश्ड लादीचा वापर केला तर कीचन स्वच्छ करणे सोपे होऊन जाते. सोप्स, साबणाशिवाय असं कीचन स्वच्छ करता येतं, आणि प्रदूषण वाचतं.’’
पर्यावरण-अनुकूलतेचा आणि कार्यक्षमतेचा विचार करताना स्वयंपाक घराची आखणी देखील महत्त्वाची ठरते. भांडी घासण्याच्या बेसिन जवळच ओली भांडी ठेवण्याची व्यवस्था केली तर भांडी विसळून ठेवताना नळाच्या पाण्याचा अपव्यय टळेल. शिवाय स्वयंपाकघरात एक ‘ओला विभाग’ वेगळा करता येईल. स्वयंपाक करण्याच्या जागे जवळच मिसळणाचे, मसाल्याचे, रोजच्या लागण्यातले पदार्थ ठेवले म्हणजे ते हाताशीच सापडतील. जवळच फ्रीज असेल असे पाहिले म्हणजे त्यातून लागणारे जिन्नस चटकन् घेता-ठेवता येतील, सहाजिकच फ्रीज अधिक वेळ उघडा राहिल्याने होणारा ऊर्जेचा अपव्यय टळेल. मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्यूसर, शिवाय आपली विळी, सुरी आणि भाज्या-फळं-मांस चिरायची फळी, आणि इतर उपकरणी इथेच ठेवली म्हणजे हा झाला ‘तयारीचा विभाग’. साठवणीचे पदार्थ थोडे दूर, स्वयंपाकघराच्या दुसऱ्या कोरडय़ा कोपऱ्यात ठेवले तर जिन्नस वाया जाणार नाहीत. इथेच मोठी, क्वचित लागणारी भांडीदेखील ठेवता येतील. हा झाला ‘साठवणीचा किंवा कोरडा विभाग’ माझ्या पिटूकल्या स्वयंपाकघरात देखील असे तीन विभाग आहेत. गॅस शेगडी नाही. इंडक्शन शेगडी, मायक्रोवेव्ह आणि सौरचूलीवरच सारी भिस्त आहे. यापुढची पायरी म्हणजे मी खास स्वयंपाकघरासाठी एक सौरविद्यूत-संयंत्र बसवून घ्यायचा विचार करतो आहे. मी इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर राहतो, आणि माझ्या घरात दिवसभर खूप सूर्यप्रकाश येतो. घराला लागूनच असलेल्या व्हरांडय़ात मला सौरविद्यूत संच बसवता येईल. साधारण ऐंशीएक हजार किंमत असलेल्या या संयंत्रामुळे माझ्या स्वयंपाक घरातसोबतच साऱ्या घरातील दिवे-पंख्यांसाठी लागणारी वीज मला सौरऊर्जेद्वारे मिळवता येईल. सुरुवातीला खूप जास्त किंमत वाटत असली तरी भविष्यात माझी ऊर्जा बचत मोठी असेल. शिवाय मी ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेन हे अधिक महत्त्वाचं.
स्वयंपाकघरासारख्या साध्या, नेहमीच्या वाटणाऱ्या खोलीचाच थोडा अधिक गांभीर्याने विचार केला तर आपण ऊर्जा कार्यक्षमतेत आणि पर्यावरण-अनुकूलतेत खूप मोठा पल्ला गाठू शकतो हे नक्की. पहा बरं विचार करून?
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2013 रोजी प्रकाशित
चिऊचं घर : स्वयंपूर्ण स्वयंपाकघर
स्वयंपाक करण्याच्या पद्धतींत गेल्या काही दशकांत आमूलाग्र बदल झाला आहे. साहजिकच आपल्या स्वयंपाकघरांचा चेहरामोहराही बदललेला आहे.

First published on: 29-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A complete kitchen