आपलं दैनंदिन आयुष्य हे सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलत असतं. घरात येणारे सुखद क्षण अक्षय राहावेत, त्यांची पुनरावृत्ती व्हावी अशी मनोकामना प्रत्येकाची असते. घरात सुखसमृद्धी कायम राहावी व घर कायम आनंदाने नांदतं राहावं या उद्देशानेचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे जण आपापल्या पद्धतीने घरोघरी अक्षय्यतृतीया उत्साहाने साजरी करतात.
र णरणत्या वैशाख वणव्यात अंगाची लाही लाही होत असताना सगळ्यांना सुखद गारवा देणारा सण म्हणजे अक्षय्यतृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा पवित्र सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो, ज्याला ‘अखाती तीज’ असेही म्हटले जाते.
आपलं दैनंदिन आयुष्य हे सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलत असतं. घरात येणारे सुखद क्षण अक्षय राहावेत, त्यांची पुनरावृत्ती व्हावी अशी मनोकामना प्रत्येकाची असते. घरात सुखसमृद्धी कायम राहावी व घर कायम आनंदाने नांदतं राहावं या उद्देशानेचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे जण आपापल्या पद्धतीने घरोघरी अक्षय्यतृतीया उत्साहाने साजरी करतात.
या दिवशी आपल्या घरात शुभ गोष्टी घडल्या तर त्या अक्षय राहतात म्हणजेच घरातला आनंद, सुख, समाधान कधीही संपत नाही अशी धारणा मनात असल्याने लोक या सणाकडे घराला सकारात्मक ऊर्जा देणारा सण म्हणूनही पाहतात. याच कारणांमुळे साखरपुडा, लग्न, उपनयन, वास्तुशांत अशी शुभकार्ये या दिवशी घरात पार पाडली जातात. तसेच नवीन व्यवसायाचा किंवा एखाद्या नवीन प्रकल्पाचा श्रीगणेशा या दिवशी केला जातो जेणेकरून त्या व्यवसायात किंवा प्रकल्पात प्रगती होईल व अक्षय यश मिळत जाईल. नवीन घराची, दागदागिन्यांची, वाहनांची या दिवशी लोक आवर्जून खरेदी करतात व अशाच गोष्टी आपल्या घरात वारंवार येत राहोत अशी मनीषा बाळगतात.
शेतकरी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतो. म्हणून या सणाला ‘आखेती’ असेही म्हणतात. आपलं पोट भरण्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या भूमातेची पूजा करून शेतकरी बांधव मातीत आळी घालतात. फळ बागायतदार फळांचे बीजारोपण करतात. या शुभमुहूर्तावर शेतात बियाणे पेरण्यास घरात विपुल धान्य येते असा समज असल्याने कोकणातले शेतकरी बियाणे पेरण्याचा शुभारंभ या दिवशी करतात. घरात असणारी अन्नपूर्णा देवी आपल्या घराची भरभराट करते असे मानले जाते. त्यामुळे अक्षय्यतृतीयेच्या दिवशी तांब्यापितळेची, मातीची भांडी खरेदी करणे घरासाठी शुभसंकेत मानले जातात. असे केल्याने घर अन्नधान्यांनी संपन्न राहतं असा समज जनमानसात दिसून येतो. आपल्या घरात धनसंपत्ती अखंड येत राहावी व ऐश्वर्य नांदावे यासाठी अक्षय्यतृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात अक्षय्यतृतीयेपासून आंबे खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे बहुतांश घरांत आमरस, पुरणपोळी असा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला जातो. आपल्याकडे कृषीसंस्कृती हा सण महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील प्रथम पीक घेण्यासाठी, शेत तयार करण्यासाठी बळीराजा या दिवसापासून नांगरट सुरू करून शेतीच्या कामाचा श्रीगणेशा करतो व हा सण साजरा करतो. या दिवशी वस्तू, अन्न, बी-बियाणे इत्यादींचे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची प्रथा असल्याने लोक पारंपरिक पद्धतीने आपल्या पितरांचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देतात.
विदर्भ व खानदेशात अक्षय्यतृतीया ‘अखातीज’ किंवा ‘आखाजी’ म्हणून साजरी केली जाते. हा सण दिवाळीसारखाच उत्साहाने तिथे साजरा केला जातो. या सणाचे वेगळेपण सांगताना प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई म्हणतात,
आखाजीचा आखाजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी।
स्त्रियांच्या जीवनात आनंद पेरणारा हा आखाजीचा सण उन्हाची काहिली कमी करणारा, माहेर भेटवणारा, मैत्रिणींची गळाभेट करणारा, त्यांच्याबरोबर चार घटका खेळवणारा, हितगुज गप्पागोष्टींची संधी देणारा, सासरच्या कामाच्या रट्ट्यातून विसावा देणारा असतो. त्यामुळे या सणाला आपल्या घरातल्या माहेरवाशिणींना आवर्जून माहेरी बोलवून त्यांचे लाड पुरवले जातात. माहेरवाशिणी घरी येणार म्हणून घरातल्या स्त्रिया कुरडया, पापड, लोणचे, सांडगे असे अनेक जिन्नस आधीचं बनवून ठेवतात, झाडाला झोके बांधून ठेवतात. आखातीला माहेरी आलेल्या माहेरवाशिणींचा साग्रसंगीत पाहुणचार करतात. घरोघरी मुली गौराई बसवतात, सजावट करतात, टिपऱ्या खेळतात, झोक्यावर झुलतात, सांजोऱ्याचा नैवेद्या दाखवतात. पुरणाचे मांडे आणि आमरस हे आखाजीच्या सणासाठी खास विशेष पदार्थ घराघरांमध्ये बनवले जातात. आखातीचा पाहुणचार घेऊन माहेरवाशिणींनी व त्यांना आनंद देऊन सासुरवाशिणी रोजच्या संसाराच्या रहाटगाड्यात चार सुखाचे क्षण अनुभवतात.
अक्षय्यतृतीयेचा सण झाला की शेतीची मशागत करायची असते. त्यामुळे सण संपला की माहेरवाशिणींना सासरी जावं लागतं, चार दिवसांची गंमतजंमत विसरून कामाला लागावं लागतं. कष्टमय आयुष्याची गाडी पुन्हा हाकावी लागते. हे सगळं करताना त्यांच्या मनात पुढच्या आखाजीची आस रेंगाळत राहते. त्या स्त्रियांच्या मनातली हुरहुर बहिणाबाईंनी अतिशय समर्पक शब्दांत मांडली आहे –
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आती कही जी?
असा माहेरवाशिणींना ओढ लावणारा आखाजी सण सगळ्यांना भरभरून सुखसमृद्धी व ऐश्वर्य देवो हीच सदिच्छा… mukatkar@gmail.com